अशक्य हा शब्द दुबईच्या शब्दकोशात नाही..

          सिद्धार्थ टूर्स अॕन्ड ट्रॕव्हल्सकडून ठरलेली स्थळं दररोज दाखवण्यात येत होती. संध्याकाळी आॕर्कीड व्ह्युव्ह हाॕटेलवर आल्यावर मी आणि सौ रात्री उशिरापर्यंत पुन्हा दुबई जेवढी पाहता येईल तेवढी हावऱ्यासारखं पाहून घेत होतो. कधी सोबत बंधू निखील तर कधी ब्रिजकिशोर राठौरसर, रेखा राठौरमॕडम हे असायचे. बाजारपेठेतील विक्रेत्यांशी दुकानदारांशी बोलून माहिती घ्यायचो.
          खास करुन इथली राजेशाही, शासक, जनमत आणि कायदे व अंमलबजावणी याबाबत केवळ आजवर ऐकून होतो. शारजहा विमानतळावर उतरल्यापासून ते अगदी रास-अल-खैमाह आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मायदेशी परतेपर्यंत एकाही चौकात, हमरस्त्यावर 'समर्थ साथ, खंबीर नेतृत्व, आमचे मार्गदर्शक, वा कर्तव्य अन् जबाबदारीच्या मार्केटींगचे' आपल्याकडे सर्रास दिसणारे एकही फ्लेक्स दिसला नाही. दिसले ते केवळ दोनवेळा संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, दुबईचे शासक आणि राजे शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे केवळ डिजिटल छायाचित्र!
       डेझर्ट सफारीला जाताना एके ठिकाणी समोरील वाहन पाठिमागे येत असताना आमच्याच चालकाने वाजवलेला हाॕर्न सोडला तर आठवड्याभरातील दुबईतील वास्तव्यात एकदाही कोणत्याच रस्त्यावर वाहनाचा हाॕर्न ऐकायला मिळाला नाही. इथे रस्त्यावर पोलीसच नसल्याने, आपल्यासारखे वाहनाचे पासिंग बघून कार्यवाही करण्याची तत्परता नाही.
   हाॕटेल वा गोल्डन सौकमधील काही दुकानात त्यांच्या लावलेल्या तसबिरी पाहून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली.
          
      संरक्षण मंत्री असूनही शेख यांच्या ताफ्याचा तामझाम-डामडौल नसतो. एखादी सुरक्षा रक्षकांची गुप्तपणे वावरणारी गाडी सोडली तर ते सर्वसामान्य जनतेप्रमाणे रस्त्यावरुन कोठेही फिरत असतात. कधी-कधी ते स्वतः वाहन चालवताना दिसतात.
         एखाद्या सरकारी कार्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रलंबित कामाबाबत माहिती घेतात. वावगं, खोटं आढळल्यास तो अधिकारी शिक्षेस पात्र ठरतो. तसंच ते दुकानांत, हाॕटेलमध्येही शिरुन व्यावसायिकांकडे अडचणीबाबत, मागणीबाबतही विचारपूस करतात. जनतेच्या भावना जाणून जगात देशाला सर्वोत्तम ठेवण्याचा मार्ग त्यांनी कृतीतून दाखवला आहे. ज्याला आपण मृगजळ म्हणू ते स्वप्न अनेक जगविख्यात इमारती, हाॕटेल, प्रकल्पातून वास्तवात उतरवले आहे. भविष्यातील दुबई कशी असेल, त्याचे 'फ्युचर म्युझीयम' तयार केले आहे. ही देखणी इमारत केवळ आणि केवळ पहातच रहावी अशी बांधलीय. भन्नाट संकल्पनेला वास्तवतेची जोड देणारा राजा सकाळी नियोजित वेळेत जनतेला भेटण्यासाठी तत्पर असतो. त्यामुळेच इथल्या जनतेलाही ही राजेशाही प्रिय आहे. पर्यटनाला चालना देत अनोख्या कल्पना राबवून देशाचे उत्पन्न वाढविले आहे. त्याचे कोठेही अजिबात मार्केटींग दिसले नाही.
          *बुर्ज खलिफाच्या भेटी दरम्यान _"The word impossible is not in the leaders dictionaries. No matter how big the challenges, strong faith, determination and resolve will overcome them-"_ Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum. (अशक्य हा शब्द नेत्यांच्या शब्दकोशात नाही. कितीही मोठी आव्हाने असली तरी दृढ विश्वास, दृढनिश्चय आणि संकल्प त्यांच्यावर मात करेल- शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम). या ओळी खूप काही सांगून जातात.
      अबुधाबी येथील ग्रँड झायेद मस्जिद मधील पुस्तक स्टाॕलवर 'राष्ट्रपिता- शेख झायेद बिन सुलतान अल नह्यान यांचे कोट्स' असं पुस्तक होतं. तर दुबई फ्रेम पाहताना, _'The worthy man..is the one who works for the Advancement his country and add new glory to those achieved by'- sheikh rashid bin seed al maktoum_(योग्य माणूस तोच असतो, जो आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करतो आणि मिळवलेल्या गोष्टींमध्ये नवीन वैभव वाढवतो-- शेख राशिद बिन सईद अल मकतूम) याही ओळी खूप काही शिकवून जातात.
        देशात सर्वाधिक भारतीय आहेत. इतर देशातून दुबईत येणाऱ्या व्यावसायिकांना  स्थानिक लोकांना सोबतीला घ्यावे लागते. त्यामधून त्यांच्या उत्पन्नाची सोय केलीय. तसा नियमच आहे. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हायटेक यंत्रणा उभी केलीय. अत्यंत संवेदनशील कॕमेरे पोलिसांचे अचूकपणे काम करतात. देशातील कडक कायदे आणि त्याहून त्याची कडक अंमलबजावणी या दोघांच्या भितीने जनतेला, येणाऱ्या पर्यटकांना लागलेली स्वयंशिस्त या देशाला वेगळ्या उंचीवर नेताना दिसते. स्वप्नवत, जादूई नगरी सत्यात उतरलेली दुबई पाहून खरोखरच त्यांच्या शब्दकोशात 'अशक्य' हा शब्द नसावा..असे वाटते.
       आपल्या देशासाठी आपण काय केलं पाहिजे याचे प्रबोधन खूप झालंय. गरज आहे, ती केवळ ठोस कृतीची! आपल्याकडेही उत्तम कायदे, नियम आहेत. त्यासाठी आवश्यक आहे, ती जबर मानसिकतेची आणि सर्वांच्याच स्वयंशिस्तीची! त्यासाठी प्रत्येकानेच स्वतःपासून पाऊल उचलायलाच हवे.
     ©️ प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com             
           9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid023dC2z9a8h5iUrHiyzQwXvj8WGK7ZeyWyQgnhwC5GcB7BpajGsU8bG3DQNRDbRZHkl&id=100001067020937&mibextid=Nif5oz

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..