दुबईचा नवा चेहरा 'दुबई फ्रेम'

 गगनचुंबी हा शब्द खरोखरच सार्थ ठरवणारी दुबईच्या झबील पार्कमधील विशालकाय 'दुबई फ्रेम' ही वास्तू रचनाकाराने जगाला दिलेली एक अनोखी कल्पकता आणि कौशल्यमय देणगी होय.! तब्बल १५०.२४ मीटर म्हणजेच ४९२ फूट १०.९६ इंच आणि रुंदी ९५.५३ मीटर म्हणजेच ३१३ फूट ५ इंच आहे. त्यावरुनच तिची विशालता कळते. पूर्वी आपल्या घरी असणाऱ्या तसबिरीला जशी लाकडी फ्रेम असायची, असते अगदी तशीच असणारी ही फ्रेम होय! फक्त ही लाकडी नसून, चक्क २१ कॕरेट सोन्यापासून बनवलेली आणि दुबईचा भूतकालीन इतिहास, वर्तमान आणि येणाऱ्या ५० वर्षापुढील भविष्यकाळात नेणारी एक रचनात्मक वास्तू निर्मितीचा नमुना आहे. एकूणच 'दुबई फ्रेम मधून दुबई दर्शन' असेच म्हणावे लागेल.
          जगात सर्वाधिक मोठी असणाऱ्या या चौकटीचा मूळ सांगाड्यात अॕल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. त्यावर २१ कॕरेट सोन्याचा पत्रा या सांगाड्यावर बसवला आहे. जादूगाराच्या पोतडीतून निघणाऱ्या वस्तू पाहून विस्मयचकित व्हावे, अगदी तसेच ही फ्रेम अद्भूत, विस्मयकारी आणि माहितीचा खजिना असणारी आहे. फ्रेममध्ये जसाजसे आपण प्रवेश करतो,तसतसे तिच्या पोतडीतून नव-नव्या माहितीचा,मनोरंजनाचा आणि स्वप्नवत-आभासी परंतु, सत्यात उतरलेला-उतरणारा खजिना समोर येतो. फ्रेमच्या दोन्ही बाजूला उदवाहन अर्थात मोठी वेगवान 'लिफ्ट' आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वयंचलित सरकत्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावर सरकल्यानंतर दुबईचा प्राचीन मूळ इतिहास, लोक संस्कृती, तत्कालीन जडण-घडण याची माहिती प्रतिकृतीमधून देणारे संग्रहालय आहे. हा इतिहास जागवतानाच जुनी कृष्ण-धवल दृश्यं भिंतीवरुन सरकत पर्यटकांना त्या काळात नेतात.
       पुढे सरकतानाच आपलाही प्रवास मग हा थेट वर्तमानात पोहोचतो. उद़्वाहनातून थेट वर पोहचल्यावर, चौकटीच्या आडव्या जोडणाऱ्या सर्वात वरच्या बाजूला जगात प्रथम वापरलेले 'प्रेशर सेन्सीटीव्ह लुकीट क्रीस्टल' तंत्रज्ञानाची अनोखी अनुभुती मिळते. येथील 'वाॕक-वे ग्लास' वरुन चालताना, सुरुवातीला अपारदर्शक असणारी पायाखालची ही काच पाय पडताच पारदर्शक होते, अन् क्षणार्धात हृद्याचा ठोका वाढवते. आपण काचेवरुन चालतानाच तब्बल १५०.२४  मीटरवरील खालचे दृश्य पाहून धडकी भरायला होतं. हेच याचे खरे वैशिष्ट्यं आहे.
            *२००९ मध्ये 'न्यू फेस आॕफ दुबई' साठी स्पर्धा घेण्यात आली. यासाठी जगभरातून ९२६ वास्तू रचनाकारांनी आपली निर्मिती कल्पना सादर केली. मेक्सीकन रचनाकार फर्नांदो डोनीस यांनी सादर केलेल्या 'फ्रेम' च्या संकल्पनेने यात बाजी मारली. २०१३ मध्ये या फ्रेमच्या कामकाजाला सुरुवात झाली. सादर केलेल्या रचनाकाराच्या संकल्पनेतून २३० मिलियन दिऱ्हम खर्चून, अखेर साकारलेली ही फ्रेम 'बुर्ज खलिफा' नंतर खरोखरच 'दुबईचा नवा चेहरा' बनली. प्रत्यक्षात १ जानेवारी २०१८ पासून ही ,दुबई फ्रेम, पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
        चौकटीच्या एका बाजूला 'बर' अर्थात जुनी दुबई तर दुसऱ्या बाजूला उदवाहनातून खाली येताना नव्या दुबईचे दर्शन घडते. यापूर्वीच तेथील थ्री डी सादरीकरणातून ५० वर्षापुढील दुबईचा वेध दर्शवला जातो. ही आभासी वास्तविकता पाहताना आपण एकादा कलात्मकतेवर आधारित रंजनात्मक मनोराज्यावर आधारित कपोलकल्पित विदेशी चित्रपट पाहतोय की काय, असे वाटते. सगळंच कसं अगदी अद्भूत, स्वप्नवत, विस्मयकारी..पण वास्तवात उतरलेलं..उतरणारं..चौकटीतून चौकटीबाहेरच दाखवणारं..!
                    ©️ प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com             
           9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937
https://youtu.be/Tg40IsIVx9Q

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..