काय सांगता..! दुबईत रस्त्यांवर पोलीसच नाहीत..!
शारजहा विमानतळावरुन आम्ही दुबईकडे निघालो होतो. तत्पूर्वी या ठिकाणी असणारे अधिकारी आणि कर्मचारी हे पारंपरिक 'अरबी' या आॕफिशियल पोशाखात होते. पुरुषांसाठी डोक्यावर जो पांढरा शुभ्र रुमाल असतो, त्या 'गत्रा' म्हणतात. त्यावर ज्या दोन काळ्या रिंग ठेवल्यासारख्या दिसतात त्याला 'अगाल' म्हणतात. तर जो पांढरा शुभ्र खांद्यापासून अगदी पायापर्यंत पायघोळ जो गाऊन असतो, त्याला 'कंदुरा' म्हणतात. महिलांसाठी अर्थातच काळा कुळकुळीत बुरखा असतो. त्याला 'अबाया' म्हटले जाते. शिवाय चेहरा उघडा असला, तरी डोक्यावरुन कान बंदिस्त करणारा जो स्कार्फ असतो, त्याला 'शैला' म्हटले जाते. हा पोशाख इथे सर्रास पहायला मिळतो.
पर्शियन आखाताच्या आग्नेय किनाऱ्यावर अरबी वाळवंटामध्ये समुद्र सपाटीवर दुबई वसले आहे. दक्षिणेला संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबुधाबी, ईशान्येला शारजहा तर आग्नेयेला ओमान देशाच्या सीमा आहेत. दुबई हे एक महत्त्वाचे व्यापार व वाहतूक केंद्र आहे.
इथले सर्व आर्थिक व्यवहार हे 'दिऱ्हम' मध्ये चालतात. हे इथले चलन आहे. एक दिऱ्हम म्हणजे २२ भारतीय रुपये. हा दर दररोज बदलत असतो. इथे कमीत कमी ५ दिऱ्हम ला चहा मिळतो. वेळेच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर,भारतात ज्यावेळी सायंकाळचे ६ वाजून २० मिनिटे झालेली असतात, त्यावेळी दुबईत सायंकाळचे ४ वाजून ४७ मिनिटे झालेली असतात. म्हणजेच भारतातील वेळेपेक्षा १ तास ५५ मिनिटे दुबईमधील वेळ पाठिमागे असते.
शारजहाहून दुबईकडे येताना एकाही रस्त्यावर, चौकातील सिग्नलवर वाहतूक वा कोणताच पोलीस दिसला नाही. एकही दुचाकी दिसली नाही. सिग्नलला वाहने थांबली असता, दोन वाहनांमध्ये आणखी एखादे वाहन बसू शकेल इतके समान अंतर थांबलेल्या प्रत्येक वाहनामध्ये पहायला मिळाले.
या विषयी अधिक माहिती मिळवली. रस्त्यांवर, जागोजागी उच्च प्रतिचे आधुनिक क्षमतेचे कॕमेरे लावण्यात आले आहेत. याचे निरिक्षण आणि नियमन पोलीस नियंत्रण कक्षातून चालते. हे कॕमेरे, इथले कडक कायदे-नियम, जबर दंडात्मक, शिक्षा, कडक अंमलबजावणी यामुळे धाकात असणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त लावून घेतली आहे. याच गोष्टी पोलिसांचे काम करतात.
वाहन चालवण्याचा परवाना प्रशिक्षण संस्थेभमार्फत चोख प्रशिक्षण पूर्णतेनंतर दिला जातो. मागील वाहनातील चालकाला पुढे थांबलेल्या वाहनाचे मागील दोन्ही चाके दिसावित, इतके अंतर असायला हवे. हा इथला दंडक आहे. ज्येष्ठ नागरिकच काय इतर कुणीही व्यक्ती समोरुन आडवी चालत जात असेल, तर वाहन चालकांने वाहन थांबवून प्रथम त्याला मार्गस्थ केल्यानंतर पुढे जायचे आहे. यातूनही एखाद्याने नियमांचा भंग केला, तर नियंत्रण कक्षातून संबंधित वाहनावर दंडाची रक्कम नोंदवली जाते. दरवर्षी वाहनाची नोंद करावी लागत असल्याने, वर्षभरातील जबर दंडाची वसुली शिवाय वाहनाची नोंद होत नाही, तोपर्यंत परवाना आणि वाहन जप्त केले जाते. रस्त्यावर वाहनाकडून झालेल्या नियमभंगाबाबतही नियंत्रण कक्षातून मिळालेल्या संदेशानुसार अवघ्या ५ मिनिटात फिरते पोलीस वाहन संबंधित ठिकाणी पोहचते. त्याचबरोबर हे फिरते वाहन आजू-बाजूच्या वाहनांचा नंबर प्लेट सातत्याने स्कॕन करत असल्याने त्या वाहनाची इत्यंभूत माहिती मिळत असते.
आपल्याकडील अनुभव वेगळा आहे. शहरात- चौकात येणाऱ्या वाहनाचे पासिंग कोणते आहे? यावर पुढील वाटचाल ठरते. कमी जास्त प्रमाणात हा प्रत्येकाला आलेला अनुभव असावा.
प्रशस्त आणि चकाचक रस्त्यांवर कुणीही पिचकाऱ्या मारण्याचे धाडस करत नाही. कारण आपल्यासारख्या जागोजागी विखूरलेल्या पान टपऱ्या इथे दिसत नाहीत. आणखी जबर दंडाची भीती ही आहेच. वस्तू डिलिव्हरी करणारी मुलं फक्त दुचाकीवरुन जाताना दिसली. ज्यांच्या दुचाकी आहेत, त्यांनी केवळ अंतर्गत रस्त्यांवर ती चालवायची आहेत. प्रशस्त चार-सहा लेन वर 'सार्वजनिक वाहतूक' यंत्रणेसाठी राखीव लेन आहेत. यामध्ये इतर वाहनांना प्रवेश नाही.
महिलांच्या छेडछाडीविरुद्ध तर आणखी कडक कायदे आहेत. याबाबत संबंधित महिला जोपर्यंत माफी करत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. पोलीस आरोपी विरोधात त्यांच्या कायद्याची जबर अंमलबजावणी करतात.
©️ प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937
Comments
Post a Comment