आठवण..एका जन्माची..पुनःजन्माची..!
*मृत्यूच्या दाढेतून सहिसलामत बाहेर पडून उद्या बरोबर आठ वर्षे होतायेत...होय तब्बल आठ वर्षे सरली. पहिली एक-दोन वर्षे केवळ आठवणीने अंगावर काटा शहारायचा पण, काळ हा सर्वांवर जालीम औषध आहे..तसे म्हणाल तर उद्या माझा दुसरा वाढदिवसच..!*
*२१ जून २०१२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांकडे एका बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर तत्कालीन संचालक प्रल्हाद जाधव, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आणि सध्याचेही जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे, तत्कालीन आणि सध्याचे उप मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख, विशाल ढगे, तत्कालीन गृहमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी किशोर गांगुर्डे, माझे सहकारी निवृत्त अधिकारी हेमंत खैरे आणि मी असे सगळेजण एकत्र होतो. आता बैठक सुरू होणार, इतक्यात मंत्रालयाला आग लागल्याचे समजले.*
*सुरूवातीला आगीची भीषणता फारशी जाणवली नाही. किरकोळ आग असावी आणि ती विझवली जाईल अशा विचारात आम्ही सगळेजण निवांत होतो. त्यानंतर मात्र, आम्ही सगळे एकत्र असणाऱ्या दालनालाच धुरांनी वेढले आणि बाहेर दबा धरुन असलेल्या धुराने मिळेल त्या फटीतून आत येण्यास सुरुवात केली. दरवाजा उघडून बाहेर निसटायचा प्रयत्न करताना, बाहेर सगळा काळोख दिसून आला. अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वीज गेलेली. नाका-तोंडात-डोळ्यात धूर जावू लागला आणि क्षणार्धात आगीची भीषणता जाणवली. तसा दालनाचा दरवाजा बंद केला. पण तरीही मघापासून बाहेर दबा धरुन बसलेला धुराचा लोट उघडलेल्या दरवाज्यातून अचानकपणे आत घुसला. जणू गर्दीने रेटा द्यावा अन् दरवाजा किलकिला असावा अगदी तसा.! दुपारची वेळ असूनही आता दालनात चांगलेच "धुरांधले" होते. धुराने आम्ही गुदमरू लागलो आणि आयुष्यात प्रथमच समोर उभा ठाकलेल्या मृत्यूची जाणीव झाली.*
*जिवंत राहण्याची धडपड आता सर्वांची सुरु झाली. एन सी सी मध्ये मिळालेले प्रशिक्षण इथे कामाला आले. खिश्यातून रुमाल काढला आणि प्रथम नाकावर बांधला. गुदमरायला लावणाऱ्या धुराला वाट मोकळी करुन देण्यासाठी आणि दालनातून बाहेर सुटण्यासाठी मार्ग शोधू लागलो. खिडकीवरील असणारे काचेचे तावदान एका दमात फोडले.*
*डोळ्यांसमोर प्रियजनांचे चेहरे क्षणभरात तरळू लागले आणि जगण्याची "आसक्ती" आता "सक्ती" वर उतरली होती. जगण्यासाठी प्रचंड ऊर्जा घेवून आली होती. आणि झालेही तसेच.*
*आता दालनाचा धुराने पूर्णपणे कब्जा घेतला होता. धुरामुळे धग जाणवू लागली. आगीतून बाहेर पडण्यासाठी जिवाच्या आकांताने काच फोडलेल्या खिडकीतून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागलो. खिडकीतून बाहेर येऊन, भिंतीला चिकटून असणाऱ्या पाण्याच्या पाईपला धरून आम्ही ५ व्या मजल्यावरील लॉफ्टवर उतरलो. इथे जरा जरी चूक झाली असती, तर हात सुटून थेट ५ व्या मजल्यावरुन शरीर "खाली" कपाळमोक्षतेसाठी आणि मी इहलोकीला "वर" गेलो असतो. पण, आयुष्यात केलेली गड-कोटांची मोहीम इथे फत्ते झाली होती. खालून वर खिडकीकडे पाहिले.. तर ज्या खिडकीतून आम्ही उतरलो होतो, त्या खिडकीतून आता अक्षरशः आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट बाहेर पडत होते. या ज्वाळा आणि धुरात अडकून श्री. खैरे आणि अन्य खिडकीतच बेशुद्ध पडलेले दिसत होते.* *एव्हाना अग्निशमन दल आले होते. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने बकेटमधून प्रथम त्यांना बाहेर काढले. लाॕफ्टवर येवून मोकळ्या हवेत भरभरुन आॕक्सिजन घेतानाच मोबाईलवरुन अनेकांना संपर्क करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु होता. पण, नेटवर्क ने आधी-मधी साथ सोडली होती. त्यांने चांगलाच दगा यावेळी दिला होता.*
*काहीवेळाने लाॕफ्टवर येवून थांबलेल्या आम्हा सर्वांनाही अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने खाली आणले. आतापर्यंत एकवटलेली सगळी ऊर्जा क्षणार्धात लोपली आणि ती जागा अश्रुंनी घेतली. डोळ्यातून ते थांबत नव्हते. आमच्यातील बरेचजण जायबंदी झाले होते. अनेकजणांचा रक्तदाब आणि साखर वाढलेली दिसत होती. पण, "जीव जाण्यापेक्षा केवळ शेपूट तुटण्यावर निभावले होते."*
*प्रथम मी माझ्या माईला मोठ्या बहिणीला फोन करुन सगळा वृतांत सांगितला मग आई आणि सौ..! आयुष्यात मला ज्यांचे ज्यांचे आशीर्वाद ज्ञात-अज्ञात आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभले असतील ते इथे मला वाचवायला कामी आले होते.*
*आणखी थोडावेळ आम्ही दालनातच अडकलो असतो तर..खिडकीतून बाहेर यायलाच जमले नसते तर..हा विचार आजही केवळ अंगावर काटा आणत नाही तर, मन सुन्न करून जातो.*
*आजही तो प्रसंग आठवला की शब्दच सुचत नाहीत...केवळ अस्वस्थता वाढते. सुरूवातीला कित्येक दिवस स्वप्नात मी धुरांमध्ये गुदमरतोय...असेच दिसायचे आणि मी दचकून जागा व्हायचो.*
*आम्हा सर्वांच्या हातून निश्चितच काहीतरी चांगले कार्य झालेले असावे, त्या सर्वांचे आशीर्वाद म्हणून आम्ही वाचलो. परंतु या भीषण अपघातात कै. तुकाराम मोरे, कै. मोहन मोरे, कै. उमेश पोतेकर, कै. महेश गुगळे आणि कै. शिवाजी कोरडे या पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. ही खूप मोठी हानी आहे. या पाचही जणांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली..!*
*काळ हा सर्वांवर एकमेव उत्तर आहे. यातून बोध ज्याचा त्याने घ्यायचा. आयुष्यात कोणत्या वळणावर मृत्यू उभा ठाकला आहे, हे केवळ त्यालाच माहिती असते. मिळालेले जीवन रडत-कुढत, नैराश्येत काढायचे की छोट्या-छोट्या गोष्टीत असणारे समाधान मिळवत..!
मानवाला "विस्मरण" ही निसर्गानं अलौकीक देणगी बहाल केली आहे. ती नसती तर...
*"लहानपणी अजाणतेपणी तोडलेल्या बाहुलीचे दुःख मानव स्वतःच्या अंतापर्यंत करीत राहिला असता..*
..आणि मिळालेले "स्मरण" वरदान
*"वर्तमान आणि भविष्य जगायला प्रेरित करते..*
मी मात्र, माझ्या जीवनात स्वच्छंदपणे, मोकळा-ढाकळा जगण्यासाठी याचा बोध घेतला आहे. बरोबर-की चूक याचे प्रमाणपत्र इतरांकडून मला घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, आणि त्याची तसदीही त्यांनी घेवू नये. जन्म..पुनःजन्म खूप काही शिकवून गेलाय..आणि जागोजागी वळणा-वळणावर अजूनही शिकवतोय..!*
*-प्रशांत सातपुते*
*p7sons@gmail.com*
*9403464101*





Comments
Post a Comment