चटका
माझ्या गावापासून वीसएक किलोमीटरवर इचलकरंजी हे गाव आहे. मी त्यावेळी बीएडला होतो. मला आजही आठवते. तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:ची ओळख करून देण्यासाठी पाच मिनीटे देण्यात आली होती. जेमतेम पाच फूट उंची, एकशिवडी देहयष्टी, काहीसे मळलेले, चुरगळलेले, कपडे आणि डाव्या पायाने लंगडत चालणारा एकजण समोर उभा होता. “मी विजय घोडके ! मंगळवेड्याचा..अं..” बोलताना तो कधी खिश्यात हात घाली. तर कधी दोन्ही हातांची बोटे एकमेकात मिसळे. दिलेला पाच मिनीटांचा अवधी निसटून जात असतानाच आणखी काय बोलायचे ? हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. एकाएकी आठवल्यागत करून तो म्हणाला, “दामाजीपंत तुम्हाला माहीत असतीलच..ते माझ्याच..म्हणजे मी त्याच गावचा..मंगळवेढ्याचा..” आणि त्याची पाच मिनीटे संपली. ‘बिदरच्या बादशहाच्या काळात मंगळवेढ्याचे तहसिलदार असणाऱ्या दामाजीपंतांनी दुष्काळात होरपळणाऱ्या आपल्या जनतेसाठी शिक्षेची पर्वा न करता, सरकारी धान्याचे कोठार उघडून दिले. इतकेच या निमित्ताने आठवले. मात्र, साक्षात पांडूरंगाने विठू महाराच्या रूपात बादशहाकडे जावून, सहाशे खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहर...