आख्ख्या जगाला एका गावात बंदिस्त करणारं 'ग्लोबल व्हिलेज'
सगळ्या जगाला एका गावात बंदिस्त करण्याचा यशस्वी घाट घातला तो दुबईनेच.! आपल्याकडील असणाऱ्या लाखो चौरसमीटर रिकामी-मोकळ्या जागेचा विनियोग उत्पन्नाच्या दृष्टीने करत आख्ख्या जगाला एका गावाच्या रुपात उभं केलं ते 'ग्लोबल व्हिलेज' च्या माध्यमातून.!
दुबईकडे असणारी रिकामी जागा उत्पन्नाच्या दृष्टीने खुणावू लागली. या जागेवर काय करता येईल, ज्या मधून देशाला उत्पन्न मिळेल शिवाय इथे येणाऱ्या पर्यटकांना एकाच जागी जग फिरल्याचा आनंद घेता येईल. त्यामधूनच सर्वोत्तम बाजारपेठ 'ग्लोबल व्हिलेज' ची संकल्पना पुढे आली आणि ती साकारली देखील गेली.
आपल्याकडे एखाद्या महोत्सवाच्या, जत्रेच्या निमित्तानं विविध प्रकारचे 'स्टाॕल्स' उभारले जातात, अगदी तशाच पद्धतीने परंतु, प्रत्येक देशाचा अती, अती विशाल स्टाॕल्स म्हणजेच एक स्वतंत्रपणे पॕव्हेलियन येथे उभारण्यात आले आहेत. शिवाय जत्रंत असणारे पाळणे-खेळणी अगदी फुगे विक्रेतेदेखील याठिकाणी आहेत. परंतु, हे सगळं आधुनिक यंत्रावर-तंत्रावर चालणारं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वसलं आहे.
रंगसंगती बदलणाऱ्या विशाल प्रवेशद्वारामधून आत प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते आयफेल टाॕवरच्या प्रतिकृतीचे. रंगी-बेरंगी एल ई डी दिव्यांचा सर्वत्र झगमगाट, तितकीच जगातील विख्यात आश्चर्यांच्या प्रतिकृती यात हरवायला झालं. भारतातील संगमरवरी ताजमहल येथे दिमाखात उभा होता.
लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारुन आपले पॕव्हेलियन इथे भारताने उभारले आहे. तमाम भारतीयांचे स्फूरणस्थान, शौर्य प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभी केलीय. कथ्थक, उडीसी, भरत नाट्यम, यक्षगान या नृत्य संस्कृतीलाही यावर स्थान देवून वेगळा ठसा उमटवला आहे. बाजूलाच 'इंडीयन स्ट्रीट फूड' ची वेगळी कल्पकता मांडून येथे डोस्यांचे प्रकार, आईस्क्रीम असे खाद्यप्रकार विक्रीस आहेत. नेपाळचा एक स्टाॕलही आपल्या पॕव्हेलियनमध्ये होता.
वरुन मरुन रंग तर आतून पांढरा असणारा थायलंडचा पेरु अतिशय मधूर होता. अफ्रिकेची जंगलांवर बेतलेली सौंदर्य प्रसाधने, इराणच्या गालिच्यांवरील चित्रे डोळे विस्फरायला लावीत होती. मोरोक्कोच्या पॕव्हेलियनमध्ये कलाकार आपली लोककला सादरा करत होते. काहीच कळत नव्हतं. पण संगीत थांबायला भाग पाडत होतं. अपल्याकडील चिपळ्यांप्रमाणे मोठ्या आकारातील चिपळ्या तो कलाकार वाजवत होता. जपान, चीन, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा विविध देशांनी आपले अस्तित्व ठेवले आहे.
प्रत्येक देशाची सांस्कृतिक लोककला प्रदर्शनासाठी त्या-त्या देशाच्या पॕव्हेलियनमध्ये रंगमंच स्वतंत्रपणे दिला होता. तसेच सर्व देशांसाठी सामुदायिक रंगमंच पुन्हा वेगळा दिला होता. या ठिकाणी अनेक देश आपली सांस्कृतिक कला प्रदर्शन करत होते.
रेल्वे स्टेशन आणि रेल्वे डब्यांच्या माध्यमातून खास फूड स्टाॕल लक्ष वेधत होता. उंचच-उंच पाळणे, विविध साहसी खेळ, झुले यांची स्वतंत्र गर्दी होती. जगभरातून आलेले पर्यटक या विविध देशांच्या पॕव्हेलियन मध्ये खरेदी करुन आनंद घेत होते. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यासाठी उभारण्यात आलेली स्वच्छतागृहे ही स्वच्छ, आकर्षक आणि प्रशस्त होती. मध्यरात्रीनंतर कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारे हे ग्लोबल व्हिलेज केवळ कापडी पडद्याच्या सहायाने बंद करुन सर्व कर्मचारी अगदी निवांतपणे आपल्या घरी परतत. हे तितकच विश्वासार्हता दर्शवणारं चित्र होतं.
_ही दुनिया हाय एक जत्रा हवसं गवसं नवसं सतरा..ह्या दुनियेला झुकवत न्हाई त्यो एक येडा भितरा.._
जोतिबाचा नवस या मराठी चित्रपटातील वरील ओळींचा साक्षात इथे प्रत्यय येत होता.
-©️प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid021SHiAea1vibrq6APVM5c3Xz1Cku14vVFsGQLcMQTb4wyGqHSoMHUDowirnDGKhkil&id=100001067020937&mibextid=Nif5oz
Comments
Post a Comment