मोत्या..गुफी अन् शॅडो..व्हाया बेन्जी
मी त्यावेळी अगदी तीसरी
चौथीला असेन ! मोती तसा आमचा कोणीच नव्हता. घराच्या पाठिमागे राहणाऱ्या
कदम उर्फ रफूवाले आजोबांनी सांभाळलेला. त्यांच्या शोभा नावाच्या मुलीने एके दिवशी हे
शुभ्र, काहीसे पिंगट रंगाचे पिलू घरी आणले होते. कधी-कधी त्यांच्या घरी बसायला जायचो.
परत येताना तो आमच्या मागे लागून यायचा आणि अंगणात येवून झोपायचा. मोत्याला आमचा आणि
आम्हाला त्याचा लळा कधी लागला ते समजेलच नाही. त्यावेळी घरी टेंभ्याचाच काय तो प्रकाश
असायचा.घरासमोर असणाऱ्या सार्वजनिक विजेच्या खांबावरील लाईटचा प्रकाश अंगणात पडत असे.
मोत्या त्या प्रकाशात अंगणात पडून असायचा. अन् प्रकाशात त्याचा पांढरा रंग अगदीच भारी
चमकायचा. दिवसा मात्र, तो मूळ मालकाच्या दारात पहूडलेला असायचा.
संध्याकाळी आम्ही भांवडे चहाबरोबर खारीचा
चुरा खायचो. तो मोत्याला खूप आवडायचा. त्यामुळे संध्याकाळी चहाच्यावेळी हमखास तो अंगणात
बसून असायचा. एके दिवशी गल्लीतील कुत्र्यांकडून झालेल्या भांडणात एका अनुभवी कुत्र्याने
मोत्याच्या मांडीचा चावा घेतला. ती जखम घेवून दारी आलेल्या मोत्याला माझ्या आईची आई
तिला आम्ही ‘कामाची आई’ म्हणत असू. त्यावेळी ती घरी होती. तिने त्याच्या जखमेवर हळद
टाकली. तसा हा मोती दररोज आता हळद टाकून घेण्यासाठी येत असे. कालांतराने त्याची जखम
बरी झाली आणि यातून मोत्याचे या घराशी असणारे ऋणानुबंध अधिक दृढ झाले. रात्री सारवलेल्या
अंगणात हा चोखपणे आपली राखणदारी करायचा.
त्यावेळी
अण्णा माझे वडील हे कोल्हापूरला कामाला जात. तर, आईदेखील कामाला जात असे. दोघेही रात्री
उशिरा घरी परतत. अशावेळी शाळेनंतर घरी आम्ही लहान भावंडे असायचो. एके रात्री
घराला असणाऱ्या जाळीचा दरवाजा कुणीतरी ढकलू लागल्याचा आवाज येवू लागला. विजेच्या खांबावरील
दिवा गेला असल्याने बाहेर अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे बाहेर कोण आहे, याचा अंदाज
येत नव्हता. तसे आम्ही सर्वजण घाबरलो. घरी आई-आणि आण्णा हे नव्हते. अशावेळी आम्ही घाबरून
ओरडू लागलो. शेजारच्या घरातून सोनामावशी आणि बाजूचा दुकानदार बाबूमामा आवाज ऐकून आले.
बाहेर असणारा मोत्या हा पराक्रम करत असल्याचे दिसले. दरवाजा उघडल्याने झालेल्या प्रसंगातून
ओशाळलेल्या मोत्याने अंगणात बसकन मारली. त्यानंतर मात्र, तो एकदा भुंकून तो आल्याची
जाणीव आम्हाला करून द्यायचा.
दररोज सकाळी 10 वाजता माझ्या दोन मोठ्या
बहिणी अनिता आणि सुनीता या अकराव्या गल्लीत असणाऱ्या आदर्श कन्या शाळेत तर मी बाराव्या
गल्लीत असणाऱ्या शाळा क्रं. 7 मध्ये जायचो. हा पठ्ठ्या जणू आमचा ‘सुरक्षा रक्षक’ असल्याच्या
अविर्भावात अंगणात उभा असायचा. शाळेला जाताना आमच्या पुढे हा चालायचा. अगदी शाळेपर्यंत
पोहचवायला यायचा. शाळेची प्रार्थना होईपर्यंत मारूती मंदिराच्या कट्ट्यावर हा बसून
थांबायचा. प्रार्थना संपली, सगळे वर्गात् गेले की, हा माघारी परतायचा. नित्य-नेमाने
हा आमच्याबरोबर जसा शाळेत पोहचवायला येई, तसा आणायला पाठवलेल्या मुराळ्यासारखा अगदी
पाच वाजता हा शाळेसमोर हजेरी लावायचा. शाळा
सुटल्यानंतर आम्ही तिघे एकत्र येवून शाळेसमोरच असणाऱ्या अरोमा बेकरीमधून खारीचा चुरा
पुडीत बांधून घ्यायचो. हे विकत घेण्यासाठी मोती बेकरीसमोरील फरशीवर उभे राहून आम्हाला
ती जाणीव करून देई. पुडी बांधून घेतली की, हा आपसूकपणे पुढे चालू लागायचा. आम्ही रहात
असलेल्या माळ भागातील सातव्या गल्लीतून बाराव्या गल्लीतील शाळेत वरून खाली यावे लागायचे.
या मार्गावरील इतर कुत्री त्याच्या अंगावर भुंकत असत. कधी-कधी त्याच्या अंगावरही चाल
करायचीत. मग या सुरक्षा रक्षकाला आम्हालाच संरक्षण द्यावे लागायचे. दररोज एकाच मार्गाने
जात असल्याने नंतर-नंतर या मार्गावरील इतर कुत्र्यांनी त्याच्यावर भुंकायचे सोडून दिले.
असा एकंदरित आमचा आणि त्याचा दिनक्रम असायचा.
घरी आण्णा आले की त्याची चंगळ असायची.
मांसाहराबरोबरच भरलेले वांगे, भाकरी अशा आवडत्या पदार्थांवर तो मिटक्या मारायचा. मोत्या
आमच्यात रमतो हे पाहून मूळ मालकांच्या घरातील सदस्य कधी-कधी त्याच्यावर लटका राग आणायचे.
‘मालकाचे खातो आणि राखणदारी शेजाऱ्यांची करतो’ असे ते गंमतीने म्हणायचे. मोत्याने मात्र,
आमच्याकडे यायचे कधीच थांबवले नाही.
नेहमीप्रमाणे
शाळा सुटल्यानंतर आज मोत्या दिसला नाही. तसे आम्हालाही आश्चर्य वाटले. असे यापूर्वी
कधी झाले नव्हते. बराच वेळ वाट पाहून तो दिसला नाही. तसे आम्ही तिघेही घरी परतू लागलो.
घरी आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मोत्याची चौकशी करायला सुरूवात केली. गावामध्ये कुत्र्यांची
संख्या वाढल्याने नगरपालिकेने नसबंदी करण्याची मोहीम उघडली. नगरपालिकेची ही गाडी आज
गल्लीत आली आणि त्यांच्या तावडीत मोत्या सापडला. जाताना खूप भुंकला. नगरपालिकेच्या
कर्मचाऱ्यांना हा पाळीव आहे, असे सांगूनही त्यांनी ऐकले नव्हते. लागलेल्या लळ्याची
दृढ, झालेल्या ऋणानुबंधाची अखेर अशी ताटातुट झाली. दप्तरातून आणलेला खारीचा चुरा मोत्याची
वाट पाहत तसाच पडून होता. घरी कुणीच जेवले नाही. झालेली ताटातुट डोळ्यातून पाझरत होती.
मोती तसा कुणीच नव्हता आणि होताही सर्वकाही. माझ्या आयुष्यात
मित्र म्हणून आलेला, लळा लावलेला आणि माझ्या बालपणीच्या आठवणी, सोबत ठेवून गेलेला हा
"मोत्या" पहिला कुत्रा होता. अन् तो ही शेजाऱ्यांनी पाळलेला.
===============
माझ्या लहानपणी एक खोली
असणाऱ्या घराच्या जशा आता चार खोल्या झाल्या होत्या, तसाच माझाही कौटुंबिक विस्तार
झाला होता. मुलगा सोनू हा त्यावेळी तीन-चार वर्षांचा असेल. नव्या घराचे बांधकामही
सुरु होती. याच नव्या बंगल्यात कुत्रा असावा म्हणून एके दिवशी शेतातून आईने एक कुत्र्याचे
पिल्लू घरी आणले.
समोरच असणाऱ्या चिकन सेंटरमधून
त्याच्यासाठी दररोज चिकनच्या पायाचा खुराक असायचा. गंमत म्हणजे हा गोड द्राक्षाचे मणी
गपा-गप मटकवायचा. सोनूने याचे नाव ‘गुफी’ ठेवले होते. तर आई त्याला गोपी, गोप्या म्हणायची.
बहुधा हे क्रासबिड असावे. खूपच तापट आणि वांड होते. कित्येक वेळा साखळीला हिसडा मारुन
गल्लीभर पळायचे. जस-जसे मोठे होत गेले, तशी त्याची ताकद वाढली आणि ते साखळीच्या बंधनात
राहिले नाही. मग मात्र, त्याला तसे मोकळेच सोडले. याचाही खूप आम्हाला लळा लागला होता.
परंतु, गल्लीत कुणाच्याही अंगावर जावू लागल्याने घरी भांडणे येवू लागली. याने त्याचा
भरपूर रागही येवू लागला. साखळी पुन्हा बांधू लागल्यावर कधी ती तोडून तर कधी उपसून गुफीकुमार
बंधनमुक्त डौलात रहायचे.
दररोजच्या गल्लीतील भांडणाला
वैतागून एके दिवशी त्याला गाडीवरुन गावापासून खूप दूरवर मोकळ्या माळावर सोडून आलो.
पण, त्याचा लळा इतका लागला होता, त्याच्या नुसत्या आठवणिंने बेचैन होवू लागलो. तशी
मोटरसायकल काढली आणि सोडलेल्या जागेवर रात्री बराचवेळ त्याला हाका मारत शोध घेतला.
तो मिळून न आल्याने त्याच्यात गुंतलेल्या भावना डोळ्यातून मोकळ्या होवू लागल्या. त्याच्यासाठी
बनवलेली चपाती तो परत येईल, या आशेवर तशीच शिल्लक राहू लागली.
अगदी तीसरा-चौथाच दिवस
असावा. समोरच रहायला असणाऱ्या मामुंनी सका-सकाळीच मोठ्याने हाक मारत, "तुमचा
गोपी परत आलाय.," अशी आनंदाची बातमीच दिली. बाहेर येवून पाहतोय तर, "कशी
जिरवली." अशा अविर्भावात डोळे रोखून पहात बसले होते. जागो-जागी बहुधा इतर कुत्र्यांनी
त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न केलेला असावा. पण, वांडकुमारांनीही चांगलेच तोंड दिलेल्या
स्पष्ट खुणा त्याच्या शरीरावर दिसत होत्या. ते पाहून मला अगदी भडभडून आलं. त्याला जवळ
घेत गरम पाण्याने त्याला स्वच्छ आंघोळ घातली. जखमांना औषध लावलं. समोरुन आणलेले चिकनचे
पाय आणि गरम चपाती असा भरपेट नाश्ता करुन स्वारीने अंगणात सावलीला ताणून दिले.
आज घरी वातावरण खुलले होते.
पुढे कधीही त्याला साखळी लावली नाही. आणखी मोठा झाल्यावर तो शहाण्यासारखा वागायचा.
पण , मूळचा तापट, वांड स्वभाव मध्येच डोके वर काढत होता. सोनूचा बराचसा वेळ त्याच्यासोबतच
जात होता.
न राहवून, गुफी हे नाव
सोनूला कसे सूचले याविषयी मी एकदा त्याला विचारले. तर माझीच फिरकी घेत तो म्हणाला,
"पप्पा तुम्हाला एवढं पण माहीत नाही? अहो मिकी माऊस आणि डोनाल्ड डकच्या कार्टुन
मालिकेत जो कुत्रा आहे ना, त्याचे नाव गुफी आहे." मी सपशेल आपटलो होतो. खरं तर
ही मालिका मी माझ्या लहानपणीही शेजाऱ्यांकडे जावून अनेकदा पाहिली होती. माझे बालपणही
मिकी माऊस-डोनाल्ड डक हे कार्टून पहात उभारले होते. पण, त्या मालिकेतील कुत्र्याचे
‘गुफी’ हे नाव असल्याचे आज प्रथमच कळाले होते. ते ही मुलाकडून ! आता यावेळी मात्र,
मलाच कार्टून झाल्याचे जाणवले.
दिवसभर दारुत असणारा आणि
हमाली काम करणारा मकबुल ऊर्फ मक्याबरोबर या गुफीची तोंड ओळख असली, तरी तो त्याच्यावर
धावून जायचा. कधी खूप जोरदार भुंकत त्याला हाकलून लावायचा. विशेष म्हणजे तो ज्यावेळी
दारु पिवून येई, त्यावेळी हा प्रकार घडायचा. इतरवेळी हा शांत बसायचा. ही अख्ख्या गल्लीला विशेष गंमत वाटायची.
म्हणतात ना "राग आणि
भीक माग..!" अगदी तसेच झाले. गुफीच्या वांडपणावर, त्याच्या तापट स्वभावावर अनेकजण
चिडून होते. कुणीतरी एके दिवशी त्याच्या गळ्यात प्लास्टिक ची रिंग अडकवून त्याच्या
डोक्यावर जोरदार तीक्ष्ण वार केला होता. भर दुपारी उन्हाच्या रखात सबंध गल्लीत शांतता
असताना हा डाव साधला होता. दारु पिवून वाटेवरुन परतणाऱ्या मक्यालाही आज गुफीच्या भुंकण्याचा
आवाज न आल्याने आश्चर्य वाटले असावे. तो त्याला हाका मारु लागला. प्रत्युत्तर न आल्याने
त्याला गल्लीत शोधत असताना, गल्लीच्या चौकात तो मरणासन्न आवाजात शेवटचे श्वास घेताना
आढळून आला. हा दारुडा मक्या त्याच्याजवळ गेला गळ्यात अडकवलेली रिंग त्यांने अलगदपणे
काढली. त्याला शेवटचे पाणी पाजले. गुफीने त्याच्याकडे कृतज्ञतेच्या भावनेने पहात आपला
प्राण सोडला. वांड असणाऱ्या गुफीचा हा प्रवास इथंवर येवून अखेर संपला होता. आपल्याच
मस्तीत सदैव तो राजासारखा जगला होता.
==============
सोनू आता आठवीत होता. मी
साताऱ्यात होतो. त्यामुळे पालक बैठकीला मला एकदाही कधी त्याच्या शाळेत जाता येत नसे.
एके दिवशी रजा काढून आम्ही दोघेही त्याच्या वर्ग शिक्षकांना भेटून वर्गातील, एकंदरच
शाळेतील त्याच्या प्रगतीविषयी चर्चा केली. वर्ग शिक्षकांनी ‘कुत्रा’ या प्राण्याविषयी
सोनूला असाणाऱ्या ज्ञानाविषयी सांगून आम्हाला धक्काच दिला. त्याविषयी त्याने वर्गात
आत्मविश्वासाने केलेल्या भाषणातून दिलेली माहिती ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले होते.
खरेतर त्याचा हा नवा पैलू माझ्यासमोर आला होता. मलाही मग त्याच्याकडून विविध जाती,
प्रकारच्या कुत्र्यांची माहिती मिळाली. त्याच्या दोन्ही मित्रांकडे घरी कुत्रे पाळले
होते. त्याचा परिणाम, ‘‘आपल्याही घरी कुत्रा आणायचाच’’, यावर येवून ठेपला.
योगायोग असा, साताऱ्यातील
पत्रकार मित्र ओंकार कदम याच्या घरच्या कुत्रीला पिल्ली झाली होती. त्याच्या घरी पिल्ले
पाहण्यासाठी गेलो. एक संपूर्ण काळ्या रंगाचे पण, केवळ
छातीवर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे भासणारा पांढरा भाग असणारे एक पिल्लू अन्य भावंडांच्या
गर्दीतून उठून येत, माझे पाय चाटू लागले. मी त्याला उचलून घेतले मला ते खूपच आवडले.
ती मादी होती. ओंकारला त्याची रक्कम अदा करुन थेट मित्र सागरच्या "स्पेशल"
वाहनातून या गोंडस पिल्लाचा प्रवास सुरु झाला. अजिबात तोंडातून आवाज न करता तीन तास
माझ्या मांडीवर बसून होते. घरी आल्या-आल्या इतकावेळ दबा धरुन बसलेल्या या पिलाने शी
केली. मला याचे विशेष कौतुक वाटले सबंध प्रवासात अंगावर अजिबात काहीही त्यांने केले
नव्हते. ही या एक महिन्याच्या पिलाची समज होती.
तिच्या काळ्या रंगावरुन
तिचे "शॅडो" हे नामकरण झाले. मोकळ्या अंगणात ती आता बागडू लागली. रव्याची
खीर, दूध, चिकनचे सूप असा आवडीचा आहार ती पटकन मटकवायची. दुपारच्या उन्हात दोन कुंड्यांच्या
मध्ये सीताफळाच्या झाडाखाली ती पुढचे दोन्ही पाय पुढे आणि मागचे दोन्ही मागे पसरुन
अगदी पोटावर झोपून रहायची.
दुपारच्यावेळी कधीतरी काळ्या
मुंग्यांची चाललेली धांदल पाहून शॅडोही त्यांच्या मागे लागायची. कधी-कधी जिभेने या
मुंग्या टिपताना तीच्या जिभेवर ही मुंगी कडकडून चावा घ्यायची. मग बिचारी जिभेवर डसून
अडकलेली मुंगी काढून घ्यायली आमच्याकडे यायची. आधीच काळी आणि रात्री अंधारात चूकून
पायात यायला नको म्हणून तिच्या गळ्यात लाल रंगाच्या पट्ट्यात घुंगरु अडकवले. आता तर
छान छन छन असा आवाज येवू लागला. आता ती तिच्या नावाला प्रतिसादही देत होती.
कधी- कधी खेळताना तोंडाने
झाडू विस्कटून टाकायची. झालेल्या नुकसानीबद्दल सौ चे बोलणे खाताना अगदी चूक झाल्याच्या
अविर्भावात मलूल होवून बसायची. बालपणाचा हा प्रवास सुरु असतानाच सोनूने तिला प्रशिक्षण
द्यायला सुरु केले. त्यात तो रममाण असायचा. तिच्यासाठी आता ऑनलाईन शॉपिंगही होवू लागली.
पेडीग्रीपासून, ड्रुल्स लीश, हार्नेस अशी नावे आणि वस्तूंची नव्यानेच आता ओळख होवू
लागली. तिच्यासाठी वेगळा शँपू, वेगळा साबण अशा वस्तू घरी स्थिरावरल्या. प्रशिक्षणातही
तिचा वेग वाढलेला होता. सगळ्या सूचना ती तंतोतंत पाळायची. यात सोनूचा वेगळा उत्साह
असायचा. ऐकलेल्या, आत्मसात केलेल्या प्रत्येक सूचनेनंतर तिला खाऊ बक्षीस म्हणून मिळे.
गंमत म्हणजे गाजर, काकडी, ऊस, सफरचंद, पपई, आंबा, केळी अशा फळांबरोबर अत्यंत हावरटपणानं
मांसाहारही ती करायची.
सोनूच्या या विषयातील अगाध
ज्ञानावर मी कधी-कधी विचार करायचो. तो लहान असताना, "बेन्जी" या इंग्रजी
चित्रपटाची डीव्हीडी आणली होती. हा चित्रपट दररोज पहात तो जेवत असे.
शिकाऱ्याच्या गोळीला बळी पडून अनाथ झालेल्या बिबट्याच्या पिलांचे संगोपन यातील
"बेन्जी" नावाचा कुत्रा इमाने इतबारे करत असे. अगदी जंगली इतर श्वापदांपासून
बुद्धीमत्तेच्या हिकमतीने सराईतपणे संरक्षणही हा बेन्जी करत असे. कदाचित यामुळेच त्याच्या
बालमनावर हा प्राणिमित्राचा आणि प्रेमाचा बंध निर्माण झालेला असावा. गुफी आणि बेन्जीच्या
निमित्तानं शॅडोचे आगमन निश्चित असावे, अशा अनुमानाला मी एव्हाना पोहचलो होतो.
साताऱ्याहून आल्यावर घराच्या
कोपऱ्यावर मी आल्याची तिला चाहूल लागायची आणि मला भेटण्यासाठी उतावीळ व्हायची. अगदी
फाटक उघडायचे अवकाश ती दोन पायावर उभी राहून थेट अंगावर धाव घेई. अगदी मनसोक्त चाटून
ती माझ्याबरोबर आत यायची, आत आल्यावरही ती तोंडात हात घेवून बसायची. अगदी लहान मुलासारखे
लाडही करुन घेई. दर रविवारी विंधन विहीर सुरु करुन तिला आंघोळ घालायचो. सुरुवातीला
अंघोळीसाठी तीचा नेहमी नकार असायचा. कितीही ओरडले तरी जणीवपूर्वक दुर्लक्ष करुन व्हरांड्यातून
उठायची नाही. नंतर मात्र, आता आपली आंघोळीपासून सुटका नाही, हे कळल्यावर लहान मुलांसारखे
पाण्याबरोबर मस्ती करायची. अगदी मोठी झाली तरीही !
सोनूच्या अभ्यासपूर्ण प्रशिक्षणाला
ती तत्परतेने प्रतिसाद द्यायची. हेडफोन लावून स्वच्छंदपणे गाणी ऐकणारी शॅडो रात्रभर
मात्र, अत्यंत तिखट सतर्क असायची. कालनीत अनोळखी व्यक्तीला अजिबात फिरकू देत नसे. ‘लॅब
कधीही सुरक्षा करत नाही.’ असं म्हणतात. पण, हिचा, दिवसाही चांगलाच पहारा असायचा. अगदी
पेपरवाला, दूधवाला यांनाही ती सतावत असे. कॉलनीतल्या लहान मुलांबरोबर मात्र, ही अगदी
लहान होवून जायची. त्यांचा चेंडू तोंडात घेवून माळावर पळायची.
नवे वाहन घेतल्यावर एकदा
तिला हौसेने फिरवून आणले. तर बाईसाहेब उतरायला तयारच नव्हत्या. सुरुवातीला मागच्या
बैठकीला बसणाऱ्या शॅडोने पुढची सौं ची बैठक कधीच बळकावली होती. आता माझीही मंत्रालयात
पुन्हा बदली झाली होती आणि सोनूही लातूरला शिकत होता. शॅडो चांगलीच मोठी आणि ताकदवान
झाली होती. घरी आईला तसेच सौ ला ती आवरत नव्हती. पण, शहाण्या मुलासारखे सगळं ऐकायची.
नागपूर अधिवेशनच्या निमित्तानं
मी त्यावेळी नागपुरात होतो. त्याचकाळात शॅडो दिवसात होती. तिचे हे पहिलेच बाळंतपण !
एके सकाळी-सकाळी सौ चा फोन आला. ती म्हणाली,"सातपुत्यांचे नाव राखलं शॅडोनं !
चक्क सात पिल्ली झालीत." हे ऐकून खूप आनंद झाला व्हॉटस ॲपवर पाठवलेल्या पिलांची
छायाचित्रे पाहून कोण आनंद झाला. बालपणीच्या शॅडोचे आणि तिच्या भावंडांच्याच छबी पाहतोय
असे वाटू लागले. सात पिलांसोबत तिची खूप सारी मजा व्हायची. घरी परतलो तेव्हा घरभर पिल्लं
फिरत होती. पिलांना पाजतानाही शॅडोला जरा जरी बाहेरची चाहूल लागली, तशी ती मधूनच उठून
बाहेर पळत जायची. अशाही अवस्थेत इमाने इतबारे ती सुरक्षा बजावायची.
पिल्लं मोठी झाली तशी ती
आपा-पल्या नव्या घरी विसावली. आता पुन्हा ही घरी एकटीच असायची. मी मुंबईहून आलो आणि
वाहन बाहेर काढले रे काढले की बाईसाहेब थेट पुढच्या जागेवर आपला रुबाब दाखवत. कितीही
सांगितले, रागावले तरी ती दुर्लक्ष करायची. तिला एक फेरी मारुन आणली तरीही तिचे समाधान
व्हायचे नाही. शेवटी तिला घेवूनच गावातील काम मला उरकावे लागायचे.
रात्री अंगणात कधी एकादा
साधा बेडूकही येत नसे. सरडा, चिमण्या समोर लिंबावर बसणारे कावळे, साळुंख्या यांच्यावरही
ती भुंकत असे. गंमत म्हणजे कधी-कधी हे पक्षी तिच्या भुंकण्याने उडून जात, तशी ही शांत
होई. सीताफळाच्या हंगामात बरेच पक्षी फळे खायला झाडावर बसत. अशावेळी शॅडो त्यांच्यावर
खूप भुंकायची. पण, यावेळी पक्षी तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. मग आपलं कुणी आता ऐकत नाही,
हे पाहून ती शांतपणे बसायची. शॅडो आता घरची सदस्य झाली होती. दिवस असे भराभर जात असतानाच,
माझी कोल्हापुरात पुन्हा बदली झाली. तसा मला खूप आनंद झाला. माझ्याच जिल्ह्यात आणि
कुटुंबासमवेत मला रहायला मिळणार होते.
पावसाळ्याचे दिवस होते.
कोल्हापूरला पावसाळा नवा नव्हता. पण, त्यावर्षीचा पावसाळा काही औरच होता. सगळी धरणं
भरली. धरणातून सोडलेल्या पाण्याने कृष्णा-पंचगंगा पात्रातून बाहेर पडल्या. अशातच पावसाला
जोर चढत होता. परिस्थिती गंभीर होणार, हे दिसत होतं आणि दररोजचा रात्री-अपरात्री चा
प्रवास करुन मलाही दमायला व्हायचं. याचा विचार करुन कोल्हापुरातच रहायला यायचा विचार
पक्का केला. घर पाहताना शॅडोचाही विचार केला आणि शॅडोला शेजारीच राहणाऱ्या भोसलेसरांच्या
मेव्हण्याकडे सोडावे लागले. शॅडोला नवे घर, नवी माणसं आणि विशेष म्हणजे शेतातील अन्य
पाळीव जनवरेही मित्र म्हणून मिळाले होते. तिला सोडून येताना झालेली दोघांचीही घालमेल
लपवू शकत नव्हतो. मुंबईला जाताना सांगलीला एकदा सौ च्या मैत्रिणींच्या शेतात तिला काही
दिवस ठेवले होते. त्यानंतरही तिला पर्यटनाला जाताना इचलकरंजीला डाग होस्टेलवर ठेवले
होते. शेतात राहण्याचा शॅडोला हा अनुभव तसा नवीन नव्हता. पण, प्रत्येकवेळी आम्ही परत
येताना तिला घेवून घरी आलो होतो. यावेळी मात्र, तसे अजिबात झाले नाही.
त्यावर्षी जिल्ह्यात पूर
आला. कधी नव्हे ते आणखी पाणी वाढून महापूर आला. तो ओसरला आणि पुन्हा पाणी पातळी वाढून
पुन्हा लगेचच पूर आला. मी रहात असणाऱ्या इमारतीतही वाहनतळात पाणी भरुन शॅडोचे आवडते
वाहन पाण्यात सपशेल बुडाले होते. कोल्हापुरात असूनही मी विश्रामगृहात आणि सौ घरी एकटी,
अशी काहिसी विचित्र परिस्थिती झाली होती. पूर ओसरला. जाताना शॅडोचे वाहन कायमस्वरुपी
निकामी करुन गेला. मनात आले, अशावेळी जर शॅडो असती तर.. आणि काळजात चर्र झाले. तिचे
नशिब बलवत्तर म्हणून ती आजही आपल्या नव्या माणसांसोबत, मित्रांसोबत आनंदात आहे. गावी
गेल्यानंतर तिच्याविषयी आवर्जुन विचारपूस होतेय. पण, तिला भेटण्याचे धाडस होत नाही.
कारण, ओसरलेला मनातला पूर पुन्हा एकदा बांध फोडून वाहू लागेल, याचीच भीती सतावत असते
!
-प्रशांत सातपुते
9403464101



समोर scene च उभा केला...मस्त लिखाण...
ReplyDeleteखुप छान वर्णन. वाचताना गुफी शॅडो डोळ्यासमोर उभे राहिले
ReplyDelete