अनोखी दुर्गजोडी-किल्ले चंदन-वंदन





            ए जोडकिल्ला सातारा जिल्हयात आहे. किल्ले चंदन-वंदन हे त्याचे नाव. हे दोन्ही किल्ल एकमेकांना लागून आहेत. चंदन-वंदन या किल्ल्यांपैकी चंदन हा उंचीला वंदनपेक्षा कमी आहे. याचा समावेश कोरेगाव तालुक्याच्या बनवडी हद्दीत येतो. तर वंदन वाई तालुक्यातील खोलवडी गावच्या हद्दीत येतो.
            हे किल्ले गिरीदुर्ग या प्रकारात मोडतात. चंदन गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 1171 मी. इतकी आहे. तर वंदन गडाची उंची 1171 मी. इतकी आहे भाडळी-कुंडल रांगेचा फाटा या पर्वत रांगामध्ये या गडांचा समावेश होतो.
            ग्रँट डफच्या, मते या किल्ल्यांची उभारणी पन्हाळ्याच्या शिलाहार राजांनी केली असावी. तर काहींच्या मते, विजापूरच्या इब्राहिम आदिलशहा दुसरा याने हा किल्ला इ.स. 1600 मध्ये बांधला. हा किल्ला अगोदर आदिलशहाकडे होता. इ.स. 1673 मध्ये शिवाजीमहाराजांनी आण्णाजी दत्तो सुरनवीस यांच्या मदतीने स्वारी करुन चंदन-वंदन स्वराज्यात करुन घेतला.
            नंतर छ.संभाजीच्या काळात इ.स. 1685 च्या फेब्रुवारी महिन्यात मराठयांची एक तुकडी चंदन-वंदन येथे पोहचली. तेव्हा अमानुल्लाखान त्यांच्यावर तुटून पडला. चकमकीत मुघलांच्या हातात 25 घोडी, 20 बंदुका, 2 निशाने 1 नगारा सापडला.
            सन 1695 मध्ये या किल्ल्याजवळ धनाजी जाधव मुघल फौजांची लढाई झाली होती. 31 ऑक्टोंबर 1699 रोजी येथून धनाजीसह राजाराम लढाईसाठी बाहेर पडला आदर्कीमार्गे सुरतेकडे गेला. दि. 6 ऑक्टोंबर 1701 रोजी हे किल्ले औरंगजेबाने जिंकले.
            छ.संभाजीनंतर हा किल्ला ताराबाईच्या ताब्यात होता. परंतु शाहू मुघलांच्या कैदेतून सुटल्यावर खेडयाच्या लढाईत विजय मिळविल्यानंतर आक्रमक धोरण स्वीकारुन जानेवारी 1708 मध्ये चंदन-वंदन किल्ला हस्तगत केला. सन 1756 मध्ये पेशव्याने तुलजी आंग्रे याला येथे कैदेत ठेवले होते. सन 1790 च्या महसूल विषयक नोंदीमध्ये चंदन-वंदन किल्ल्यांची विजापूर सुभ्यातील परगणा मुख्यालय अशी नोंद असून तेथील महसूल 21,644 रुपये होता.
            इ.स. 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांकडे हा सहज गेला. चंदनवंदन हा पूर्वी आदिलशाही राज्यातील एक परगणा होता. त्याचे उत्पन्नही बरेच होते.
            या चंदन-वंदनपैकी चंदन किल्ल्यावर एकावर-एक रचलेल्या प्रचंड दगडांच्या स्तंभामुळे हे किल्ले आपल्या लक्षात राहतात. या स्तंभाची उभारणी केव्हाची कशी ? कशासाठी झाली ? याबद्दल अनेक तर्क वितर्क केले जातात.
            या किल्ल्यावर अब्दुल कादर जिलानी यांचा दर्गा आहे गौसपिया या नावाने ते प्रसिध्द आहे. काहीं च्या मते, विजापूरच इब्राहिम आदिलशहा दुसरा याने हा किल्ला 1600 मध्ये बांधला त्यावेळीच दगडी स्तंभाची उभारणी झाली. पहिला दगड तळात रचल्यावर शेजारी तेवढाच मातीचा भराव घालून त्यावर दुसरा दगड लोटत आणून बसविला. परत त्या दगडाएवढा भराव घालून मग तिसरा दगड अशा तऱ्हेने या दोन स्तंभाची उभारणी झाली, असे सांगतात.
            फलटण सातारा रस्त्यावरील अंबवडे या गडाजवळच्या गावी मोटारगाडीने जाता येते. जाताना अरबवाडी, बनवडी ही गावे लागतात गडाच्या पायथ्याशी इब्राहिमपूर नावाची छोटी वाडी आहे. गड चढताना झाडी अजिबात लागत नाही. पडक्या दरवाजाच्या अवशेषातून आत गेल्यावर काही दगडी पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर आले की, समोरच एक मोठा वटवृक्ष आहे. त्याच्या शेजारी एक चंदनेश्वराचे मंदिर आहे. येथून पुढे गेले की, एकांवर एक रचलेले प्रचंड स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात समोरच दर्ग्याची इमारत आहे. हे ठिकाण गौसपिया या नावाने ओळखले जाते. अनेक धर्माचे लोक येथे दर्शनास येतात. मुस्लिम वर्षातील रबिलावर या महिन्याचा अकराव्या तिथीस याचा ऊरुस असतो.
            या गडावर मशीद, किल्लेदाराचा वाडा, दारुखाना अनेक पडक्या इमारतीचे अवशेष दिसतात. गडावर सात टाकी असून सर्व गाळाने बूजून गेली आहेत. सध्या नव्यानेच दर्ग्याच्या मागे एक विहीर पिण्याच्या पाण्यासाठी खोदली आहे. तीस पाणीही लागले आहे. येथे बरीच माकडे आहेत. गडावरच दक्षिण बाजूस अनेक मुस्लिम थडगी आहेत. यावरुन येथे लोकवस्ती बरीच असावी. या किल्ल्यावरुन वंदन किल्ल्यावर जाता येते. मात्र, मार्ग अतिशय बिकट आहे.
            वंदन यास तेथील लोक मंदन असेही म्हणतात. चंदनपेक्षा थोडा उंचीने हा किल्ला अधिक आहे. आकारानेही अधिक आहे. गडास जाण्यास रस्ता अवघड आहे. पडक्या प्रवेशद्वारातून ढासळलेले प्राचीन प्रवेशद्वार आहे. येथेच एका दगडावर पर्शिया लिपीत शिलालेख कोरलेला आहे. येथील आतील बाजुस पहारेकऱ्याच्या खोल्या होत्या.  थोडयाशा अवघड वाटेने वर गेले की, गडाच्या माथ्यावर आपला प्रवेश होतो.  येथे पडक्या घरांचे अवशेष दिसतात.  एके ठिकाणी तर अशा चौथऱ्याची मोठी  ओळच्या ओळ दृष्टीस पडते.  येथुनच जवळ सरकार वाड्यांचे अवशेष आहेत.  या वाडयाला लागूनच तीन खोल्या असलेला एक वाडा आहे.  त्याचे छप्पर अद्यापही शाबूत आहे.  येथील लोकांच्या मते हे दारु कोठार असावे.  त्याच्या अगदी थोडया अंतरावर धर्मशाळा आहे.  त्याच्या समोरच्या बाजुस प्रवेशव्दारावर शिलालेख कोरलेला आहे.
            गडावर पाण्याची सात तळी आहेत.  त्यातील दोन बरीच मोठी असून ती बांधीव स्वरुपात आहेत.  त्यांची आता पडझड झालेली आपणाला पहावयास मिळते.  इतर पाच देखील तळी  या किल्ल्यांवर आहेत.  या गडालाही चंदनप्रमाणे चहूबाजुंनी  उभा खडक असून आवश्यक त्या ठिकाणी तटबंदी आहे.  एका तोफेचा नाश करण्यासाठी 1857 मध्ये कॅप्टन रॉस गडावर आला होता.  तोफेच्या नाशाबरोबर त्याने इमारती पाण्याच्या तळयांचीही  नासधुस केली.                     
   गडावर येण्यास पुणे- सातारा हमरस्त्यावरील भुईंज येथे उतरुन किलली, लगडवाडी, बेलमाची, गावावरुन येता येते.  या रस्त्याने आल्यास किकली येथील प्राचीन मंदिर शिवमंदिर तर  आंबवडेमार्गे आल्यास इब्राहिमपूरचे सोमानाथ मंदिर लागते.
साताराऱ्यापासून 30 किमी.
निवासाची सोय - सातारा येथे


                                                                                                                  - प्रशांत सातपुते                                                                                                       

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..