Posts

Showing posts from June, 2024

एक मंतरलेली सांजवेळ..

Image
' पडू की नको..'अशा द्विधा अवस्थेत काळवंडलेला..जलबिंदूंचा ढिगारा पदराच्या ओटीत घेवून, ढगांचा मांडव आकाशात पसरत होता. 'म्हातारीचे केस' हवेवर भूर्कन उडून जावेत, तसा हा पदर पुढे पसरत होता. जलकणांचे गाठोडे मात्र, घट्ट बांधून घेवूनच.! त्याच्या पसरण्याने, पुढे पळण्याने मांडवाचे छत फाटून त्याला सुरुवातीला सांदर, झरोका अन् पुढे भगदाड पडत होते. निळे-पांढरे आकाश भगदाडातून पृथ्वीला भुलावत होते. आमचा सूर्याबा या झरोक्यातून मधूनच मिचकावून जात होता. जणू मार लागून झालेल्या काळ्या-निळ्या ढगात लालसर सुजेची झाक देत एकदम गडप होत होता. काही क्षण तो गायब तर, त्याचे दूत किरणं कवडस्यातून ढगांना फाकत समोर ठाकलेली. हे मनोहारी दृश्य होते.          अशा या रम्य सांजवेळेची साक्ष होत, मी आणि सौ. पक्षांच्या ओढीने पुढे निघालो. पक्षांच्या विणीचा हंगाम असल्याने, कंठ फुटलेला काळाकुट्ट लाल डोळ्यांचा #कोकीळ  #asiankoel जोडीदाराला जागोजागी साद घालताना ऐकू येत होता. या झाडावरुन त्या झाडावर उडताना दिसत होता. कावळ्याशी मध्येच भांडत होता. त्याला आपल्या मागे यायला लावून बेरकीप...