तोंग्बा: हिमालयाच्या कुशीतील उबदार आदरातिथ्य
'जे होतं ते चांगल्यासाठीच!' या उक्तीचा प्रत्यय कधी, कुठे आणि कसा येईल, याचा नेम नसतो. एव्हरेस्ट ट्रेकचे प्रवेशद्वार असलेल्या 'लुकला'च्या भूमीवर आमच्या बाबतीत नेमके हेच घडले. खराब हवामानामुळे आम्ही लुकलामध्ये अडकून पडलो होतो. काठमांडूला जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधत असताना, मनातील अस्वस्थता घालवण्यासाठी आम्ही स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारू लागलो. तिथेच आम्हाला तिथली लोकसंस्कृती आणि 'ड्युमजी' लोकोत्सव जवळून जाणून घेण्याची एक सुवर्णसंधी मिळाली. त्या रात्री हॉटेलच्या बाहेर दोन स्थानिक तरुण शेर्पा आम्हाला पुढच्या प्रवासाचे मार्गदर्शन करत होते. बोलता बोलता माझे लक्ष त्यांच्या हातातील एका वैशिष्ट्यपूर्ण पात्राकडे गेले. लाकडाच्या एका देखण्या पात्रातून ते दोघे अतिशय तृप्ततेने काहीतरी पीत होते. *कुतूहलाने मी विचारले, "हे काय आहे?" त्यांनी हसून उत्तर दिले, "ही आमची बिअर आहे. याला आम्ही 'तोंग्बा' म्हणतो!" *पूर्व नेपाळ, सिक्कीम, दार्जीलिंग आणि भूतानमधी...