शेख झायेद ग्रँड मस्जिद संगमरवरी वास्तुकलेचा देखणा नमुना
आग्र्याच्या ताज महाल नंतर जगात संगमरवरी, इस्लामिक वास्तुकलेचा देखणा नमुना कोणता असेल, तर तो अबुधाबी येथील शेख झायेद ग्रँड मस्जिद होय. सौदी अरेबियातील मक्का, मदिना या मशिदीनंतरची जगात तिसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद शेख झायेद ग्रँड मशीद ही होय.
'शेख' या शब्दाचा अर्थ 'श्री' असा होतो. दुबईपासून अवघ्या दीड तासाच्या अंतरावर अबुधाबी स्थित आहे. युनायटेड अरब अमिरातची राजधानी म्हणजे अबुधाबी होय. दुबई सोडल्यानंतर काही वेळानंतर रस्त्याने आपला रंग बदलायला सुरुवात केली. प्रशस्त आणि वेगळ्या नमुन्याच्या कमानीमधून आमचा प्रवास सुरु झाला. ही निशाणी म्हणजे अबुधाबीमधील प्रवेशाची होती.
आपल्याकडील जागोजागी पळणाऱ्या बाभळीच्या झाडांप्रमाणे इथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला खास लावलेली खजुरांची झाडे मागे पळत होती. मरुस्थळ असूनही उच्च प्रतीच्या हिरव्यागार 'लाॕन' ची जोपासना रस्त्यांच्या बाजूला केली होती. त्यासाठी ठिबक सिंचनाचा खास वापर केलेला दिसत होता.
या पळणाऱ्या गर्द झाडीतून मधूनच पांढऱ्या शुभ्र संगमरवरी मशिदीचे आकाशाकडे उंचावलेले मीनार, घुमट डोकावत होते. आम्ही मशिदीजवळ आलो आलोय, हे त्याचे द्योतक होते. काही वेळात हे पळणारे खजुराचे वृक्ष स्थितप्रज्ञ झाले.
आमची पाकिस्तानी, होय! खास परवानाधारक मूळची पाकिस्तानची असलेली परंतु, दुबईमध्ये पर्यटकांसाठी काम करणारी 'गाईड नूर' हिने आवश्यक त्या सूचना गाडीमध्येच दिल्या होत्या. विशेषतः संपूर्ण पेहरावाबाबत! जगात भारताचा पारंपरिक शत्रू म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी इथे मात्र, अन्य देशांच्या नागरिकांसारखाच गुण्या-गोविंदाने राहतोय. हा इथल्या कायद्याचा, नियमांचा धाक होता. नूरने महिलांना शैला-मोठा रुमाल अर्थातच स्कार्फ बांधायला मदतही केली होती.
मशिदीच्या प्रवेशद्वारामधून जात असतानाच वास्तुशिल्पाची भव्यता, त्यासाठी वापरलेला दगड, नक्षीकाम, जगभरातून भेट दिलेले महनीय व्यक्ती, इथे चालणारे धर्मादायी-सामाजिक उपक्रम याची माहिती मार्गिकेच्या दोन्ही बाजूला दर्शविण्यात आली होती.
भव्य मशिदीचे तितकेच विलोभनीय घुमट चार बाजूला १०६ मीटरचे चार मीनार डोळे वेधून घेत होते. प्रशस्त प्रांगणात पोहचल्यावर निळ्याशार नितळ पाण्याचा छोटा तलाव त्यासमोर हिरवागार पसरलेले लाॕन दिसत होते. ही छायाचित्रे घेण्याची नेमून दिलेली जागा होती. होय ! पर्यटकांसाठी स्वतःची छायाचित्रे घेण्यासाठी येथे जागोजागी 'फोटोग्राफी स्टाॕप' आहेत. प्रांगणातून आतमध्ये प्रवेश झाला. छताकडील घुमुटाचा आंतर्गोल, त्या भोवतालची नक्षीदार सजावट, खाली पायातील संगमरवरी फरशीवर विविध रंगीत दगडांच्या वापरापासून केलेली कलाकुसर आणि समोरील नक्षीदार संगमरवरी खांबांवर सोन्याचा मुलामा देत केलेली कलाकुसरीचा नजारा पर्यटकांसाठी एकाचवेळी विस्मय, नवल, आनंद, अद्भूत, देखणेपणा आणि कुतूहल यांचे मिश्रण होते.
रंगीत दगडांचा वापर करुन पाना-फुलांची कलाकूसर ताज महलची आठवण देत होता. ही आधुनिक काळातील कलाकारांची कलाकृती आहे, याची जाणीव प्रत्येक कलाकूसर करुन देत होती. हेच याचे नवल ते होय. जस-जसे आतमधील दर्शन होत होते, तसे अधिकच विस्मय वाढत होते. या ठिकाणी अंथरलेला सुंदर गालिचा हा कारागिरांनी जागेवरच हातांनी बनवला होता. छतावर अडकवलेली मोठाली पण चित्ताकर्षक सोन्याचा मुलामा दिलेले आणि स्वारोवस्की क्रीस्टल्सपासून बनवलेली ७ झुंबरं या मशिदीच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. येथील भिंतींवर नक्षीदार, अरबी कॕलिग्राफीमध्ये पवित्र कुराणातील आयते लिहिली आहेत.
युनायटेड अरब अमिरातचे तत्कालीन राष्ट्रपती दिवंगत मरहूम शेख जायेद बिन सुल्तान अल नाह्यान यांच्या नावावरुन या मशिदीचे नाव ठेवण्यात आले आहे. ही मशिद पूर्ण करण्यासाठी एक तप म्हणजेच १२ वर्षे लागलीत. या विशाल प्रकल्पावर जवळपास ३८ कंपन्या आणि ३५०० कामगारांचा राबता होता. या मशिदीमधील कालीन अर्थात गालिचा हा १३०० इराणी कलाकारांनी हाताने विणून जगातील सर्वात मोठ्या गालिचाचे विश्व रेकाॕर्ड बनवले गेले. एकावेळी ४१ हजार नमाजी नमाज पठण करु शकतात. या मशिदीला एकूण ८२ घुमट असून यातील प्रमुख घुमट हा जगातील इतर मशिदींपेक्षा मोठा आहे. या घुमटांभोवती सोन्याच्या पानांची कॕलिग्राफी नक्षी चितारण्यात आलीय. या मशिदीत एकूण १०४८ संगमरवरी सोन्याचा मुलामादिलेले, नक्षीदार स्तंभ आहेत. २० डिसेंबर २००७ रोजी ही मशिद नमाजासाठी आणि सर्वसामान्यांसाठी खुली केली.
इस्लामिक वास्तुकलेचा नमुना असणाऱ्या या मशिदीत "ओपन-डोअर" पाॕलीसी आहे. जगभरातील अभ्यागतांना केवळ सौंदर्य पाहण्यासाठी नव्हे तर अमीरातच्या मुक्त संवादाच्या संस्कृतीची सखोल माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करते. विविध धर्मातील परस्परांविषयी आदर आणि समजूतदारपणा वाढवण्याच्या उद्देशाने सामाजिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांना समर्थन देणे, पवित्र कुराणाचे स्मरण आणि पठण यासाठी व्याख्याने, परिसंवाद आणि मंच आयोजित करणे हा येथील उद्देश आहे.
या मशिदीत महिला पर्यटकांनाही खुलेपणाने प्रवेश दिला जातो. यात परदेशी-युरोपीय पर्यटकांचा मोठा सहभाग होता. हे याचे वैशिष्ट्यं म्हणावे लागेल.*
*©️ प्रशांत सातपुते*
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937
https://youtu.be/yksdxAMMazY
Comments
Post a Comment