"दुबई गोल्डसौक" चे "नेत्रसुख"

          
आपल्या गावातील सोनार अळी असू दे नाहीतर सराफ कट्टा, जास्तीत जास्त मोठ्ठा सराफ बाजार..पै-पै साठवून गुंजभर सोनं घेण्याची भारतीय मध्यमवर्गीयांची पद्धत ! त्यापुढे जावून अगदी 'तोळा ते तोळे' सोनं खरेदी होतेय ती लग्नाच्या निमित्तानंच. दुबई म्हणजे सोन्याची खाणच. दुबई फ्रेम, शेख झायेद ग्रँड मस्जिद, बुर्ज-अल-अरब हाॕटेल अशा वास्तुंमध्येही सोन्याचा वापर केला आहे. सुवर्णभूमी दुबईमधील हा आहे "गोल्ड सौक" बाजार. दुबईमध्ये कशामध्येही सोन्याचा वापर करण्याची पद्धतच आहे.
        आपल्याकडील दुकानदाराच्या कपडे टांगण्याच्या सवयीप्रमाणे या बाजारात सोन्याचे दागिने प्रतिमांवर टांगले आहेत. यात सोन्याचे पोशाख, पर्स, मोबाईल कव्हर, दुपटे, शैला अर्थात महिलांसाठीचा मोठाला रुमाल, गात्रा अर्थात पुरुषांसाठी मुंडासं यांचा प्रत्येक दुकानात समावेश आहे.
          विविध कॕरेट सोन्याचा आजचा दर दर्शवणारा डिजिटल फलक दुकानात दर्शनी भागात लावलेला असतो. येथे केवळ १८ कॕरेटपासून बनवलेल्या दागिन्यांचे वेगळे दुकान पहायला मिळाले. तसेच १५ ग्रॕम वजनापासून पुढे असणाऱ्या दागिन्यांचे स्वतंत्रपणे दुकानं आहेत. या दुकानांचे आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे मालकापासून कामगारापर्यंत भारतीय विशेषतः केरळ, तामीळनाडू, पंजाबी या बरोबरच मराठी माणूसही आढळतो. अगदी संगमनेर, औरंगाबाद मधील व्यक्तीही येथे मला भेटली.
           हा भला मोठा बाजार फिरताना झालेल्या दमणुकीतून विश्रांतीसाठी जागोजागी लाकडी बाकडे ठेवली आहेत. भारतीयांप्रमाणेच अन्य परदेशी पर्यटक ही मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी करताना दिसत होते. दुकानदाराकडून ग्राहकांसाठी आदरातिथ्य होतानाही प्रकर्षानं जाणवत होते.
          येथील सजावट, प्रदर्शनातून जणू काही पृथ्वीवरील तमाम सोनं एकाच जागी खुलं केलं आहे, असंच वाटतं आणि हो येथे एकही पोलीस नसतो बरं का! त्याचं काम स्वयंशिस्त उत्तम क्षमतेचे कॕमेरे, कडक कायदे, त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जबर शिक्षेची भीती हे सर्वजण करतात.
       भारतात पूर्वी 'काठीला सोनं बांधून' फिरत असत म्हणे, आता जमेल तसं 'गाठी'ला सोनं बांधून ठेवण्याचा प्रघात रुढ झालाय. असो किमान सोनं खरेदीशिवाय दुबईच्या 'गोल्ड सौक'चे किमान 'नेत्रसुख' घ्यायला काय हरकत आहे..
        ©️ प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com             
           9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937
https://youtu.be/degVKR5_PxE

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..