आधुनिक, स्वप्नवत सोबतच वसवली पुरातन दुबई.!
अंतराळात शिरणारा बुर्ज खलिफा, नवा चेहरा २१ कॕरेट सोन्याची फ्रेम, समुद्रात जमीन निर्माण करुन वसवलेलं जुमेराह पाम बीच, सप्त तारांकित बुर्ज अल अरब हाॕटेल, भविष्यकालीन वेध घेणारं अदभूत 'फ्युचर म्युझीयम' अशा आश्चर्यकारक वास्तू निर्माण करुन दुबईने आपली जगात खासियत जपली आहे. त्यासोबतच चक्क पुरातन दुबई वसवून आधुनिकतेला जुन्याची सांगडदेखील घातली आहे.
आभाळात डोके खुपसणाऱ्या इमारती बांधून जगाचे लक्ष वेधताना जुन्या परंपरेतील, संस्कृतीतील दुबईचे अस्तित्व दाखवणारी वसाहत नवा आयाम देत हुबेहूब साकारली आहे. जसं समुद्रात भर टाकून नवी वसाहत स्थापन केलीय, तसंच आवश्यक तेवढा समुद्राचा प्रवाह गावात आणून त्या काठावर ही पुरातन वसाहत बसवलीय.
अगदी आपल्याकडे जशी होती, अजूनही काही खेड्यांमध्ये असणारी ही गावसंस्कृती येथे देखील होती, ते यामधून पहायला मिळते. रात्री १२ वाजता येथे पोहोचलो. त्यावेळी दुकाने, बाजारपेठ बंद झाली होती. काही सुरु असणारी हाॕटेल बंद होत होती. मात्र, विजेचा झगमगाट तसाच कायम होता.
जुन्या काळातील लांबड्या लोखंडी बिजागऱ्यांची लाकडी फळ्यांची दुकानांची खास निर्मिती करुन बाजारपेठ वसवली आहे. खजुराच्या झावळ्यांचे छत असणारी घरे आणि वरच्या मजल्यावर जाणारा लाकडी जिना हा खास 'लुक' देवून उपहारगृहांची बांधणी केलीय. जुन्या काळातील कंदिलालाचे दिवस जाणवण्यासाठी त्याच्यातील विद्युत बल्बच्या प्रकाशात उजळणारे गाव वसवले आहे. दुकानांची, घरांच्या काही ठिकाणी पोपडे उडालेल्या पांढऱ्या मातीच्या दगडी भिंतीची नजाकत वेगळी दर्शवून जाते. टवका उडालेल्या, तडा गेलेल्या, मातीचा अस्तर निघालेल्या भिंतींचे जाणवण्या इतपत दर्शन घडते.
लाकडी खांबांवर टेकू देवून दुकानासमोरील ताडपत्री पसरलेल्या दुकानांची वेगळी रांग तयार केलीय. या दुकानांमधून सध्या किंमती माल विक्रीस ठेवला आहे. बाजारपेठेतील हमालाची माल वाहून नेणारी हातगाडी थांबलेली दिसली. मासेमारीची जाळी ठेवलेले लाकडी स्टँड आणि त्याखाली ठेवलेले होडीचे नांगर विशेष लक्ष वेधत होते. अशा अनोख्या रचनेतून जुने गाव नव्याने साकारत पर्यटकांसाठी पर्वणी दिलीय.
पुरातन दुबई साकारताना आतील व्यवहार, वस्तू, खाद्य पदार्थांचे प्रकार, ग्रासक सेवा या मात्र वर्तमान काळातील जपल्या आहेत. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील दुबई साकारुन एक नवं वेगळंपण जपलं आहे. वेळेची मर्यादा आणि नियोजित पर्यटन लक्षात घेवून पुन्हा कधितरी या वसाहतीत ग्राहक म्हणून लाभ घेण्यासाठी येवू, असे मनाशी ठरवून आम्ही रात्रीची दुबई न्याहळत हाॕटेलकडे परतलो.
©️-प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0cP1biyqi3He7yjCrbNY6zSABDpm8CxTZRXXyz3HnU7jLNoShfEw1TuZqzfNnB9kGl&id=100001067020937&mibextid=Nif5oz
Comments
Post a Comment