ग्रामीण संस्कृतीतील सांघिक किमया लाकडी पाटावरील 'शेवया'..
गुढी पाडवा आणि शेवयाची खीर हे समिकरण बालपणापासून बघत आलेलो. पोहे, उप्पीट. उकडलेली अंडी नाहीतर आम्लेट..या नेहमीच्याच नाश्त्यात बदल म्हणून शेवयाचे उप्पीट ! हा पर्याय रव्याला शेवयाने दिलेला. शिवाय तमाम गृहिणींचा नव्या पदार्थ बनवल्याचा, अविष्काराचा आनंद ! चारोळी, बदामाची शेवयाची खीर नेहमीच सुरुची जेवणाचे एवरेस्ट ठरणारी ! चायनीजच्या बाजारात, यंत्रांच्या गर्दीत अस्सल गावगाडा व्यवस्थेतील हातावरच्या, लाकडी पाटावरच्या लांब शेवयांचे धागे कधीच तुटलेले हे आज प्रकर्षानं जाणवलं. मार्च, एप्रिल परीक्षांचा कालावधी. शिवाय वाढत्या उन्हामुळे आमची सकाळची शाळा असायची. या काळात समस्त गल्लीत घरा-घरात ऐपतीप्रमाणे जमेल तसा पापड, तिखट सांडगे, सालपापड्या, कुरडया, चटणीसाठी लाल मिरच्यांचे वाळवण आणि लाकडी पाटावर शेवया वळण्याचा विशेष कार्यक्रम चालायचा. शेवया करणे हा तसा सांघिक कार्यक्रम असायचा. गल्लीत कुणाकडे तरी शेवयाचा लाकडी पाट असायचा. वर्षभर बिचारा धूळखात अडगळीत वा खुंटीच्या आधाराने अंगावर जर्मन, पत...