"आइए हुजूर..लिजिए खजूर..!"
घरी येणाऱ्यास चहा देवून आदरातिथ्य करणं हा जसा आपल्याकडील सर्रास पाहुणचाराचा प्रकार आहे, अगदी तसाच आखातातील बहुतेक देशांत घरी 'मजलीस' म्हणजे बैठक बसल्यानंतर बिन साखरेचा चहा अर्थात 'गहवा' आणि सोबत मधूर 'खजूर' देण्याचा पाहुणचार आहे.
अगदी खजूर खरेदीसाठी बाजारात गेल्यानंतरही हव्या तेवढ्या प्रकारच्या खजूराचा स्वाद गहव्याच्या साक्षीने चाखायला मिळतो. अबुधाबीमधील ग्रँड मस्जिद पाहिल्यानंतर दुबईला परतताना खजूर बाजारात खरेदीसाठी आम्ही सर्व पर्यटक गेलो होतो. दुकानात प्रवेश करताच सुरुवातीलाच दुकानातील पोऱ्याने प्रत्येकाला खजूर चाॕकलेट देवून स्वागत केले. सौदी अरेबिया, दुबई, इराण अशा इतर देशांतील हर नमुन्याचे खजूर होते. लांबडे, बुटके, वाटोळे, गोलमटोल, सुरकुतलेले, तुकतुकीत कांतीचे पिवळे जर्द कच्चे असे हर एक नमुन्याचे प्रकार प्रथमच सर्वजण पहात होते. प्रत्येकाचा एक वेगळा असा स्वाद होता. त्याच्यापासून आणि इतर ड्राय फ्रूटपासून बनवलेले रंगी-बेरंगी आणि विविधढंगी स्वादिष्ट चाॕकलेटसही होती. हे घेवू की ते घेवू, असं सगळ्यांना झालं होतं. आता जिभदेखील सगळ्या मिश्रित चवींने बरबटली होती.
बाजूलाच समोरील मेजावर चहाची मोठी किटली ठेवली होती. प्रथम दर्शनी चहाची वाटत होती. 'चहा आहे का?' असे विचारताच 'गहवा' अर्थात बिन साखरेचा इथला चहा असल्याचे तेथील मुलांने उत्तर दिले. कुतूहल जागृत झाल्याने तेथेच ठेवलेल्या कागदी कपातून तो प्रथम मी घेतला. बाजूला आलेल्या सौ.ला देखील माझ्यातलाच अर्धा कप दुसऱ्या कागदी कपातून दिला. इतक्यात 'टूर गाईड नूर' देखील तिथे आली आणि तिनेही किटलीची तोटी सुरु करुन गहवा घेतला. साखर, दूध आणि चहा पावडर नसलेला पिवळसर गरम, तुरट-कडवट चवीच्या गहव्याचा घोट घेतला आणि तो प्रथमच पीत असल्याचे चेहऱ्यावरील उमटलेल्या रेषांनी जाणवून दिले.
'गहवाचा एक घोट घेतल्यानंतर खजूराचा एक छोटा तुकडा तोंडात टाकायचा असतो', अशी नवी माहिती गाईड नूर ने यावेळी दिली. या पेयाच्या शिष्टाचारात साखरेची उणीव मधूर खजूर भरुन काढत होते तर.!
जिज्ञासेने मग अधिक माहिती घेतल्यानंतर तो कसा बनवला जातो, याची कृती मिळवली. ती अशी, आवश्यकतेनुसार भांड्यात पाणी उकळून घ्यावे. त्यामध्ये ३ ते ४ लवंग टाकाव्यात. एखादी दुसरी वेलची वा वेलची पावडर टाकावी. काही तंतू केशर टाकावे. त्यामध्ये ग्रीन काॕफी पावडर अर्थात गहवा टाकायचा. चांगले उकळून घ्यावे व गरमा-गरम तो कपात ओतून घोट-घोट प्यावा. पिताना प्रत्येक घोटासोबत खजुराचा एक छोटा तुकडा दातांनी तोडून चावावा.
दुकानातील बऱ्यापैकी प्रत्येक चाॕकलेट आणि खजुरांचा स्वाद घेतल्यानंतर बऱ्याच खरेदीसाठी आलेल्या पर्यटक 'हुजुरांनी' विविध प्रकारचे 'खजूर' आणि चाॕकलेटसची खरेदी केली होती. आता ते हिशोबातील ऊर्वरित 'दिऱ्हम' बीलकर्त्याकडून परत घेत ते समाधानाने बाहेर पडत होते. खरेदी केलेले सोबतचे साहित्य, पाझरलेल्या रसनेची खजूर-चाॕकलेटसकडून झालेली समाधानाची मनसोक्त तृप्ती अन् जिभेवरील रेंगाळलेला स्वादिष्टपणा घेवून आम्हीही मग दुबईकडे प्रयाण केले.
©️-प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0rtNArLKSCizUJ9sKMvt54NhTzVR41Ru2e2xXZ9xg6XgATb3ChB55jkBeGoLM1jaUl&id=100001067020937&mibextid=Nif5oz
Comments
Post a Comment