डेझर्ट सफारी, धाडसी फायर शो आणि बेली डान्स

        वाळवंटातील जहाज म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे उंट होय. खरंतर राजस्थानमध्ये सर्वत्र आढळणारी ही उंटावरील सफारी दुबईत मात्र, उंटासोबत छायाचित्रे काढणे इथपर्यंतच मर्यादित राहिली. आतापर्यंत केवळ चित्रपटात पाहिलेली 'क्वाड बाईक' आणि चार चाकी वाहनातून होणारी 'डेझर्ट सफारी' प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली.
          प्रत्येक वाहनात सहा पर्यटकांना घेवून चारचाकी वाळवंटी निघाली. मुंग्यांची रांग चालावी तशी सगळी वाहने सरळ एका रेषेत निघाली होती. पहिला पडाव पडला तो वैयक्तिक वा कपलसाठी असणाऱ्या क्वाड बाईकवरुन होणाऱ्या सफारीसाठीचा. त्यानंतर पुढे चारचाकी वाहनातून मरुभूमीतील सफारीसाठी निघालो. निघण्यापूर्वी चालकाने चाकातील हवा कमी केली. थोड्या वेळातच चाकांनी पिवळ्या-मातकट वाळूला स्पर्श केला. आता ती वाळूच्या टेकड्या, त्यावरील चढण आणि उतार यावरुन वेग पकडत धावत होती. आतमध्ये सीटबेल्टच्या कवेत बसूनही तो चढ-उताराचा, वळणा-वळणाचा जोरकस अनुभव आम्हाला मिळत होता.
        
वळणावरुन जाताना वाळूचा धुरळा उडत होता. एव्हाना सूर्याबा दिवसभर खेळून, दमून-भागून आपल्या घरी परतत होता. संधीप्रकाशाचं ते मोहक रुपडं डोळ्यात साठवत जणू त्याला निरोप देत होते. कमालीचं ते सौंदर्यवान दृश्य पाहून मन अजिबात भरत नव्हतं.*
          आता पुढचा प्रवास मरुभूमीतल्या खुल्या पटांगणाकडे सुरु होता. पुन्हा चाकात हवा भरलेली गाडी आता धावत होती.
          
पर्यटकांनी पटांगण तुडुंब भरत होते. एका बाजूला महिलांसाठी अरेबिक हिना अर्थात मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरु होता. उलट बाजूला पाणी, थंड पेय, चहा, काॕफी याचा स्टाॕल होता. दुसरीकडे गरमागरम भजी हो..भजी हा अस्संल मराठमोळा प्रकार खायला देत होते. मध्यवर्ती छोट्या उंचीच्या व्यासपीठाच्या चोहोबाजूला खास बसकन ठेवलेल्या होत्या. एकीकडे 'डिजे' तर दुसरीकडे खास 'शिशा' अर्थात हुक्का मिळत होता.
            बसकनच्या समोरील बऱ्याच मेजावर हा शिशा दिसत होता. जादूचा दिवा घासल्यावर जीन येण्यापूर्वी निघणाऱ्या धुराप्रमाणे, प्रत्येक झुरक्यागणिक निघणारा धूर हवेत पाझरत होता.
      
डिजे'च्या निवेदनानंतर प्रथम तनोरा या खास पारंपरिक कलेला सुरुवात झाली. स्वतःभोवती गिरक्या घेताना ते दोघे कलाकार आपली कला सादर करत होते. अगदी डाऊ क्रूझवरील तनोरा शो सारखीच!  त्यानंतर फायर शो ला सुरुवात झाली. तोंडामध्ये राॕकेल ठेवून हातातील पेटत्या पलित्यावर फुंकर घालून 'तो' आपली कला मेहनतीने सादर करत होता.
           पेटत्या पलित्यांचा रोळ मानेवरुन पाठीवर, पाठीवरुन हातावर अशा धाडशी प्रकारानं कलाकार उपस्थितांकडून दाद मिळवत होते. याच पेटत्या पलित्याने विविध कसरती दाखवून त्यांनी मने जिंकली होती.
         आता 'बार्बेक्यू' सुरु झाला होता. एका कोपऱ्यात शाकाहारी-मांसाहारी खाद्य पदार्थ दिले जात होते. पर्यटकांनी आपली ताटे मेजावर ठेवून बसकन घातली अन् 'बेली' डान्सला सुरुवात झाली. दोन ललना बेली नृत्याला साजेशा पोशाखात व्यासपिठावर अवतरल्या होत्या. अत्यंत सुंदर भासत होत्या. हिंदी, इंग्रजी आणि अरेबिक गाण्यावर त्या बेली डान्स करत होत्या.
          
हजारो हातातील मोबाईल उंचावले होते. जो तो नृत्याचा निसटत जाणारा हा पळ कॕमेऱ्यात कैद करत होता. साठवत होता. 'बेहद खुश' करणारे त्यांचे नृत्य संपले, तशी राहिलेली जेवणंही  उरकू लागली.
          विजेच्या झगमगाटातील सजावटीने आधीच भारावलेले पर्यटक फायर शो, बेली डान्सच्या सादरीकरणावर आणि बार्बेक्यूच्या उदरभरणानंतर तृप्त होत हाॕटेलकडे परतत होते.
         ©️ -प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com             
           9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid027PPFC2PsnaqmwWiCUvRB83hC4AjLYxRatVNYtyegxJAxz9EUQZt23qNJc2QCwi1l&id=100001067020937&mibextid=Nif5oz

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..