'डाऊ' क्रूझवरील 'तनोरा' नंतर 'सैराट'

अरेबिक भाषेत लाकडाला 'डाऊ' असे म्हणतात. दुबईत आलेल्या पर्यटकांसाठी इथली सांस्कृतिक कला, सोबत खाद्य परंपरा याचा खास शो ज्याला 'तनोरा' असे म्हटले जाते. हा तनोरा 'डाऊ क्रूझ' वर अर्थात संपूर्णपणे लाकडी नावेवर  असतो. समुद्रात जमीन निर्माण करुन त्यावर उंचच उंच इमारतींचे मनोरे उभे करुन साऱ्या विश्वाचे आकर्षण केंद्र ठरलेल्या दुबईने, आवश्यकतेनुसार समुद्राचा काही भागही शहरात वळवून कृत्रिम पुळण अर्थात बीच बनवला आहे. याच वळवलेल्या समुद्री पाण्यावर विजेच्या दिव्यांनी सजलेल्या झगमगाटात 'ओबेराय प्रिमियम'ही 'डाऊ क्रूझ' तरंगत होती. तिच्यात एकेक पर्यटक प्रवेश करत होता. 'तनोरा' च्या सादरीकरणातून पर्यटकांवर मोहिनी घालण्यासाठी ती आता तयार होत होती.
          आम्ही डेकवर पोहचलो त्यावेळी आकाशात चंद्र देखील आमच्याशी सोबत करत होता. मधूनच थोड्या-थोड्या वेळाने त्याला झाकोळून विमाने उडाण करत होती. जणू, काही क्षणाकरिता चंद्रचा लपंडावच.     
      
             आता क्रूझवर 'डिजे' ने आपला मोर्चा जमवला होता. _"लो सफर शुरु हो गया..हमसफर तू हो गया.."_  बागी-२ चित्रपटातील जुबीन नौटियाल शांत स्वरात गायलेले गीत सुरु झाले आणि त्याला साथ करत 'ओबेराय प्रिमियम' डाऊ क्रूझ आम्हाला घेवून तितक्याच मंद गतिने विहारत होती.
        आता पर्यटकांची कुजबूज थांबत होती. परिसरातील मनोहारी क्षण बंदिस्त करण्यासाठी त्यांच्या हातातले मोबाईल कॕमेऱ्याच्या रुपात सरसावत होते. अरेबियन गत्रा घातलेला आणि विशिष्ट पद्धतीचा गोलाकार, पोपटी रंगाचा आणि त्यावर रंगी-बेरंगी त्रिकोणी नक्षीकाम केलेला झगा घातलेला कलाकार, दोन्ही हातात दोन रंगीत नक्षी रेखाटलेल्या डफल्या घेवून अवतरला. बाॕलीवूडचे गीत एव्हाना संपून अरेबियन गीताचे केवळ संगीत सुरु झाले. त्याची लय उपस्थितांच्या मनावर ताबा घेवू लागली.
         मघाशी आलेल्या 'त्या' कलाकाराने स्वतःभोवती गिरकी घेतली. अन् तो थंबायलाच तयार नव्हता. गिरक्यावर गिरक्या घेत अगदी भिंगरीगत फिरु लागला. आता सर्वांचे मोबाईल त्याच्यावर स्थिरावले. अचानकपणे आपल्याच कलेत तल्लीन झालेल्या त्या कलाकाराच्या हातातील दोन डफल्यांच्या तीन झाल्या..नंतर चार..थोड्या थोड्या वेळाने ही संख्या वाढून सहापर्यंत गेली. ती तो वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवून दाद मिळवत गेला. जसे संगीत उतरत गेले, तसे अरेबियन गीताने आपला स्वर चढवला.  गीताचे शब्द कळत नसले तरी ऱ्हीदम सुखावत होते. अगदी अतृप्तपणे..हवेहवेसे वाटावे इतपत. आम्हा भारतीयांबरोबरच नावेच्या डेकवर युरोपीयन, कोरियन व अन्य इतर परदेशी ही दिसत होते.
       मघाच्या 'त्या' कलाकाराने हातातल्या सर्व डफल्या सहायकाकडे देवून, तो पुढील कलेसाठी सरसावत होता. गिरक्या घेतानाच त्याच्या पोशाखावरील विजेचे बल्ब पेटले. त्याने त्याचा पोशाख उजळून गेला. गिरक्या घेता घेताच त्याच्या झग्याचा वरील एक गोलाकार भाग सुटा झाला. तो हातात घेत, आता दुसऱ्या अरेबियन गाण्यावर तो हाताच्या बोटांच्या सहायाने आपल्या डोक्यावर लयीत फिरवू लागला. गीताच्या वेगाबरोबरच त्याचा गोलाकार फिरवण्याचा वेगही वाढला होता. गाणे थांबले अन् तोही..! आता फक्त टाळ्या वाजत राहिल्या. त्याने पर्यटकांची मने जिंकली होती.
     *काठावरील चमचमणाऱ्या टाॕवरांचे पाण्यात सांडलेले प्रतिबिंब हेलकावत होते. दोऱ्याने गाठ मारावी, अशीच काही नक्षी असणाऱ्या पुलावर दुबई ध्वजाची रंगावट दिव्यांनी केलेली. त्याचेही प्रतिबिंब सांडलेले. हलक्या वाऱ्यात, मंद गीताच्या सुरावटीत आणि उल्हासीत मनांनी खास अरेबियन जेवणाचा पाहुणचार घेतला.
          तनोऱ्याच्या पाहुणचाराने तृप्त महाराष्ट्रातील पर्यटकांनी डिजे वर आता 'सैराट' लावले होते. चक्क त्या मराठी गीताच्या तालावर विदेशी पर्यटकही 'सैराट' झालेले.. तेही चक्क 'डाऊ क्रूझ' वर..!
    ©️ प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com             
           9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..