खीर..मोदक..रोट..मलिदा..अन् चोंगे..
बाप्पांचे आगमन म्हणजे आम्हा सर्व बालगोपाळांसाठी पर्वणी असायची. घरातल्या दिवळीत बाप्पांचे पाच दिवस वास्तव्य असायचे. कालांतराने माझ्या पुस्तकांच्या दरवाजा नसलेल्या कपाटातील पहिला कप्पा बाप्पांसाठी राखीव झाला. आदल्या दिवशीच हरळीकरांच्या रंगाच्या दुकानातून रंग आणून तो रंगवत असू. पुढे कित्येक वर्षी रंगाऐवजी वायचळच्या दुकानातून रंगीत गोटीव ताव, वेगवेगळ्या रंगांचे, चमकदार कागदांच्या आणि पुठ्ठा, थर्माकोलच्या सहाय्याने खास बाप्पांसाठी आरास करण्यात मी गुंतलेला असायचो. सुंदर रांगोळी काढायचो. साक्षात गणेशाचे आगमन झाले तरीही संध्याकाळपर्यंत सजावट ही सुरुच राही. आईने खपली गव्हाची खीर, मोदक, आळुच्या वड्या, पापड, हळद घालून केलेला पिवळा भात असे पदार्थ बनवलेले असत. मी या कामात आईला त्यावेळी मदतही करायचो. खरे तर या गोड-धोड पदार्थांच्या रेलचेलीमुळेच बालपणी बाप्पांचा उत्सव मला पर्वणी असायचा. संध्याकाळी खास आरतीच्या निमित्तानं मित्र-मंडळी जमत. चिरमुरे-बतासे-खोबऱ्याबरोबर प्रसाद म्हणून खीर, मोदक आणि तोंडी लावायला चविष्ट आळूची वडी ठरलेली असे. मग, आरतीसाठ...