चांदीची 'ती' बटने..!
आठवडाभरापूर्वी सौ च्या वाढदिवसानिमित्त तिचे शिक्षक डाॕ. विजय माने, तिच्या वर्गमैत्रिणी डाॕ. पल्लवी आणि डाॕ. स्नेहल यांच्यासोबत २२ वर्षानंतर छोटेखानी कार्यक्रमात एकत्र आलो होतो. भोजनानंतर डाॕ मानेसरांनी सर्वांना आवर्जून मसाला पान खाऊ घातले. पानवाल्याने ही थंडगार गुलकंदी पाने चांदीच्या आवरणात बांधून ठेवली होती. आवरण उघडून आतील मधूर पानाचा आस्वाद घेतानाच, तांबूल सेवनाची चर्चा करत थेट लिळाचरित्रात पोहोचलो. म्हाईंभट, चक्रधरस्वामी असा प्रवास करत हातातील पानाच्या चांदीच्या आवरणात पुन्हा परतलो. लहानपणी मराठी शाळेत आणि अगदी माध्यमिक शाळेतील सुरुवातीच्या काही वर्गात असताना याच चांदीच्या कागदाच्या आठवणीत रममाण झालो. खरंतर हा अॕल्युमिनियमचा पातळ कागद ! परंतु, त्याला रुढ अर्थानं 'चांदीचा कागद' हेच नाव चिकटले आहे. ती चर्चा तिथेच संपली. पण, मी मात्र त्या आवरणाभोवतीच फिरत राहिलो. आवरण उघडून आतील मधूर पान तोंडात घालताच आपसूक क्षणभर डोळे मिटावेत आणि त्या तांबूलसेवनात काही काळ हरवून जायला व्हावे. गुलकंदाचा गोडवा ...