बुर्ज खलिफा अन् रंगारंग शो

         दुबईचे नाव उच्चारताच त्या ओघानं चिकटतो तो अगदी अंतराळात शिरलेला बुर्ज खलिफा..! खरंतर या इमारतीमुळे दुबईला विश्व प्रसिद्धीबरोबर नवी ओळख मिळाली. त्याला साजेसा पायथ्याशी असणारा 'दुबई माॕल' आणि 'बेहद..तबियत खुश' करणारा तितक्याच ताकदीचा अरेबिक-हाॕलिवूड-बाॕलिवूड संगीतमय रंगीत कारंजा शो होय.
       प्राणी संग्रहालयात प्रवेश करताच कूठूनही जिराफाची मान दिसावी, अगदी तसेच दुबईत प्रवेश केल्यानंतर चित्ताकर्षक मनोहारी उंचच-उंच 'इमारतगर्दीत' हा 'बुर्ज खलिफा' स्थितप्रज्ञेसारखा नजरेस पडून खुणावत असतो. अंतराळात जाण्यासाठी एखादी शिडी भासावी, असे त्याचे ते टोकदार निमुळते होत गेलेले शीर्ष पाहून वाटते. गंमत म्हणजे कुठेही फिरताना त्याचे दूरवरुन दर्शन हे ठरलेलेच.
       या वास्तूला भेट देण्यापूर्वी पायथ्याशी विस्तारलेल्या देखण्या आणि कलाकृतीत अलिबाबाची गुहा असणाऱ्या दुबई माॕलला प्रथम भेट दिली. माॕलमध्ये प्रवेश करताच वातानुकुलित हवेचा हलका शिडकावा झाला. छतावरील आंतरिक नक्षिकाम लक्ष वेधून घेत होते. घरात असणारा फिश टँक डोळ्यांना आणि मनाला समाधान देतो. इथला भला मोठा फिश टँक म्हणजेच मत्स्यालय पाहताक्षणी अचंबित व्हायला होत होतं.
         काचेच्या पलिकडे निळ्याशार पाण्यात छोट्या मास्यांबरोबरच मोठे मासेही विहारत इकडून-तिकडे नुसते हुंदडत होते. त्यांच्यासोबत घेतलेल्या छबीनंतर सरकत्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावर आम्ही सरकलो. समोरील भिंतीवरुन होणारा जलप्रपात त्याच जलप्रपातच्या दिशेने सूर मारणाऱ्या मानवी प्रतीकृतींनी तो नजारा अधिक जिवंत करु पहात होता. याठिकाणी छबी टिपून आम्ही माॕलच्या बाहेर पडलो.
          
बुर्ज खलिफाच्या प्रांगणात बाॕलिवूडचे संगीत सुरु होते. समोर पर्यटकांची दाटीवाटी झालेली, कारंजाचा शो मोबाईलबद्ध करण्यासाठी हजारो हात हवेत उंचावलेले. संगिताच्या तालावर पाण्याचे असंख्य कारंजे लिलया नाचत-बागडत होते. बाॕलिवूड संपले आणि हाॕलिवूड सुरु झाले. इंग्लिश गाण्यावर नाचून ताजेतवाने झालेले कारंजे हिंदी गीतांवर अधिक उंचावत होते. बुर्ज खलिफा वास्तुला कवटाळण्यासाठीच. आता अरेबियन गीतांवर जणू कारंजाचा 'बेली' डान्स सुरु होता. 'शो' ने हरकलेले आणि आता बुर्ज खलिफाच्या १२५ व्या मजल्यावर जाण्यासाठी आतुरलेले पर्यटक लाॕबीत आले.
      सुरक्षा व्यवस्थेकडून तपासणी झाल्यावर अत्यंत वेगवान आणि मोठ्या क्षमतेच्या, दोन्ही बाजूने उघडणाऱ्या लिफ्टमध्ये आलो. येताना ही इमारत बनवतानाची रेखाटने, नकाशे, प्रत्यक्ष कामकाजाची क्षणचित्रे, प्रतिकृती-प्रतिमाने दिसत होती. काही प्रसंग डिजिटल-इलेक्ट्राॕनिक पडद्यावर साकारत होती.
      अवघ्या मिनिटाभरात १२५ व्या मजल्यावर पोहचून तेथून दुबईचा विहंगम नजारा ५७६ मेगापिक्सलच्या मानवी डोळ्यांमध्ये आणि सोबतच १०८ मेगापिक्सलच्या मोबाईल कॕमेऱ्यात प्रत्येकजण साठवत होता. एखाद्या झरोक्यातून पहावे आणि विस्तीर्ण सर्वत्र सांडलेली चमचमते हिरे-माणके दिसावीत, अगदी तसे शहराचा पसारा दिसत होते. काही काळासाठी चमचमणाऱ्या तारकांचे नभांगण आता खाली अंथरलय की काय, असं वाटण्या इतपत. शहराचा झगमगाट, रस्त्ते, त्यावरुन प्रकाश सांडत जाणारी वाहने, वळणा-वळणाचे पूल हे सर्व काही मनोहारी, तितकच अद्भूत होतं सगळं. अगदी दोन्ही हातांच्या ओंजळीतून काजव्यांचा गुच्छ सोडावा आणि तो इतस्ततः पसरतच जावा. येथून खाली पाहताना शहरातील इमारती आता चौकोनी डबे ठेवल्यासारख्या वाटत होत्या.       
          येथील काचेवर चालताना, ती फुटल्याचा अचानक होणारा ध्वनी घाबरवत होता. दचकून सावरल्यानंतर तशातही मग जाम मजा वाटत होती. अनेक छबी टिपून पुन्हा लिफ्टने खाली परतलो. परततानाही या इमारतीच्या निर्माणात योगदान दिलेले अभियंते, कंपनी, प्रमुख कारागीर यांची माहिती पहातच अन् स्वप्नवत पण, सत्यात उतरलेली वास्तू पाहून अनेक प्रश्नांचं काहूर सोबत घेवून..
     -©️ प्रशांत सातपुते.
p7sons@gmail.com             
           9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02JsaGwMR4dR4mEfLFMUCWpFamUbiu3i4L2ffxkAjQKkbLi8iszoQUL1pWjNFWEeMLl&id=100001067020937&mibextid=Nif5oz

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..