युनेस्कोचा सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी एशिया पॅसेफिक 2014 पुरस्कार प्राप्त किन्हईचे हेमाडपंथी मंदिर
सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या उत्तरेला वसना नदीच्या तिरावर वसलेले गाव म्हणजे किन्हई ! गावाच्या पूर्वेकडील टेकडीवर म्हणजेच साखरगडावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराला 28 फेब्रुवारी 2015 रोजी युनेस्कोतर्फे सांस्कृतिक वारसा संवर्धनाचा 2014 साठी एशिया पॅसेफिक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 250 वर्षापूर्वीचे मंदिराचे हेमाडपंथी शैलीतील बांधकाम आजही नव्या वास्तुशास्त्राला प्रेरित करणारे आहे.
कोरेगावच्या उत्तेरला 11 किलोमिटरवर आणि साताऱ्यापासून 25 किलोमिटर अंतरावर किन्हई हे गाव आहे. गावाच्या आग्नेयेस असलेल्या टेकड्यांपैकी पूर्वेकडील टेकडीवर साखरगड निवासिनी यमाई देवीचे मंदिर आहे. सध्या ग्रामस्थ बोली भाषेत आंबाबाईचे मंदिर असा उल्लेख करतात. मंदिराकडे जाण्यासाठी किन्हईपासून 2 किलोमिटर डांबरी रस्ता आहे. त्याचबरोबर 442 दगडी पायऱ्या चढल्यानंतर साखरगडाच्या भव्य अशा पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर आपण जातो. पूर्वेकडे आणखी एक लहान प्रवेशद्वार असून ते टेकडीच्या दक्षिणेकडून येणाऱ्या भाविकांसाठी आहे. मंदिराभोवती तटभिंत असून तिला आतून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या आहेत. पश्चिमेला असणाऱ्या प्रवेशद्वारावर कमान असून या कमानीवर नगारखाना आहे. गडावरील सर्व बांधकाम दगडी असून ते हेमाडपंथी शैलीतील आहे. काही ठिकाणी बहामनी शैली पहायला मिळते.
या देवीविषयी अशी अख्यायिका ऐकायला मिळते. हिरवे येथील कुलकर्णी नावाचे भक्त रोज घोड्यावरुन औंध येथे देवीच्या दर्शनाला जात असत. अशा पद्धतीने 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यांची पत्नी गरोदर असतानाही ते नित्यनियमाने औंध येथील देवीच्या दर्शनाला जात होते. श्री. कुलकर्णी औंध येथील देवीच्या पुजेत राहिले असताना देवीने त्यांच्या बहिणीच्या रुपात येऊन पत्नीचे बाळंतपण केले. श्री. कुलकर्णी यांच्या तपश्चर्याने व भक्तीभावाने प्रसन्न होऊन देवीने श्री. कुलकर्णी यांना वर मागण्यास सांगितले. त्यावेळी देवीने आपल्या गावी यावे अशी अपेक्षा श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. देवी प्रसन्न होऊन कुलकर्णी यांच्या मागे येण्यास निघाली. परंतु तिने एक अट घातली मागे वळून पहायचे नाही. काही अंतर चालल्यानंतर देवी खरोखर आपल्या पाठीमागे येते की नाही म्हणून त्यांनी पाठीमागे पाहिले आणि देवी तेथेच अंतर्धान पावली. त्यानंतर पुन्हा कुलकर्णी यांनी देवीची मनोभावे पुजा केली. त्यावेळी त्यांना देवीचा दृष्टांत झाला व ज्याठिकाणी वनगाई दूधाच्या धारा सोडेल त्या ठिकाणी मी असेन असे सांगितले. साखरगडावर वनगाईने दूधाच्या धारा सोडल्याचे आढळल्याने त्या ठिकाणी श्री. कुलकर्णी यांनी देवीची स्थापना केली.
औंधच्या पंतप्रतिनिधींनी सर्वसाधारपणे 250 वर्षापूर्वी मंदिराचे बांधकाम केले. औंधच्या पंतप्रतिनिधी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या प्रमुख ट्रस्टी आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजुच्या छताजवळ लहान प्रवेशद्वाराच्या उत्तरेकडील दोन्ही बाजूला दीपमाळा आहेत. यातील एक दीपमाळ सुमारे 45 फूट उंचीची आहे. मंदिराचा गाभारा चौकोणी असून तो दगडी आहे आणि त्यावरील कळस हा वीट, चुना यापासून बनविलेला आहे. यावर आकर्षक, सुबक मुर्त्या बनविलेल्या आहेत. गाभाऱ्यामध्ये पितळी मुखवटा असलेली देवीची मुर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये दगडी खांबाची रचना असून ती आकर्षक आणि भव्य आहे. गाभाऱ्याच्या समोर असणारा सभामंडप हा पूर्णपणे 30 लाकडी सागवाणी खंाबावर उभा आहे. या लाकडी सभामंडपामध्ये आकर्षक नक्षीकाम केलेले आढळते. येथेच देवीची पालखी ठेवण्यात आली आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा हा देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस असतो. औंध येथील यमाई देवीची पालखी चतुर्दशीला किन्हईला देवीच्या भेटीसाठी येण्यास निघते. साखरगड निवासिनीची पालखी द्वादशीपासून किन्हईत जाण्यास सुरुवात होते. गावातील उत्सव बंगला हे यात्रेचे मुख्य ठिकाण आहे. पौर्णिमेला दोन्ही देवीच्या पालखीची साखरगडाच्या पायथ्याशी भेट होते. त्यानंतर किन्हईतील उत्सव बंगल्यामध्ये दोन्ही देवी तीन दिवस असतात. तेथे भाविक दर्शनाचा लाभ घेतात. दिवसभर दर्शनानंतर रात्री छबीना असतोे. छबीन्यानंतर साखरगड निवासीनीची पालखी साखरगडावर येते. यमाई देवीची पालखी उत्सव बंगल्यात थांबते. तिसऱ्या दिवशी दोन्ही पालख्या गडावर येतात. चौथ्या दिवशी दोन्ही देवीची एकत्र महापुजा साखरगडावर केली जाते व सायंकाळी यमाई देवीची पालखी औंधच्या प्रवासाला निघते.
शारदीय नवरात्र उत्सवात विधीवत घटस्थापना झाल्यानंतर 9 दिवस रोज षोडकचार्य पुजा, अभिषेक, महानैवेद्य, आरती, पालखी मिरवणूक, सप्तशती पठण, अष्टमीला होमहवन, सुवासिनी हळदीकुंकवाचा सडा पालखीसमोर टाकतात. किन्हईतील मानाचे निशान गडावर येते, असे धार्मिक कार्यक्रम होतात. दर मंगळवारी दुपारी 12.30 वाजता देवीच्या पादुकांची आवारातून पालखी मिरवणूक निघते. दर पौर्णिमेला दुपारी व रात्री आवारातून मिरवणूक निघते.
या मंदिराचा 2013-14 मध्ये जीर्णोध्दार करण्यात आला. सतीश वासुदेव कुलकर्णी, श्रीरंग वासुदेव कुलकर्णी, मुकुंद वासुदेव कुलकर्णी आणि मृणालिनी सुहास सामंत या भावंडांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. डॉ. कालिदास सीताराम अयाचित हे सध्या देवीचे पुजाअर्चा करतात. अयाचित कुटुंबांची ही दुसरी पिढी आहे. जीर्णोध्दारामध्ये मूळ ढाच्याला धक्का न लावता अत्यंत सुंदर, आकर्षक, सुबक पद्धतीने काम करण्यात आले आहे. सांस्कृतिकतेचा मूळ वारसा जपण्याचा पूर्णपणे चांगला प्रयत्न या जीर्णोध्दारामध्ये करण्यात आला आहे. याची दखल युनेस्कोने घेत सांस्कृतिक वारसा संवर्धनाचा 2014 साठी एशिया पॅसिपीक पुरस्कार देऊन गौरविले आहे. पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरीत करण्यात आला आहे. 250 वर्षापूर्वी हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे मंदिर आजही वास्तुशास्त्राला प्रेरित करणारे आहे.
- प्रशांत सातपुते





Comments
Post a Comment