जगाच्या इतिहासातील अनोखा अविष्कार 'पाम जुमेराह' अन् 'बुर्ज-अल-अरब'
दुबईबरोबर बुर्ज-खलिफाचे आपसूक नाव सध्या जोडले जात असले तरी, या पूर्वीच जगातील महागड्या हाॕटेलांमधील एक 'बुर्ज-अल-अरब' हाॕटेलमुळे दुबईची जगात आधीच ओळख बनलीय. जगातल्या अनेक महागड्या शहरांपैकी एक शहर म्हणून दुबई चा उल्लेख होतो. तसेच जगातल्या अनेक उंची आणि महागड्या हाॕटेलपैकी एक हाॕटेल म्हणजे 'बुर्ज-अल-अरब' होय. 'अलिशान' हे विशेषणही त्याच्यासमोर 'टू स्टार' ठरावे, असे हे 'सप्त तारांकित हाॕटेल!
जहाजावरील शिडाच्या आकारातील हे हाॕटेल समुद्रात मानवनिर्मित जमिनीवर उभे राहिले आहे. आतील सजावटीत शुद्ध सोन्याचा अनेक ठिकाणी वापर करण्यात आला आहे. विमानतळावरुन 'रोल्स राईस' ने येणाऱ्या पर्यटकांसाठी असणाऱ्या सोयीबरोबरच थेट हेलिकाॕप्टरने आलेल्या पर्यटकांसाठी पाय उतार होण्यासाठी हाॕटेलच्या वरती खास हेलिपॕडची सुविधा केली आहे. प्रशस्त 'क्रीस्टल क्लिअर' समुद्र हे इथल्या समुद्राचे वैशिष्ट्यं म्हणावे लागेल. शांत, नितळ निळ्याशार समुद्राच्या प्ण्यात मासे दिसत होते. दुबईत जावून किमान या हाॕटेलच्या पार्श्वभूमीवर छबी टिपून घेण्याचा मोह कुणा पर्यटकाला झाला नाही, हे उंबराचे फूल पाहिल्यासारखेच म्हणावे लागेल. आम्ही सर्वांनीही मन भरुन ओसंडेपर्यंत छबी टिपून पुढे निघालो.
एकीकडे वाळवंट तर दुसरीकडे समुद्र असे भूभाग असणाऱ्या दुबईला कच्च्या तेल 'खनिजा' च्या 'खजिन्या'ने श्रीमंत केले. श्रीमंतीच्या आणि जगातल्या सर्वोत्तम वास्तू रचनाकारांच्या जोरावर समुद्रात पाय रोवत 'कृत्रिम बेट' निर्मिती केली.
बुर्ज-अल-अरब नंतर 'पाम जुमेराह' हे केवळ बेट निर्माण करुन न थांबता, त्यावर अत्यंत उंची हाॕटेल्स, महागडे बंगले यांची वसाहतच स्थापन केली. हा अविष्कार जगाच्या इतिहासात लक्षात राहणारा आहे.
समुद्राच्या पाण्यावर 'पाम ट्री आकारात' ही वसाहत निर्माण करणं म्हणजे पाण्यावर रेघोट्या मारुन चित्र काढण्याचा हा प्रकार होता. परंतु, 'अशक्य' हा शब्दच दुबईच्या शब्द कोशात नसल्याने ते केवळ आणि केवळ शक्य केले.
पाम बीच आयलँडच्या प्रवेशाद्वारातच पाण्यात सूर मारणाऱ्या शार्कच्या शेपटाकडील अर्धवट भागाची प्रतिकृती, त्यावर पाण्याच्या तुषारधारा अशी कल्पकता दर्शवली आहे. येथेच पर्यटक सुखावतो. प्रथमदर्शनी होणाऱ्या या अल्हाददायक स्स्वागताने मनमुराद रमतो.*
पाम-जुमेराह वसाहतीत अभिनेता शाहरुखचा बंगला असल्याचेही सांगण्यात येते.
या ठिकाणी असणाऱ्या सर्वच बंगल्यांना सागर किनारा असेल यासाठीच पाम झाडाच्या आकारातील रचना या कृत्रिम बेटात साकारलीय. अवकाशातून पाहिल्यावर हा 'पाम ट्री शेप' दिसतो. नजिकच हाॕटेल अटलांटीस हे दुसरे उंची अन् शानदार हाॕटेल दिसते.या मार्गावरुनच मोनोरेल मार्ग गेला आहे. दुबईत मेट्रो, ट्राम आणि मोनोरेल तीनही वाहतूक यंत्रणा या स्वयंचलित, मानव विरहित आहेत. हा आश्चर्यकारक धक्का होता. इथला पर्यटन अनुभवदेखील मनोमन सुखावून गेला.*
-©️ प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02RThbNVEUzhCJaabsA4ipJsQ6xnrCABeGZa4tH9vX33we5qtRpTous7T5ispGdrg4l&id=100001067020937&mibextid=Nif5oz
Comments
Post a Comment