Posts

Showing posts from October, 2025

🪔 हरवलेली दिवाळी🏮

Image
    सहामाही परीक्षा संपली की, आता दिवाळीची सुट्टी ! हाच सर्वात मोठा आनंद असायचा. दगड, माती, विटांचे तुकडे गोळा करुन, किल्ला बांधणीत मी गुंतलेला असायचो. त्यावर लाल मातीचा लेप चढायचा. शेवटी जंगलासाठी किल्ल्याच्या लाल मातीत हळीव-मोहरीची पेरणी होई. नित्यनेमाने त्यावर सकाळ-संध्याकाळ पाणी शिंपडले जाई. गल्लीत असे आणखी चार-पाचजण किल्ले बांधून त्याकाळी किल्लेदार झालेले असत. दररोज संध्याकाळी किल्ल्यावरही पणती, मेणबती तेवत रहायची. एव्हाना मोहरी-हळीवाचे पोट फाटलेले असे. फाटलेल्या पोटातून बाहेर येत, अंकूर सूर्याकडे लुकलुकत रहायचे. वाऱ्यावर हळूवार डोलायचे. त्यांचे मूळ लाल मातीत घुसून राही. आठवडाभरातच लालसर किल्ल्यावर हिरवट जंगल शोभून दिसायला लागे.        कधी-कधी सकाळी उठल्यावर किल्ल्याचा बुरुज कोणीतरी पाडून गेलेला असायचा. पुन्हा नव्या जोमाने तो त्याच दिवशी बांधला जाई. कोण पाडत असेल, त्यावर गल्लीत आमचा किल्लेदारांचा खल चालायचा. गडाच्या राखणीची नवी जोखीम यायची. अखेर 'शत्रू' कचाट्यात सापडायचा आणि त्याची तक्रार थेट त्याच्या घरात व्हायची. त्याला घरातून मिळालेले त...