रानमेवा..नेर्ली..
रत्नागिरीहून घाट चढून आंब्यात आलो. नेहमीप्रमाणे आंबेश्वर टपरी वजा हाॕटेलजवळ चहासाठी थांबलो. चहाची लज्जत घेतानाच हातामध्ये जर्मनी झाकणावर गुलाबी रंगाची वाटोळ्या आकाराची छोटी फळे घेवून एक बाई समोर आलेली.'नेर्ली घ्या की..रानची..' असे ती आर्जवू लागली. ते फळ माझ्यासाठी नवे होते. मी भोकरं, तोरणं, अळू, पिवळ्या निंबोण्या असली फळं बालपणी खाल्लेली. तिने सांगितलेले पैसे देत ते दोन्ही वाटे विकत घेतले आणि जयसिंगपूरला परतलो. जिज्ञासूवृत्तीने 'नेरल्या'च्या माहितीचा शोध सुरु झाला. ती मिळवल्यानंतर म्हटलं एकादा लेख लिहून टाकू.. फेब्रुवारी-मार्च सुरु झाला की निसर्गाच्या पोटातून रानमेव्याच्या जन्मोत्सवाला सुरुवात होते. प्रथम प्रसवते ती आमराई..घसाने लगडलेल्या कच्च्या कैऱ्यांच्या आठवणीनेदेखील तोंडाच्या द्रोणात लाळेचा पाझर सुरु होतो. करवंदांच्या हिरव्या-पोपट्या जाळीवर पांढरी फुले मंद फुलाने करवंदाच्या आगमनाची चाहूल देतात. अशा एकापाठोपाठ एक येणाऱ्या रानमेव्यांचा प्रवास सुरु होतो. ...