Posts

Showing posts from June, 2025

भांडीsss योsss…!

Image
        दररोज संध्याकाळी जीम वरुन परतताना एक मावशी डबे घेवून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फळवाल्याकडे ठेवून जायची. त्याच्याकडील रिकामे डबे घेवून माघारी परतायची. एकदा फळे घेताना तिची मुद्दाम चौकशी त्याच्याकडे केली. ती जेवणाचे डबे पुरविते, असे समजले. एके दिवशी तिच्याशी बोलल्यावर दररोजच्या डब्यांसह पार्टीच्या विशेष जेवणाची ऑर्डरही ती घेते, हे समजले. लगेचच कार्यालयातील सर्वांसाठी जेवण ठेवले आणि तिला त्याची ऑर्डर दिली. बडा खाना. त्यानंतर एके दिवशी ती कसल्यातरी दाखल्यासाठी आलेली. 'नेहमीसारखे आता संध्याकाळी दिसत नाही तुम्ही..' असे मी विचारताच, 'एका हाॕटेलवर कामाला जातेय', म्हणाली. 'डबेही पहिल्यासारखे नाहीत आता..पोटाला तीन मुलीच आहेत साहेब..' अशी तिने आपल्या परिस्थितीची कैफीयत मांडली. जाताना, 'मॅडमचे काही जुने ड्रेस असतील, तर देण्याची' तिने विनंती केली.          'सौ इंदौरला असते. मी गेलो की घेवून येईन..आठवणीने,' असे तिला आश्वासन दिले. मला माझे बालपण आठवले. माझ्याही घरी चौघींच्यानंतर आई-अण्णांना मी झालेलो. तिच्या परिस्थितीची मला जाणीव झाली. ...

माझ्या लेकरांनो.. पुन्हा या रे…आठवणींच्या उबीला भेटण्यासाठी ..बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये जमला 'दहावी 1992' चा गोतावळा

Image
      ए नानू..विनू..टक्कल पडली रे तुमची.. पण, अवखळपणा काही केल्या जात नाही तुमच्या अंगातला तुमच्या. संजू लेका सोड की तो खोडीलपणा..शिक जरा निर्मल आणि विनूकडून..दिपा, मनी, स्नेहल, वसू, वैशू तुम्ही पोरी मात्र, अजून तशाच तजेलदार, हसतमुख आहात बरं का. नाहीतर ही बाप झालीत तरी..अजून लहानच समजतात स्वतःला..वांडपणा करत असतात..!       आपला दाद्या गेला..कवू गेली..सुजाता गेली..दावल, सलिम गेला..सोन्यासारखी माझी एकेक पोरं काळानं मड्यावर घातली.. वाटोळ्ळं होईल त्याचं..त्याचा तरी काय दोष म्हणायचा..त्यांचा इथला शेरच संपला म्हटल्यावर..पण, पालनकर्ती का असंना..तुमची आई म्हणून काळीज तुटतं रं..माझं..असो..!     तुम्ही फार शिकला..मोठ्ठं झाला..बघून भारी समाधान वाटतंय. असंच एकमेकांची काळजी घ्या..माझ्या लेकरांनो..पुन्हा या रे..तुमच्या आईच्या पदराच्या उबीला मी वाट पाहीन..!    मी बळवंतराव झेले हायस्कूल शाळा ! 1964 सालचा माझा जन्म…जन्मापासून माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी असंख्य लेकरांच्या किलबिलाटाने आणि त्यांच्या उत्साहाने न्हाऊन निघाली ...

'कल्हई’ चा ढंगच न्यारा..!

Image
     ‘कल्हई’ करणार... तांब्या पितळेची भांडी कल्हई करुन देणार...चांदीचा रंग आणणार...' अशा आरोळ्यांनी गल्लीत झोपलेली दुपार जागी व्हायची. उंबऱ्याकडे लावलेलं उसं जागेवरच हलायचं.  जागेवरुनच मुंडी तिरपी करुन किलकिले डोळे बाहेर डोकावायचे.  फाटक्या बंडीतला, डोक्यावर मुंडासं गुंडाळलेला आणि धोतराच्या काचा गुडघ्यापर्यंत मारलेला अगतिक कल्हईवाला विनवणी करत दारात उभा राहिलेला दिसायचा.     कधी कधी हे चित्र उलटे असायचे. नागडं पोर काखेत मारुन, काळी पण, रेखीव चेहऱ्याची, जुनेर नेसलेली बाई आरोळी देत उभी असायची. मध्येच पोराचं गळणारं नाक डाव्या हाताच्या बोटांच्या चिमटीने क्षणात बंद करायची आणि बोटं जमिनीला मातीत, बाजूच्या भिंतीला नाहीतर कपड्याला पुसायची.        या आरोळ्यांनी गल्लीतील घरात हालचाल व्हायची. धूळ झटकत जुन्या कपाटातून, खुंटीवरील फळीवरुन वा माळ्यावरुन अडगळीतील पोत्यात कोंबून ठेवलेली तांब्या-पितळेची भांडी बाहेर काढली जात. यात विशेषत: पितळी पातेली, चुकून एखादा पितळी जेवणाचा डबा आवर्जून असायचा. गल्लीत एखाद्या लिंबाच्या, गुलमोहराच्या झाड...