मासळी बाजार..छे हो..स्वच्छ, प्रशस्त माॕलच..!
दुबई हे एक व्यापारी आणि वाहतूक केंद्र आहे. रात्री उशिरा मुद्दाम इथला मासळी बाजार पहायला गेलो. रात्री पावणेबारा वाजता पोहचलो. खरंतर येणाऱ्या उग्र वासावरुनच जवळपास असणाऱ्या मासळी बाजारचे अस्तित्व आपल्याकडे जाणवते. दुर्गंधी तर सोडाच, इथं एखाद्या माॕलमध्ये आल्याचे जाणवत होते.
बाजाराच्या प्रवेश लाॕबीत छतावर मास्याची सुंदर अंतर्गत सजावट केलेली. ही साजेशी कलात्मकता जाम आवडली. आत प्रवेश केला. सगळीकडे गारवा जाणवत होता. विक्रेत्यांचे ओटे एका ओळीत लावलेले. सर्वकाही चकाचक दिसत होते. कोठेही दुर्गंधी वा अवशेष-कचरा दिसत नव्हता. काही वेळातच मास्यांचा लिलाव सुरु होणार होता.
मोठ-मोठे विविध प्रकारचे मासे, बोंबील, कोळंबी, खेकडे, रंगीत शिंपले, आॕक्टोपस यांनी क्रेटच्या क्रेट भरले होते. बर्फाच्या अंथरुणावर हे मासे छानसे पहुडले होते. काही किंग फिश अर्थात सुरमई मास्यांवर बर्फाचे पांघरुण घालणं सुरु होतं. घरातील फिश टँकसाठीचा रंगीत मास्यांचा स्वतंत्र विभाग होता. तेथे छोट्या-मोठ्या टँकमध्ये गोल्डफिश बरोबरच अन्य हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी असे रंगीत मासे, प्रवाळ, खेकडेही होते. काचेच्या पेल्यातही एक-एक मासा ठेवलेला. तो त्यामध्ये मनसोक्त हुंदडत होता.
जवळपास पाच-साडेपाच फुटाचा सुरमई इथे पहायला मिळाले. छोटा शार्क, ट्युना, रेड स्नॕपर, पापलेट, बॕराकुडा, जॕपनिज लाॕबस्टर, मोठी कोळंबी, खेकडे असे नानाविध प्रकार सर्वत्र दिसत होते. मासेमारी जहाजातून अजूनही ताजे मासे येतच होते. दुसऱ्या बाजूला असाच प्रशस्त सुकी मासळी विक्री विभाग होता.
या मासळी बाजारला लागूनच विकत घेतलेले मासे साफ-सफाई करुन देणारे स्वतंत्र आणि अगदी प्रशस्त केंद्र होते. या ठिकाणीही कोणतीच दुर्गंधी येत नव्हती.
विकत घेतलेले मासे या केंद्रात आणून द्यायचे. हव्या त्या मागणीनुसार त्याचे कटींग करण्यासाठी ते पुढे पाठवले जातात. त्यानंतर अगदी बँकेत असणाऱ्या सुविधेप्रमाणे ग्राहकाला टोकन दिले जाते. हे टोकन घेवून ग्राहक समोर आसनस्थ होतो. समोरील डिजिटल फलकावर आपला टोकन क्रमांक पाहून काऊंटरवर पैसे देवून आपले सफाई झालेले, कटिंग झालेले मासे घरी घेवून जातो.
या ग्राहक सुविधेत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच, त्याच्या योग्य मागणीलाही दिले आहे. हे विशेषपणाने जाणवते. रात्री उशिरापर्यंत हे सर्व चालते. यात मोठ्या हाॕटेलचीही खरेदी झालेली असते.
बाजूलाच मटन आणि चिकन मार्केट म्हणजे तोही माॕलसारखाच प्रकार होता. येथे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, आॕस्ट्रेलियासह अन्य देशातील बोकड, मेंढी, बिफ यांचे मांस विक्रीला होते. शिवाय ते प्राण्याच्या अवयवानुसार स्वतंत्रपणे विक्रीसाठी ठेवलेले होते.
या बाजारचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गंधी विरहित कमालीची स्वच्छता आणि ग्राहकांचे हित हे असल्याचे प्रकर्षानं जाणवत होते.
©️-प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0RxXsuDP9Wzxvmicqc2jVg8MspbA6UmkgbgENY22X8SgZd4nwhLZW5ztCJoWuoseSl&id=100001067020937&mibextid=Nif5oz
Comments
Post a Comment