पर्यावरणपूरक सायकलींना चालना


         
          शारजहा विमानतळावरुन जिथे आम्ही सर्व पर्यटक या सफरीत मुक्कामी राहणार होतो, त्या दुबईमधील 'आॕर्कीड व्ह्यूव हाॕटेल' मध्ये पोहोचलो. भारतात दिवाळी संपून महिना उलटला, तरीही दुबईत शिरताना अद्यापही अनेक ठिकाणी चक्क दिवाळी सणाची झगमगाट पहायला मिळाली. अनेक इमारतींमधील फ्लॕटच्या गॕलरीवर विद्युत दिव्यांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. त्या चमचम करत होत्या. काही ठिकाणी परंपरागत, तर अनेक ठिकाणी विजेच्या दिव्यांचे आकाशकंदील टांगलेले होते. दिवाळीच्या वातावरणात असल्याचे पुन्हा एकदा जाणवले. याची आणखीही पुष्टी अशी होती, आम्हा पर्यटकांच्या मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे अनेकांकडे फराळाचे पदार्थ प्रवासात खाण्यासाठी सोबत होते.
          दुबईमधील या दिवाळीसणाबरोबरच येथे 'सिंध पंजाब रेस्टाॕरंट, 'श्रीराज लस्सी', 'रंगोली', 'सुपर मार्केट', 'बाॕम्बे बाइट' अशी ओळखीचे हाॕटेल्स आणि दुकाने दिसलीत. या ठिकाणी पाणीपुरी, भेळ, ढोकळा यांच्या जोडीला राजस्थानी-गुजराथी थाळी होती. रंगोलीमधील मालक, काही कर्मचारी चक्क आमच्याशी मराठीत संपर्क साधत होते. सुपर मार्केट चालवणारे केरळ आणि उत्तर प्रदेशमधील आपले नागरिक भेटले. गोल्डसौकमध्ये तर संगमनेर, औरंगाबाद मधील व्यक्ती भेटल्या.
       दुबईमध्ये एका अर्थाने दुसरे भारत दर्शन होत होते. याचे प्रमुख कारण म्हणजे जवळपास ७० टक्के भारतीय दुबईत आहेत. याबरोबरच पाकिस्तानी, नेपाळी, बांग्लादेशी व अन्य इतर देशातील देखील आहेत. हे सर्वजण अगदी गुण्या-गोविंदाने राहतात. इथे कधीही भारत-पाक क्रिकेट सामान्यावरुन फटाके लावले जात नाहीत.भांडण-वाद तर खूप दूरची गोष्ट! हे सर्वजण आपापल्या कामाशी जोडले गेले असल्याने ते कामाशी काम ठेवतात. शिवाय येथील कायद्याचा धाक हा वेगळा आहेच.
       मुख्य बाजारपेठ विशेषतः खाऊ गल्ली, इलेक्ट्रॉनिक्स व अन्य वस्तूंसाठीचा मीना बाजार हा रात्री उशिरापर्यंत सुरु असतो. इथे ज्येष्ठ नागरिक वा एकटी महिला आरामात फिरु शकते. त्यांना काही अडचण आल्यास ९९९ या क्रमांकावर संपर्क साधल्यास, पोलिसांचे वाहन काही वेळातच येते आणि संबंधिताला त्याच्या घरी पोहचवते.
          या बाजारात येणाऱ्या वाहनांसाठी देखील महानगरपालिकेने मोकळ्या जागेत पे-पार्कींग सुविधा दिली आहे. ती देखील आॕनलाईन ! या ठिकाणी एक मशीन उभे करण्यात आले असून, त्याच्या डोक्यावर सौर पॕनेल आहे. त्यामुळे त्याला सूर्याबापासून ऊर्जा मिळते. या मशिनवर 'पार्क अँड पे इज अ व्हाटस अॕप अवे' असे लिहिले आहे. तसेच त्याच्या वापराविषयीही! यात योग्य दिऱ्हम ची नाणी टाकल्यास, वा प्रिपेड कार्ड स्वाईप करुन आपल्या वाहनाचा क्रमांक भरल्यास अथवा अॕपवरुनही वाहन तळाची आपली जागा ठराविक कालावधीसाठी मिळते. चुकून एकाद्याने तसेच वाहन लावल्यास त्याची नोंद वाहनाच्या खात्यावर होते. शिवाय महापालिकेचा निरीक्षक तपासणी करतो. त्यामुळे अतिरिक्त दंडापासून सुटका अजिबात नसते.
          दुबई शासनाने इथे पर्यावरणपूरक बॕटरीवर चालणाऱ्या सायकलींना आणि वातानुकूलित सार्वजनिक वाहतूक यंत्रणेला मोठी चालना दिली आहे. जागोजागी या बॕटरीवर चालणाऱ्या सायकलींचे चार्जिंग स्टँड आहेत. एखाद्याने या स्टँडवर जायचे. चार्ज झालेली सायकल घेण्यापूर्वी आपले प्रिपेड कार्ड स्वाईप करायचे वा अॕपवरुन प्रक्रिया पूर्ण करायची. आपला सायकल प्रवास संपल्यानंतर जवळच्या स्टँडवर सायकल पुन्हा ठेवून द्यायची. सर्व व्यवहार प्रामाणिकपणे आणि खात्रीशीर तोही विना मनुष्यबळाच्या जोरावर अगदी आॕनलाईन. हे इथले आणखी एक वैशिष्ट्यं म्हणावे लागेल. या उलट भारतात रेल्वे शौचालयामधील 'मग' ला जाडजूड साखळदंडाने जखडून घालावे लागते. यावरुन मानसिकता समजून येते. या सायकलींना पादचारी मार्गावरुन जाण्यास मुभा देखील आहे. पादचारी मार्गावरील उंची गाठण्यासाठी त्यासाठी चढणाची छोटी सोय दिली आहे.
       आखाती देशातील एक पेट्रोल-डिझेल उत्पादक देश असूनही, त्याचा वारेमाप अपव्यय न करता आपसूक मिळणाऱ्या सूर्यकिरणांचा वापर यासाठी खर्ची घालत आहे.
  मोठ्या प्रशस्त रस्त्यांवर अजिबात कोठेही धूळ दिसत नव्हती. जागोजागी कचराकुंड्या ठेवलेल्या. सफाई कर्मचारी वेळच्या वेळी येवून यातील कचरा घेवून जात. कमी परंतु योग्य मनुष्यबळाच्या जोरावर दुबईने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, दोन्ही अंगांनी आपले उत्पन्न वाढवले आहे. आपल्याकडेही या सर्वांचा विचार होणे आवश्यक आहे.
            *©️ प्रशांत सातपुते*
p7sons@gmail.com             
           9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..