जगात जे-जे पिकतय त्यातील सर्वोत्तम इथे विकतय
आपल्या कृषीप्रधान विशाल भारत देशातील आणि छोट्या पण वाहतूक आणि व्यापार केंद्र असणाऱ्या दुबईमधील फळ-भाजी मार्केट कसे असेल? हा कुतुहलाचा प्रश्न होता. या प्रश्नाची उकल करण्यासाठी रात्री उशिरा फळ-भाजी मार्केटमध्ये पोहोचलो. मासळी बाजारप्रमाणेच हे ही एक विस्तीर्ण माॕल सदृश्य एकदम मस्त मार्केट होते. जगभरातून इथे मोठी आवक होताना दिसली. जागोजागी कलिंगडे, टरबूज-खरबूज, द्राक्षे, डाळिंबे, केळी, हिरवी आणि नेहमीच्या लालसर रंगातील सफरचंद, अंजीर, पेरु, आॕलिव्ह, चिंच, अलबुखार अशी नानाविध फळांची ढिगारे रचलेले दिसत होते.
इथल्या बाजारात येणाऱ्या फळांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्यं म्हणजे भारत, चिन, इराण, इराक, अफगाणिस्तान, थायलंड अशा कितीतरी देशातून अगदी सर्वोत्तम दर्जाची, आकाराची, क्षमतेची फळे, फळ भाजी विक्रीस आलेली होती. विविध देशातून आलेली कितीतरी प्रकारची मधाळ द्राक्षे होती. आपल्याकडे सर्वसाधारण आकारात असणारी ही सर्वच फळे इथे मात्र, नेहमीपेक्षा कितीतरी मोठी होती.
अगदी द्राक्षांचा आकार देखील! बाजूलाच फळ भाजी मार्केट होते. इथे चिनचा कांदा हा खरबुजसारखा तर लसूणच्या एका पाकळीचा आकार हा छोट्या कांद्यासारखा होता. डाळींबदेखील खरबुजाच्या आकाराचे होते. याचाच अर्थ असा होता, 'जगात जे-जे पिकतय त्यातील सर्वोत्तम इथे विकतय.'
एका बाजूला खजुरासह सुका मेवा विक्रीस आलेला. इथे आंबा देखील होता. तो स्लाईसमध्ये कापून साखरेत वाळवून विक्रीस ठेवलेला होता.
आपल्याकडील बाजारासारखेच भोपळा, टोमॕटो, काकडी, विविध रंगातील ढब्बू मिरची, पालेभाज्या या येथेही विराजमान झालेल्या. या फळ-भाजी मार्केट आणि आपल्याकडील बाजारात फरक फक्त एवढाच होता, अगदी स्वच्छ, चकाचक आणि वातानुकुलित वातावरणात हे मार्केट निर्माण केलेले. विक्रेतेही टापटीपतेत, कोणीही काहीही चघळत नव्हते. त्यामुळे इकडेतिकडे पचापच थुंकायचा प्रश्नच इथे नव्हता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फळांवर 'क्यू आर' कोडची लेबले चिकटवण्यात आलेली दिसत होती. रात्री उशिरापर्यंत हा बाजार सुरु होता. काही द्राक्षे, खजूर खरेदी करुन बाहेर पडताना एके ठिकाणी शहामृगाचे अंडे दिसले. ते पाहतोय तोवरच बाजूला कोंबडीची अंडी दिसली. ती पहात असतानाच गारिगोट्यांसारखी काहीशी वाटोळी निळसर, काळसर डाग असणारी अंडी देखील दिसली. त्याविषयी विचारले असता, 'ये क्वेल के अंडे है' असे त्याने सांगितले. अधिक माहिती घेतल्यावर आपल्याकडील सर्रास आढळणाऱ्या पोल्ट्रीसारख्या काही ठिकाणी क्वेल अर्थात बटेर च्या खास पोल्ट्र्या असल्याचे सांगण्यात आले. हा बटेर पालनाचा व्यवसाय आपल्याकडील अकोला, परभणी, सोलापूर अशा काही जिल्ह्यात केला जातो.
एकूण काय तर दुबईच्या या बाजारात जगातील सर्वोत्तम माल ग्राहकांसाठी आलेला होता, येत होता. कारण, सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे दुबई हे एक प्रमुख वाहतूक आणि व्यापारी केंद्र आहे.
©️ - प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02w591MeCGXwgSkm7MDiwzBWSPpK4cEN4ikYecwVbk6bLUtype81MABPiYHZCa2Ctal&id=100001067020937&mibextid=Nif5oz
Comments
Post a Comment