लावण्यखणी...लावणी..!


ढोलकीवर थाप पडली आणि पायातले घुंगरू वाजू लागले.. प्रेक्षकांनीही कळत-नकळत ठेका धरला.. "लावण्यखणी"ची वेल सर्वत्र पसरली..संपूर्ण वातावरण लावणीमय झालेले..अन.. समोर महिला प्रेक्षक असूनही चक्क शिट्ट्यांची बरसात सुरू होती. उधाणलेल्या रसिक प्रेक्षकांकडून रुमालांची उधळण होत होती. हे यश होतं ज्योती जोशी  यांच्या अदाकारीचं..‘लावणीचं!’ तेही जयसिंगपूर सारख्या परिसरात..!
जायंटस् ग्रुप, सहेलीच्या तत्कालीन अध्यक्ष माधुरी चौगुले यांच्या सोबत 2007 साली खास महिलांसाठी विशेषत: सहकुटुंबियांनी लावणीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा या हेतूने ज्योती जोशी हिच्या लावण्यखणी या शोचे आयोजन केले होते. हा लेख लिहीताना बीएला मराठी वाङ्मयाचा अभ्यास करताना तंत, पंत आणि संत साहित्यावरील प्राध्यापक ए.टी. चौगुले यांनी दिलेल्या नोट्स फडताळातून शोधून काढल्या. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठात जर्नालिझमला असताना लेखक नामदेव व्हटकर यांच्या पुस्तकावर संदर्भित आणि तत्कालीन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, मार्गदर्शित सादर केलेला परिसंवादासाठीचा लघु शोधनिबंध  शोधून काढला. यावर आधारित त्यातील काही अंश या लेख रूपाने मांडत आहे. 
   ‘झाल्या तिन्ही सांजा
   करून शिणगार साजहा
   वाट पाहते मी ग,
   येणार साजन माझा..’
  ‘रिमिक्स’च्या धांगडधिंग्यात पल्लवीनं समोरच्या महिला वर्गालाही भुरळ घातली. तिच्यातील ‘अभिसारिकेनं’ अनेकजणींवर मात केली होती...मोहिनी घातली होती.. भरतनाट्यममधून पदवीधर झालेल्या पल्लवीला मिळालं होत हे यश. घरंदाज, सुशिक्षित महिलेचं होतं...हे यश होतं ‘नामचंद पवळा’चं..!
औरंगजेबाच्या कारकीर्दीत फौजांच्या सुखासीन वृत्तीला उत आला होता. अशा सुखासीन बनलेल्या फौजांचे तळ पडले. त्यांना करमणुकीची गरज भासे. लढाईत केंव्हाही मृत्यू येईल अशी एक शिपायांची मनोवृत्ती बनलेली असे.  मिळेल तेवढी चैन आजच करुन घ्यावी असे त्याला वाटत असे. घर सोडून दूरदेशी लढाईवर गेलेल्या शिपायांना वैषयिक अतृप्ती दीर्घकाळ काढावा लागतो. त्यामुळे जिच्यात शृंगार आणि विषय वासना यांना उतारा मिळेल अशा स्वरुपाच्या करमणुकीची गरज त्याला अधिक असे. अशा फौजी विरांना करमणुकीसाठी आपल्या सोबत करमणुकीचे ताफे घेवून येणे शक्य नव्हते. त्यांनी खेड्या पाड्यातले गाणारे उभे केले. महाराष्ट्रात गोंधळी, डवरी, कोल्हाटी, डोंबारी, डुगडुगी, महार अशा गाणे बजावणाऱ्या जमाती त्यावेळी होत्या. 
  उत्तरेत नायकिणी नाचवण्याचा शौक दांडगा होता. या फौजांनी कलावंताना आपल्या ताफ्यात बायकी नाचही ठेवायला लावले आणि अशारितीने ताफ्यात नाची किंवा स्त्री रुपही आले. असा नाच्या पोऱ्या गरजेची चीज झाली. सैनिकांना मराठी संत भक्तांच्या गवळणी आणि देवांचे भक्ती गीत कसे चालणार. मग जुळवा स्वतंत्र काहीतरी आणि यातूनच शृंगारिक गाणी रचण्याची पध्दत पडली आणि ‘लावणी’ने जन्म घेतला. अशा या करमणुकीच्या ताफ्यांनाच गंमत-मौज-मजा-मनोरंजन अशा अर्थाने तमाशा हे नाव रुढ झाले.  
  संत आणि पंत या काव्यापेक्षा स्वतंत्र वळणाची रचना 18 व्या शतकात लिहिली जावू लागली. यालाच शाहिरी काव्य म्हटले जाते. रामजोशी, अनंत फंदी, सगनभाऊ, प्रभाकर, होनाजी बाळा, परशराम आदी शाहिरांच्या लेखनीतून आणि वाणीतून निघालेलं हे काव्य तुणतुण्याची साथ घेवून लोकांचे रंजन करु लागले. ‘शाहीर’ हा शब्द यावनी भाषेतून आला आहे. शाहीर म्हणजे कवी आणि शाहिरी म्हणजे काव्य, पोवाडा आणि लावणी हे दोन रचना प्रकार शाहिरांनी केले आहेत. पोवाडा म्हणजे विराच्या पराक्रमाचे, बुध्दीमत्तेचे, सामर्थ्याचे आणि गुणकौशल्याचे काव्यात्मक वर्णन होय. 
*लावणी म्हणजे शाहिरी काव्याचे दुसरे अंग आहे. पोवाडा हा रांगडा ओबड- धोबड तर लावणी ही नाजुक, अटकल बांध्याची आणि रंगेल स्वरुपाची दिसून येते.* पोवाड्याच्या मानाने आकाराने लहान असलेली आणि निवेदनापेक्षा भावना अविष्काराला प्राधान्य असलेली ताल ठेक्यावर संगिताच्या आणि नृत्याच्या अंगाने गाता येणारी, पाहायची आणि ऐकायची ही लावणी नृत्य,अभिनय आणि संगीत या अंगाने सादर केली जाते. त्यामुळे ही अधिक आकर्षक व दिलखेचक ठरते. 
लावणी विषयी अनेक मत-मतांतरे आहेत. शेतात लावणी करताना म्हणावयाचे गीत परंतु कृषी गीत नव्हे. अशी एक व्युत्पत्ती आहे. लवण म्हणजे सुंदर त्यावरुन लावण्य या भाववाचक नामाप्रमाणे स्त्री सौंदर्यावर लिहलेले काव्य म्हणजे लावणी. नागेश संप्रदायाचा एक शाहीर मन्मथ शिवलिंग याची इ.स.1600 पूर्वीची कराडच्या भवानीवरील लावणी उपलब्ध झाली आहे. लावणीला खऱ्या अर्थाने बहर आला तो पेशवे काळात. 
  मुलुखगिरीत गुंतलेल्या, संसारात शिणलेल्या आणि विलासात आंबलेल्या मनाला उभारी देवून जीवनात रंग भरण्याकरिता शाहिरांनी लावणीची रचना केली. लोक जीवनातील असंख्य विषय निवडून त्यात लौकिक भाव भावनांची सुंदर चित्रे रेखाटली आहेत.  पठ्ठे, बापूराव, प्रभाकर ,होनाजी बाळा, रामजोशी अनंत फंदी यासारख्या शाहिरांनी 'अटकल बांध्याची', ‘नाजूक’ पण रंगेल लावणी लिहिली. 
  शृंगारिक लावण्या, अध्यात्म‍िक आणि भेदीक लावण्या, विविध विषयपर लावण्या असे तीन प्रकार दिसतात. शृंगारिक लावणीमध्ये कृष्ण आणि गोपींना नायक नायिका करुन मनातील शृंगारिक भाव भावना व्यक्त केल्या आहेत. संगमनेरचे अनंत फंदी आपल्या कवित्वाच्या बळावर पुढे प्रसिध्द शाहीर झाले. त्यांच्या कटाव  म्हणजे कटिबंध विशिष्ट बंधनातून केलेली रचना आणि फटके म्हणजे सुंदर उपदेशपर कवने, अशी त्यांची रचना. संसारिकांना आवश्यक अशी व्यवहारी उपदेशपर, तडफदार आणि निर्भिड भाषेत ही कवने लिहिली आहेत. अनंत फंदिंची चंद्रावळ लावणी लोकप्रिय आहे. कटाव आणि फटके म्हणजे व्यवहार ज्ञानाचा उपदेशपर संचच होय. 
‘वहिवाट, बिकट वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको
संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरु नको
स्नेहासाठी पदरमोड कर परंतु जामीन राहू नको
बरी खुशामत शहाण्याची ही मुर्खाची ती मैत्री नको’
  पंडित कवी आणि शाहीर कवी यांना जोडणारा दुवा म्हणजे, राम जगन्नाथ ताशे अर्थात रामजोशी हे मुळचे सोलापूरचे. वेध संपन्न घरांने असल्याने तमासगीर शाहिरात वावरुन लावणी, पोवाडे रचावेत हे त्यांच्या कुटुंबियांना रुचनारे नव्हते. व्युत्पन्नता व कवित्व यांचा संगम आणि रंगेलपणा व बेछुट वृत्ती संस्कृतचा गाढा व्यासंग असणारा हा शाहीर बारामतीला मोरोपंतांची संबंध आल्यानंतर यांच्या रचनेत मोरोपंतांची छाप दिसते. कृष्ण लिलापर शृंगारिक लावण्यामध्ये त्यांची छेकापन्हुती ही रचना विशेष आहे. 
 ‘राधा सखी संवादी छेकापन्हुती ऐका
रसिक हो किती चतुर बायका’
 किंवा
‘सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली
हवेलीत शिरली मोत्याची भांग’
किंवा
‘अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर*
*मारिते लहर मदन तलवार’
अशा लयबध्द आणि प्रासादिक रचनांची मराठीत सौंदर्यात बहर घातली आहे. रामजोशींच्या उपदेशपर लावण्यासुध्दा मनाची पकड घेणारी आहेत. तत्कालीन समाजामध्ये वैराग्याचे स्तोम माजवणाऱ्यांचाही समाचार त्यांनी घेतला आहे. तो आज सुध्दा लागू पडतो.
 ‘हटा तटाने पटा रंगवूनी जटा धरिशी का शिरी
मठाची उठाठेव का करी’
किंवा
‘काय गळ्यात घातशी तुळशीची लाकडे
ही काय भवाला दूर करती माकडे’
  रामजोशी, अनंत फंदी पेक्षा परशरामांची लावणी अधिक‍ प्रसिध्द झाली. निर्भिड आणि स्पष्ट चित्र रंगविणारा शाहीर म्हणून यांचा उल्लेख केला जातो. हातात वीणा घेवून गोड स्वरुपात लावण्या म्हणायचं. पुरुषांने स्त्रीचे सोंग करायचे हे पहिल्यांदा परशरामाने तमाशात आणले. बाजीरावांनी जहागिरी देवू केल्यावर  
‘पोट भराया उभारीला ना तमाशाचा धंदा
महाल मोकाशी जहरी वळशी करितील आपला  बंदा
सुई दोऱ्याला हयात असु द्या तोची इनाम मानसा 
नीजकर्मी रथ नर झाल्यावर का उना मग त्या पैसा’
 असे चोख उत्तर परशरामानी दिले.
  ‘घनश्याम सुंदरा’ या लावणीने होनाजी शहाजी शिराळखाने अर्थात होनाजी बाळा मराठी माणसांच्या मनात अमर होवून बसला. त्यांचा जोडीदार बाळा करजगकर होनाजीने लावण्या लिहाव्यात व बाळाने त्या गाव्यात. त्यामुळे या दोघांना कमालीची लोकप्रियता मिळाली. रामजोशींच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’त्याप्रमाणे होनाजीची 
‘लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं’
ही लावणी म्हणजे मराठी स्त्री सौंदर्याला गती देणारे सुंदर वर्णन होय.
    मुळची नाशिकचे प्रभाकर जनार्दन दातार अर्थात प्रभाकर पुण्यात आल्यानंतर आपल्या प्रतिभेच्या बळावर शाहिरीत नाव कमावले. मुळचा जेजुरीचा असणारा शाहीर सगनभाऊ. भाऊची सारी हयात पुण्यात गेली. बाजीरावची सगनभाऊवर बरीच मर्जी होती. 
  1885-90 दरम्यान तमाशात स्त्रीचा प्रवेश झाला असावा. नामचंद पवळा ही तमाशातील पहिली स्त्री राधेचे रुपात वावरणाऱ्या नाचा पोऱ्याच्या जागी स्त्री आली आणि रिकामा झालेला नाच्या पोऱ्या राधाची जोडीदारीण म्हणून राहिला असावा आणि पुढे मावशीच्या रुपात स्थिरावला असावा आणि कृष्ण सवंगडी पेंद्या म्हणजे सोंगाड्या असतो. सरदार, बाजींद्या, सोंगाड्या, सुरते आणि नाच्या ही मोजकी पात्रे गण, गवळण, लावणी, वग अशा अंगाने तमाशातील नाट्य साकारत असत. 
  पठ्ठे बापुराव यांची गवळण-
‘थाट करुनी माठ भरोनी घ्या गे सगळ्या शिरी
अगे जाऊ मथुरेच्या बाजारी’
भाऊ फक्कड यांची गवळण 
‘बाजार मोठा लवकर गाठा मथुरेच्या हाटा
 *चला निघा ग
वरच्या आळीच्या चंद्रावळीच्या फळीच्या जाऊन सांगा गं
आरंभाला विलुंब झाला सुर्यबिंब वर आला बगा गं’
१९३०  मध्ये बोलपट आल्यावर तमाशाकडे दुर्लक्ष झालं. पुढे १९४८ मध्ये तमाशावर बंदी आली. तमाशा ही कला अश्लील नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक कला असल्याचे सरकारला पटवून दिले आणि कलावंतांची उपासमार थांबली. हरी वडगावकर, दादू इंदुरीकर, उमा चांदोलीकर, भाऊ बापू, शिवा संभा, भाऊ फक्कड, मंगला बनसोडे, काळू-बाळू, शिवरामतात्या बोरगावकर अशा कितीतरी तमासगिरांनी तमाशा महाराष्ट्रात लोकप्रिय केला.
  तमाशा-लावणी ही अश़्लील, असंस्कृत म्हणून हिणवले जाई. इतकेच नव्हे तर पहायला जाणाऱ्या वर्गाकडेही समाजाची असंस्कृततेची ‘नजर’ असायची. तमाशाप्रधान कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने लावणीला पुन्हा एकदा मानाचे स्थान देण्यात लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राबरोबरच अमेरिकेतही लावणी महोत्सव झाले. अमेरिकेतील कलाकरांचा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हा कार्यक्रम महाराष्ट्रात झाला आणि लावण्यांच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुशिक्षीत, घरंदाज तरूणी लावणी सादर करत, हेच प्रेक्षकांना कुतुहल होतं.
सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित केलेल्या तमाशा महोत्सवात सुरेखा पुणेकरांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. सुरेखाताईंच्या दर्दभऱ्या आवाजाने आणि पदन्यासाने अमेरिकेतील प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. याच त्यांच्या शिष्या पल्लवी जाधव नेही महाराष्ट्रातील शेकडो कार्यक्रमांत अनेकांना मंत्रमुग्ध केले. माया जाधव, मधु कांबीकर यांनाही गुरूस्थानी मानून पारंपरिक लावणी योग्य रितीने सादर करण्याचा तिचा प्रयत्न होता.
      'खेळताना रंग बाई होळीचा बाई होळीचा..
  फाटला ग कोना माझ्या चोळीचा..'
  या तिच्या ठासून अदाकारीने साकारलेल्या लावणीने महिला वर्गालाही तिनं त्यावेळी वेडं केलं. ‘वन्स मोअर’ची  मागणी पूर्ण करतानाही ही बाई थकते की नाही ?, असे भाव समोरील चेहऱ्यावर तरलेले . प्रभाकर पणशीकरांबरोबर तो मी नव्हेच, शांतेच कार्ट यात तीनं भूमिका साकारल्या आहेतच. पण, लाडाची बहीण साठी उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिकही तिला मिळालं होतं. 
‘लटपट लटपट तुझं चालणं
मोठ्या नखऱ्याचं..
बोलणंही मंजुळ मैनेचं..’
ही होनाजी बाळा यांची लावणी अथवा
‘आला थंडीचा महिना
चटकन शेकोटी पेटवा..
 मला लागलाय खोकला
मधाचं बोट कुणी चाखवा..'
ही लावणी इ. 12 वीत शिकणाऱ्या सुजाता कुंभार हिने विद्युलतेच्या पदन्यासाने सादर करून एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. काही अंशी पल्लवीच्या अदाकारीलाही तिने छेद दिला होता. लावणीला मानाचं स्थान निर्माण करून देणाऱ्या या पिढ्या सद्या काय करत असतील असा प्रश्न उगीचच मनी रेंगाळतो.
  आजकाल संगीत बारी या नावाने ओळखला जाणारा केवळ स्त्रीयांच्या नाचाचा एक प्रकार सांस्कृतिक कला केंद्र या नावाने तमाशा या सदरात घालण्याचा प्रकार पडला आहे. 4-5 स्त्रीया त्यात एखादी दुसरी प्रमुख नाचणारी, तब्बलजी, पेटीवाला, मुख्य नाचणारी आणि गाणारी असा हा जथ्था असतो. हल्ली बहुधा सिनेमातील श्रृंगारिक गाणी आणि जुन्या लावण्या समोर बसलेल्या रसिक प्रेक्षकांच्या फर्माईशेवर सादर केल्या जातात. काळानुरूप मागणी बदलली. त्याप्रमाणे ‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची’  या प्रमाणे या कलाकारांकडून ती सादर केली जाते. यामध्ये देखील मुलींनी नृत्याचे धडे गिरवले आहेत. केवळ हा जलशाच पाहून येणाऱ्यांचा लोकनाट्याबद्दल गैरसमज होतो.
लावणी-तमाशाला नाकं मुरडणाऱ्या खास करून महिलांच्या हृदयावर राज्य करता यावं, ‘लावणीला महिलांकडून पुन्हा लावण्य मिळवून द्यावं’ यासाठी सुरेखा पुणेकर, मधु कांबीकर, ज्योती जोशी, पल्लवी जाधव, श्वेता विचारे, छाया-माया खुटेगावकर अशा विविध लावणीसम्राज्ञींच्या संघामध्ये असणाऱ्या नव्या दमाचे कलाकार शास्त्रशुध्द नृत्याचे धडे घेऊन आलेल्या सुशिक्षित घरातील होत्या. लावणीचं लावण्य हे बावन्नकशी सोनं असून पुढच्या पिढ्याही हे लावण्य निश्चित जपतील. नखशिखांत नऊवारी साडीमध्ये दागिण्यांनी मढलेली, गजऱ्यांनी माळलेली आणि नृत्य अदाकारीने बहरलेली लावणी नेहमीच यापुढील काळात शिखरावरच राहील हे मात्र निश्चित आहे.

-प्रशांत सातपुते
९४०३४६४१०१

Comments

  1. Your writing has a flow and style of your own. Thank for such information in the special style of yours. Has to read many more from your blog.. same time keep writing.. would expect more like this in days to come.

    ReplyDelete
  2. प्रशांतजी.... लई भारी...झक्कास!

    ReplyDelete
  3. सुंदर, अप्रतिम लेख/माहिती

    ReplyDelete
    Replies
    1. लावणी मध्ये एवढी मोठी माहिती लपलेली आहे हे आपला लेख वाचल्यानंतर समजले. लावणी हा मराठी साहित्यातील साज शृंगाराने नटलेला संगीतातील लोकप्रिय काव्यप्रकार . कोल्हापुरी लावणी तर सर्वदूर प्रसिद्ध असा प्रकार.
      आपल्या खुमासदार शैलीमध्ये लावणी वरील हा लेख खूपच माहिती पूर्ण आहे.
      धन्यवाद !!
      आपल्याला शुभेच्छा !!!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..