स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा शेवटाचा..टोकाचा गड..अर्थात पारगड..!
घनदाट, निबिड अरण्यात छातीचा कोट करुन गोवा-कर्नाटकातील हालचालींवर स्वराज्याच्या रक्षणार्थ आपली नजर रोखून उभा असणारा आणि आपल्या स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा गड..पारगड..! अगदी शेवटाचा..टोकाचा तो पारगड..! छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला, इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असणारा हा गड दुर्गप्रेमींसाठी आणि शिवभक्तांसाठी ऐतिहासिक घटनांना उजाळा देत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावला आहे. चंदगडमधील हेरेपासून अवघ्या २४ किमी अंतरावर हा गड आहे. सह्याद्रीच्या उंचच- उंच डोंगर रांगांमधून, लता-वेली, जंगली आणि औषधी झाडांच्या घनदाट अरण्यामधून ही वाट गडाच्या पायथ्याला जाते. या ठिकाणापासून ३६० पायऱ्या चढून गेल्यानंतर शिवकालीन तोफांच्या अवशेषांचे दर्शन होते. बाजूलाच हनुमानाचे मंदिर असून, या ठिकाणी पुरातन अस्तित्वाची साक्ष देणारे तुळसी वृदांवन दिसते. या पायऱ्यांपासून थेट गडावर जाण्यासाठी गडाच्या मागील बाजूस वाट आहे. सध्या या वाटेने चारचाकी वाहन वर जाते. कोकण आणि गोव्याच्या सीमेवरील या गडाचे महत्त...