प्रवास..आठवणींचा..!
आकाशातील विमानाचा आवाज कानावर पडताच क्षणी वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशी घरा-घरातून पोरं-टोरं बाहेर पडायचीत! त्यात मी ही एक असायचो. मग, अगदी खेळण्यातले वाटावे इतक्या छोट्या आकारातील ते आकाशात चमकणारे विमान बालपणी कौतुकानं पहात स्तब्ध व्हायचो. पांढरीधोट रेषा आकाशात काढत ते पुढं सरकायचं. कधी-कधी ते ढगांच्या आड गायब व्हायचं आणि पुन्हा दिसायचं. डोळ्यांच्या भिंगांवर उन्हं घेत मानंची दुर्बीण थेट आकाशात झेपावलेली असायची. अगदी नजरेआड होईस्तोवर हा कौतुकाचा अन् उत्सुकतेचा खेळ गल्लीत रंगलेला असायचा. रात्री अंगणात उताणा पडून आकाशातील विस्कटलेल्या चांदण्यातून दिव्याचा चमचमाट करीत पुढे जाणारे विमान पाहताना भारी मज्जा वाटायची. त्याचा लाल दिवा पेटायचा क्षणार्धात बंद व्हायचा..तो पुन्हा पेटायचा. अशी लाल दिव्याची उघड-झाप करीत तेही मग विस्कटलेल्या चांदण्यांच्या पसाऱ्यात कुठंतरी निघून जाई. आकाशाच्या निळ्या-काळ्या पाटीवर दिवसा पांढऱ्या रेघोट्या काढत जाणाऱ्या विमानाला आम्ही 'राॕकेट' म्हणायचो...