चव



   ळटळीत उन्हातून घरी परतलो. घामेजलेल्या अंगावर शॉवरचे तुषार घेऊन अंग पुसत थेट स्वयंपाक घरात उदर भरणसाठी विसावलो. कोरट्याची चटणी, बेसणची वडी, वरणा घालून केलेली वांग्याची मिसळ भाजी अशी खास असणारी गारव्याची भाकरी सौ. ने माझ्यापुढे ठेवली.
   "गारव्याची म्हणजे कसली ?"असा बाल प्रश्न माझ्या मुलाने केला. त्याला उत्तर न देताच मनाने मी त्याच्या इतका होत भूतकाळात सरकलो.
   अगदी दाटीवाटींची ओळ म्हणजे आमची गल्ली. माझ्या जुन्या घरांपासून 6 वं घर हे हारूबाईचे होते. तिचे घर म्हणजे कौलारू दोन खोल्या होत्या. त्यामध्ये ती एकटीच राहायची. तिच्या दारात गटारासाठी कधीकाळी आणलेला पण सध्या फुटलेल्या अवस्थेत असणारा सिमेंटचा नळा होता. तो जमिनीत पुरून त्यात काळीकर्द माती घालून तिने चांगले तुळशीचे रोप लावले होते. तेच तिचे वृंदावन !
   शेवया वळायचा लाकडी पाट असतो ना तितक्या रूंदीची केसांची जट तिला होती.  अगदी भल्या पहाटे ती उठत असे. देवपूजेनंतर तुळशीला पाणी घालून ती उदबत्ती लावायची. त्यानंतर आपल्या जटेवर हळदी-कुंकू वाहून तिला धुपारतीने ओवाळायची. त्याचवेळी तिची ही भली थोरली जट उघडी पडायची, नाहीतर त्या जटेसाठी खास शिवलेल्या कापडी पिशवीत ती सदैव बंदिस्त असायची. वयाच्या उतरणीला लागलेल्या हारूबाईचा उल्लेख तिच्या नावानेच व्हायचा. गळ्यात पोवळ्याची माळ, पंढरपूरच्या विठोबाची तुळशीची माळ, भंडा-याची पांढरी पिशवी आणि तिच्या रंडक्या कपाळावर ठसठशीत इबीताचा पांढरा पट्टा, त्याच्या मध्यावर काळा बुक्का, त्याखाली दोन्ही डोळ्यांच्यामध्ये गुलालाचा टीळा असायचा.
   आख्ख्या गल्लीतली थोरली माणसं कामाधंद्याच्या निमित्ताने घराबाहेर पडली की मधूनच शाळा चूकवून आमची कंपनी तयार व्हायची. मुडलग्यांचा यमन्या, सतत नाकातनं शेंबूड गाळणारा कलाईगारांचा बाळ्या, ज्हांग्या, सिक्या, उच्च्या, जांगड्यांचा आशा, सिध्दू आणि कार्टून सुन्या ही हिकमती, इरसाल आणि तितकीच इब्लीस सातत्यानं आघाडीवर असायचीत. कोणाच्या घरात काय-काय खायला मिळेल, हे हुंगतच ही कंपनी फिरायची. परिस्थिती सर्वांचीच बेताची असल्याने फारसं चांगलं कधी या कंपनीच्या हाती लागत नसे.
   हारूबाई महिना दोन महिने पंढरीच्या वारीला नाहितर आणि कुठल्या देव दर्शनाच्या निमित्ताने गायब असायची. या देवदर्शनावरून परतून आली की, तिच्या दुरडीत हळद घालून केलेला राळ्याचा भात, कवडीसारखं घट्ट दही, पुरण पोळ्या, चपात्या, कडबुळं, कानुलं, लाडू, भाकरी त्यावर बेसण वडी, कोरट्याची चटणी, कधी लसणाची, वरणा घालून केलेली वांग्याची मिसळ भाजी, आंबील असले हाताला फार कमी लागणारे चविष्ट पदार्थ असायचे. त्यामुळेच हारूबाई गल्लीत असली की दुपारची कंपनीची बैठक तिच्या सोफ्यातच असायची. तिही प्रेमभराने आम्हा सर्वांना खाऊ घालायची. आम्हीही मग चापून खायचो आणि दुस-या दिवशीची वाट पाहात चोपून झोपायचो.
   आठवड्याभरात तिच्या घरी सतत काय ना काय देवादिकाचं चालायचं. कधी ती  देव बोलवायची तर, कधी आसपासच्या जोगतिणींना बोलवून देवपूजा करायची. यासाठी प्रसाद म्हणून आंबील असायची. तिच्या घरी थंडगार गेळ्यात आंबील तशी रोजच व्हायची. मातीच्या थंडगार गेळ्यातील ही आंबील भर उन्हात पेल्यातून पितांना मला कोण आनंद व्हायचा. पेला खाली ठेवण्यापूर्वी जिभ रिकाम्या पेल्यातून पुन्हा एकदा वळवळायची, घसरत येणारा लसूण तोंडात गेल्यावरच मी पेला खाली ठेवी. मग आंबलीची ओठांवरची पिवळी मिशी जिभेने साफ करून तृप्तीची ढेकर देई.
    सगळी गल्ली तिला "करणी-धरणीची बाई हाय" म्हणून वचकून असायची. दसरा चौकातल्या मरगुबाईची यात्रा असो नाहीतर रेणुकाची ! तिची प्रसादाची आंबील गल्लीभर फिरायची. परंतु भीतीपोटी तो प्रसाद तसाच तुळशीच्या वृंदावनात जाई. याला पुष्टी मिळायची ती जांभळ्याच्या म्हातारीच्या रोजच्या भांडणामुळे.
हारूबाईच्याशेजारीच जांभळ्याची म्हातारी राहायची नामदेव हा तिचा मुलगा. हा नामदेव कधी सायकल विसर, बाजारला गेल्यावर बिडीच्या नादात बाजाराने भरलेल्या पिशव्या विसरून यायचा, तर कधी दुकानदाराला सगळे पैसे देऊन तसाच घरी परतायचा. अशा या हेंद्रट नाम्याला सगळी  ‘येडा नाम्या’ म्हणत. नामादेखील आपले खरे नामदेव हे नाव कधीच विसरून गेला होता.
    '' माज्या शान्या नाम्यावर हारूनंच करणी केली'' अशी नाम्याची आई म्हणायची.
   " माजं घर ही अवदसा बळकवायला बसल्या," असे म्हणत ती हारूला कशावरूनही रोज शिव्या हासडायची.
   ही जांभळ्याची म्हातारी दररोज अस्संल गावरान शिव्या नव्यानं जन्माला घालायची. या म्हातारीकडे हा शिव्यांचा भांडार त्यावेळी कोठून यायचा, असा प्रश्न मला आजही पडतो. हारूबाई मात्र,कधी एका चकार शब्दाने तिला उलटून बोलायची नाही.
एका रविवारी कंपनीतल्या करामती पोरांनी गंमतीने  या येड्या नाम्याला दारू पाजली. कधी न पिणारा नामा बिडी ओढत एका हाताने सायकल सांभाळत भेलकांडत आला, आणि गल्लीच्या तोंडावर सपाटून पडला. चांगल्या कोचीच्या दगडावरच पडल्याने नामाच्या डोक्याला भली मोठी खोप पडली. कुणीतरी ही वार्ता नाम्याच्या आईच्या कानावर घातली, तसा तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तो हारूच्या नावानेच.
   "सटवेss..कुठे फेडशील हे पाप. माज्या मुलाच्या जिवावर का उठलीस ग टवळे.. "नाम्याला घेऊन घरात आली, आणि तिच्या तोंडाचा पट्टा पुन्हा जोरात सुरू झाला.
    "कुठल्या कोन साळकाया-माळकाया घरात घेऊन बसती..सगळ्या गल्लीवर करणी करती. हिला गल्लीतनं घालवा .. "
    "जांभळ्याच्या म्हातारीला अक्कल कशी न्हाई म्हणतो मी.. " एकीनं दुसरीजवळ कुचकुचलं
    तशी दुसरी म्हणाली,"बघता देखता करणीची बाय.. कशाला शिव्या-शाप द्यायच्या…" अशी पाकोळीगत बायकांची कुचकुच थोडावेळ चालायची. 
    दर रविवारी सुट्टी साधून घर सारवण्याचा जणू सामुहिक कार्यक्रम गल्लीत ठरलेला असायचा. अशाच एका रविवारी हारूबाई तिच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या भोसल्याच्या म्हातारीकडे गेली. या भोसल्याच्या म्हातारीचा किसन हा मुलगा त्यावेळी पुण्यात नोकरीला होता. ही भोसल्याची म्हातारी चार गाई पाळून एकटी राहायची. कधी कोणाकडे न जाणारी हारूबाई  आज तिच्या दारात उभी होती.
   "हाईसाss..का घरात ?" म्हणून तिने आवाज दिला.
    तशी " कोण हाय?" विचारत भोसल्याची म्हातारी दारात आली.
   समोर उभ्या हारूला बघून भोसल्याची म्हातारी मनात चरकली. "ही अन् बैदा कशापाई?"  असा प्रश्न तिच्या चेह-यावर उमटला. ती काय बोलायच्या अधीच हारू म्हणाली.
" देव बोलवायचं हाईत गाईचं शेण देता?"
अगोदरच चरकलेल्या तिच्या मनाला दरदरून घाम फूटला होता. काय आणि कसं बोलावं या नादात आपल्या गायींच्या काऴजीनं तिला घेरलं. तिची दृष्ट नजर आता आपल्या जनावरांवर पडली हे पाहून तिला रागच आला. तशी ती चरफडत बोलली,"देव बोलवायचं तर बोलीव पण शेण मिळणार न्हाई ."
   एका शब्दाने न बोलता हारूबाई नेहमीप्रमाणे वैरणअड्ड्यात गेली. तेथून तिनं गाईचं शेण आणलं, आणि सगळं घर तिनं सारवून काढलं. हारूच्या घरात आज जाम गर्दी होती. जोगतिणी आपा-पलं जग घेऊन कुठनं कुठनं आल्या होत्या. चौंडकं, तुणतुणं वाजत होती, तशी दिमडीही त्याला साथ देत होती. त्यांची जत्रा झाली. जेवणं होऊन दुपार टऴली. उन्हं उतरणीला आली.
आज बाजाराचा दिवस असल्याने जो तो धावपऴीत होता. कोण बाजारात चालला होता तर कोण बाजार करून येत होता. आणि एकमेव फोन असणा-या खुरपे दिवाणजींचेया घरात फोन खणाणला,"किसन भोसलेचा अपघात झाला आहे, तसा निरोप त्याच्या घरात द्या."
   बाजारला पिशव्या घेऊन जाणा-या सर्वांची भोसल्याच्या घरात गर्दी झाली. भोसल्याच्या म्हातारीचा दंगायोट चालला होता. सांत्वन करताना जांभऴ्याची म्हातारी पुन्हा हारूवर घसरली होती, आता त्यात भोसल्याची म्हातारीही उतरली होती.
खाणकाम चालणा-या जिलेटीनच्या स्फोटानं हादरे बसावेत, तसे हादरे गल्लीला बसत होते.जो तो काऴजीनं घेरला जात होता.
    "शेणाला कशाला न्हाई म्हणायचं"
    "आता केवड्याला पडलं हे सारं.."
   "म्हातारीची बुध्दच हरपली जणू.. "
   अशा जमलेल्या पाकोऴ्या भोसल्याच्या घरातनं बाहेर पडताना एकमेकीत कूचकूचत होत्या.
          एकशिवडी बांध्याची रॉकेलवाली आकनी ही भांडकुदऴबाई म्हणून  गल्लीत प्रसिध्द होती. तिचा नवरा रेशनिंग दुकानात रॉकेल वाटायला असतो म्हणून तिचे आडनाव रॉकेलवाली पडले होते. निवडणूक आल्यावर पाच वर्षातून एकदा मतदारांच्या चिठ्ठया वाटताना तिच्या ख-या आडनावाचा गल्लीला बोध व्हायचा, पुन्हा तिचे आडनाव सगळे विसरून जायचे.
   कार्टुन सुन्या आणि मुडलग्याचं यमन्या 'महा इदरकल्याणी' त्या दोघांच्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघायच्या यमन्याच्या आईबरोबर पाण्यावरून या आकनीचे भांडण झाले, त्याचरात्री यमन्यानं बिब्ब गोऴा केलं. मदतीला सुन्याला गेऊन त्यानं त्यात जमतील तशा टाचण्या, सुया खोचल्या.दोन लिंबू कापून त्याला हऴद-कुंकू लावलं. काऴ्या कापडाची एक बाहुली बनवून हा सारा 'भानामतीचा' मामला आकनीच्या दारात नेऊन टाकला. यमन्याचा हारूबाईवर भलताच विश्वास होता. तिला कुणी त्रास दिला की त्याचं काही खरं नाही हे योजूनच त्यानं हा प्रकार केला होता, आणि झालंही तसंच.
   सकाऴी उठल्या उठल्या दारात पडलेला मामला पाहून आकनीनं थेट हारूबाईवरच शिव्यांचा भडीमार सुरू केला. हारूबाई मात्र, शांतपणे चावीवर पाणी भरत होती. तसा आकनीला आणखी चेव आला, तिने सरऴ पुढे जात तिच्या जटेलाच हात घातला. तासभर शिव्या घालणारी ही आकनी एकाएकी बेशुध्द होऊन खाली पडली. शुध्दीवर आली तशी तिनं अंथरूण धरलं. आठवडा म्हणता महिनाभर तापानं फणफणली. पुन्हा मोरीत पाय घसरून पडली. आता मात्र जाणती माणसं उघड बोलू लागली,
  'आकनी काय ह्यातनं आता वाचत न्हाई'
    सुताराची म्हातारी, रॉकेलवाला आणि चार माणसं हारूबाईकडे आकनीला घेऊन गेली. तिला माफी मागायला लावली.
  'काय चुकी झाली असली तर माफी कर गं बाये माजी..' अशी आर्त विनवणी देवीला हारूबाईनंच केली. हारूनं तिला भंडारा लावला. आठवड्याभरात आकनी गल्लीत हिंडू फिरू लागली.
   नगरपालिकेच्या नऴावर पाणी भरण्यापुरताच हारूचा तसा गल्लीशी संबंध असायचा सदैव ती आपल्या नादात विनातक्रार राहायची. तिच्या करणी-धरणीच्या कथा मोठ्यांच्या तोंडातून तेल-मीठ लावून चर्चिल्या जायच्या. हे सर्व  ऐकून आम्हाला रात्री भीतीच वाटायची. स्वप्नातदेखील त्या सतावत असत. पण, सकाऴ होताच आणि घरातली माणसं कामावर गेली की, रसना चाऴवत तिची भीती लोप पावत असे.
  'हारूच्या वऴचणीलादेखील नदर पडायच न्हाई.' घरातून निघताना मोठी माणसं असे दहावेऴा बजावत असत. मात्र, आमची कंपनी बिनबोभाट तिच्या सोफ्यात असायची याचा थांगपत्ता घरातल्या मोठ्यांना नसायचा.
   हारूच्याबद्दल गल्लीत तीव्र विरोध वाढत होता.तिला गल्लीतून हूसकवून लावायचं हा जाम निर्णय प्रत्येकवेऴी व्हायचा, पण पुढाकार कोण घेणार? या प्रश्नावर येऊन गाडी तटायची. मग जो तो उठून आपल्या घरी परतत असे. सकाळ झाली की माकडाच्या कथेसारखं सारी माणसं कामा-धंद्याला निघून जात. पुन्हा हारूचा विषय मागे पडायचा.
   बहुधा याची कुणकुण हारूला लागली असावी की काय कोण जाणे. एकदा ती वारीला म्हणून गेली ती परत माघारी कुणाला दिसली नाही. 'घर बऴकावेल' असा आरोप असणा-या हारूबाईचेच घर प्रत्यक्षात कोणीतरी बऴकावले होते. त्यानंतर ब-याच वर्षाने शेख नावाच्या मुस्लिमाने खरेदी केले होते.
    ताटातील गारव्याची भाकरी, त्यावरची बेसण वडी, मिसऴ भाजी, कोरट्याची चटणी पोटात ढकलून मी उठलो. बाहेर उभी केलेली मोटरसायकल सुरू केली. दोन्ही भुवया वर उचलत 'कुठे निघालास?' असा पत्नीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी अजिबात थांबलो नव्हतो. 15 मिनीटात मी हारूबाईच्या घरासमोर उभा होतो.
   जुन्या काऴातल्या कौलारू घराच्या ठिकाणी नवीन वास्तुच्या खुणा स्पष्ट जाणवत होत्या. अंगणात घराचा मालक मुन्ना शेख फॅब्रिकेशनचं काम करत बसून होता. मला अगंतूक पाहून त्याच्या घरातील मंडऴींच्या चेह-यावर विस्मय पसरले होते. गल्लीतील आणखीही दोन घरातील मंडऴी थोडी बाहेर येऊन माझ्याकडे कौतुकमिश्रीत शंकेखोर नजरेने पाहात आहेत, असं उगीचच मला वाटलं. ब-याच दिवसांनी मी गल्लीत गेल्याने ओऴखीच्या घरातून आग्रह होत होता. या सर्वांकडे दुर्लक्ष करून माझी नजर हारूबाईच्या वास्तवतेच्या आठवणीवर खिऴली होती.
   तिची एकमेव आठवण करून देणारे तिचे वृंदावन मात्र जसेच्या तसे होते. कदाचित तिच्या भीतीने...
   त्या फूटलेल्या सिमेंटच्या पाईपमधून काऴी तुऴस तरारून बाहेर डोकावत होती. काऴा पसरलेला पर्णसंभार पाहून क्षणभर मला तिच्या उघड्या जटेचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. पुढे होऊन एक पान मी हातानं खुडलं.ते तोंडात टाकून आल्या पावली माघारी वऴलो. तिच्या दुरडीतील मिसऴ भाजीची 'चव' तोंडात रेंगाऴते आहे, हे मात्र यावेळी नक्की जाणवलं.
                                                         
                                                                 -- प्रशांत सातपुते
                                                                 p7sons@gmail.com
                                                                 9403464101            

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..