लक्ष्मीपूजन



    नरकचतुर्थीची म्हणजेच आजच्या लक्ष्मीपूजनाची घरात धांदल सुरु होती. बऱ्याच वर्षानंतर मी ही यंदा गावाकडे परतलो होतो. गल्लीतील चार बायका सौ.च्या मदतीने उरले-सुरले फराळाचे पदार्थ करण्यात मग्न होत्या. आई सोनूला फराळ खाऊ घालत, त्यांना जवळ बसून मार्गदर्शन करीत होती. फराळ करता करता गल्लीतल्या अनेक चर्चांचा फडशा पडत होता. त्यात सध्या कोण, कोठे, काय करत आहे, या बरोबरच जुन्या आठवणी होत्या. या चर्चेने माझ्याबरोबरच सौ.ची चांगलीच करमणूक होत होती. वामकुक्षीनंतरही मी तसाच पडून होतो.
        मध्येच चर्चा थांबवून आई म्हणाली, "उठ की रं बाबा.. किती पडून राहणार हाईस..पूजेचं साहित्यं तेवढ आण बघू चटदिशी..'
        मी आळसावून बगल बदलून पुन्हा पडूनच राहिलो. पुन्हा चर्चेने जोर धरला. सुताराची भागी कशी हेंद्रट होती, तिचे किस्से ऐकायला मिळत होते. तो किस्सा संपला, तसे पदार्थ बनवूनही संपले.
        "ए बसा गं..च्या पिऊन जावा.. सुप्रिया च्या ठेव बघू सगळ्यांना" अशी आईने सुनेला ऑर्डर दिली. सोनूला माझ्याकडे पाठवून देत त्याला मला उठवायला सांगितले. पण त्याला पुढ्यात घेऊन मी पडूनच होतो. तशी ती चिडून म्हणाली,
        "तुला वेळ काळ काय समजतो काय? सणासुदीला लोऴत पडलाईस. अंगात किती जडगापणा ठेवायचा त्यो..चटचट उठावं पूजापाठ करून मोकळं व्हावं" असा त्रागा करत चहाने भरलेला कप माझ्यासमोर आदळला. मी आता उठलो होतो. भिंतीवरील घड्याळात पाहिले पाच वाजत आले होते. न्हाणीत जाऊन चूळ भरली, हात-पाय धुवून चहा घेतला. कपडे घातले. आईने सांगितलेली परंतु, मी लिहिलेली सकाळची यादी खिशामधून एकदा बाहेर काढली. तिच्यावरून एक नजर फिरवली. सोनूला सोबत घेऊन पायात चप्पल घालतच म्हणालो,
        "मळ्यात जाऊन लक्ष्मीमावशी कडून प्रथम ऊस, फुले आणि धाटं घेऊन येतो मगच गावात जातो."
        "आता कुठली रं आणायची तुझी लक्ष्मीमावशी.." खालच्या आवाजात आई म्हणाली.
        "का? काय झालं?"
        "गेली रं तुझी लक्ष्मीमावशी.."
        "कधी?"-मी.
        "वर्ष होत आलं, अंथरूणावर पडून होती. लेकांनी कुठलं-कुठलं औशदपानी केलं. पण शेवटी त्यांच्या हाताला काय घावली न्हाई बग." आईचा एकदम करूण स्वर झाला होता. मी दारात थबकून हे सारं ऐकत होतो.
                थोडावेळा घुटमळून मी पिशवी मोटरसायकलीला अडकवली. सोनूला घरात पाठवत मोटरसायकल सुरू केली आणि बाहेर पडलो.
                आमच्या माळवाडीपासून अर्धा किलोमीटरवर शिंदे, खामकर यांचे मळे आहेत. या मळ्यांमध्ये दहा-बारा घरांची मिऴून वस्ती आहे. मळ्याकडे जाताना अगदी सुरूवातीलाच रस्त्याच्या उजव्या बाजूला चिकाचं कूप लागतं. त्याच्या आतल्या बाजूला आंब्याचं डेरेदार झाड आहे. बाजूलाच दोन लिंबाची झाडं अजूनही आहेत. या झाडांच्या सावलीत आडोसा करून जनावरांचा गोठा आहे. गोठ्याच्या वरच्या अंगाला बेंगलोरी कौलांचं छोटसं टुमदार, तेवढच सुबक घर आणि त्याच्यासमोर रस्त्याच्या त्या बाजूला खास बांधून घेतलेला भला मोठा सिमेंटचा हौद आहे. मळ्यातल्या पडक्या अनगड विहिरीचं पाणी पंपानं या हौदात सोडलं जाई. हेच लक्ष्मीमावशीचं घर होतं.
                अंजू, मंजू आणि शालू अशा तिच्या तीन मुली लग्न करून जिकडच्या तिकडे संसारात रमल्या होत्या. थोरला पकू शेतात लक्ष द्यायचा, तर धाकटा राजू एम. आय. डी. सी.त नोकरीला होता. दोन सुना, पाच नातवंड, गोठ्यात दोन गाई, तीन म्हशी, घरच्या गाईचा एक खोंड आणि एक रेडी असा लक्ष्मीमावशीचा खटाला होता.
                गोरीपान अंदाजे साडेपाच फूट उंच, चाफेकळी  नाक, सतत डोक्यावर पदर, कासोटा घातलेलं कर्नाटकी छाप लुगडं आणि दातवानामुळे सीताफळाच्या बियांसारखे काळे झालेले तिचे दात, तिच्या गो-यापणावर अधिकच उठून दिसायचे.   
                दिवस उगवायला ती जवळच असणा-या आपल्या मळ्यात जाई. पिकाला पाणी  पाजवणं, भांगलण, कसपट उचलणं अशी शेतीची कामं उरकून, येताना भला थोरला चा-याचा बिंडा डोक्यावरून ती घेऊन घरी येत असे. थोरली सून स्वयंपाकाचं तर धाकटी धुणं-भांडी करायची. अशी जणू अलिखीत विनातक्रार कामाची वाटणीच केलेली होती. जनावरांच्या धारा काढणे, शेण-मूत काढणे हे काम लक्ष्मीमावशी आणि पकू दोघं मिळून करायचीत. घरात असली तरी तिचा व्याप संपलेला नसायचा. धान्याला वारा दे, ते साफ करून ठेव. जनावरांना चारा-पाणी दाखव, दुपारनंतर पुन्हा ती मळ्याकडे जायची. यात ती उसंत घेत नसे. असा तिचा दिनक्रम असायचा.
मला कळतापासून माझ्या घरी तिचे येणं-जाणं होतं. ज्या ज्या वेळी ती घरी येई, त्या त्या वेळी तिचा वटा भरलेला असायचा. माझ्या घरचे दारिद्र्य तिला चांगले ठाऊक होते. हळव्या पानाची आणि तांबूस घोळंची, पात्रची वा तांदळची भाजी, वांगी, खर्ड्यासाठी हिरव्या मिरच्या, चार-पाच कणसं असा मळ्यातला काय ना काय जिन्नस तिच्या या वट्यात असायचा. कधी कधी दोन-चार किलो जोंधळेही ती आणायची. तरातरा चालत थेट घरातच येऊन "हाईस का ग.. कुसुम घरात?" अशी साद घालून आईच्या उत्तराची वाट न पाहता भरून आणलेला वटा ती जमिनीवर रिता करायची.
घरात आई असली तर तिच्यासोबत गप्पा मारून ती बाहेर पडे, जाताना कनवटीचे दहा पैशाचे जर्मनी नाणे काढून ती माझ्या हातावर ठेवी, आणि माझा गालगुच्चा घेऊन ती निघून जाई. मी मात्र, लगेचच ते नाणे घेऊन बाजूच्याच बाबूमामाच्या दुकानात जाऊन मिळणा-या सहा पानगोळ्या घेऊन तेथेच मटकवायचो. पान खाऊन रंगल्यासारखे लालभडक रंगलेले माझे तोंड मी  मग दिवसभर आरशात पहात असे.
मी सोडून घरच्या सर्वांचा नेहमी उपवास घडायचा. थोडा मोठा झाल्यावर त्यात माझीही भर पडू लागली. अशावेळी  लक्ष्मीमावशी हा आम्हाला फार मोठा आधार वाटायचा. तिने दिलेले जोंधळे आई जात्यावर भरडून त्याच्या कण्या करी. ताकही मळ्यातून मागवून घेई. आम्ही ताक कण्या मोठ्या आवडीने खात असू. कधी कधी आमटीबरोबर या कण्या जाम मस्त लागत. मग दिवसभर आम्ही सगळे शाळेला जात असू.
आमच्या माळवाडीत हिंदू-मुस्लिम आणि त्यांच्यात असणारी अठरापगड जातीची कुटुंबं एकमेकांना खेटून राहायचीत. माळवाडी तशी सगळी कामगारांची वस्तीच होती. या वस्तीला उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड वाणवा जाणवायची. प्रत्येक घरातल्या घागरी-बादल्या बाहेर पडून पाण्याचा शोध घेत असत. कुणी मारवाडी आपल्या बंगल्यातला बोअर सुरू करून पाणी द्यायचा. मात्र, गर्दी वाढू लागताच बोअर कायमचाच बंद करी. या भीषण परिस्थितीवर मात करायला लक्ष्मीमावशीच धावत यायची. तिने आपल्या घरासमोर पाण्यासाठी भला मोठा सिमेंटचा हौदच खास बांधून घेतला होता. तिच्या शेतातील पडक्या विहिरीतील पाणी ती या हौदात सोडायची आणि हा हौद अठरापगड जातीतल्या माळवाडीसाठी सदैव खुला ठेवायची .
थोरांची ओळख या माझ्या पुस्तकातील म. फुल्यांच्या पाठाची यावेळी मला आवर्जुन आठवण व्हायची. याप्रसंगी लक्ष्मीमावशी शाळेत गेली असेल का? तिने हा पाठ वाचला असेल का? असे प्रश्न त्यावेळी मला पडत असत.
तिच्या मळ्यापासून उजव्या हाताला मादनाईकचा मळा होता. त्याच्या मळ्यात भली मोठी बांधीव विहीर होती. आमच्याच वयाचा असणारा संजू मादनाईक सतत खेळण्यासाठी आमच्याबरोबर असायचा. या संजूचा आजा मात्र, पक्का जुन्या विचारांचा होता. तो भेदाभेद मानायचा. उन्हाळ्याच्या दिवसात आमची 15-20 मुलांची कंपनी संजूच्या विहिरीवर खास पोहायला जाई. विहिरीत उतरताना त्याचा आजा एकेकाला अडवून 'तू कोणाचा रे?' अशी विचारणा करायचा.
या प्रश्नाचा रोख सुरूवातीला आमच्या लक्षात यायचा नाही. थोराड पोरांच्या लक्षात आल्यावर ते मोठ्यांने ओरडत 'आम्ही आमच्या आई-बापाचे' मग आमचाही सूर त्यात मिसळत असे.
या उत्तरावर म्हातारा जाम खवळायचा, आणि कठड्यावर आम्ही काढून ठेवलेले कपडे सरळ पाण्यात फेकून देई. आमच्या कपड्याने 'म्हाता-याची विहीर विटाळली' असे म्हणत आम्ही त्याची टिंगल करायचो. कधी-कधी थेट विहिरीत 'गठ्ठा' मारून त्याच्या अंगावर पाणी उडवायचो, आणि कपडे घेऊन पसार व्हायचो.
अंगावर उडालेल्या पाण्यामुळे चिडचिड करीत, शिव्या देत म्हातारा पुन्हा विहिरीत उतरे आणि विटाळलेल्या पाण्यातच पुन्हा अंघोळ करून शुचिर्भूत होण्याचा वेडा प्रयत्न करी. हा प्रकार नेहमी घडे. त्यावेळी याची मला विशेष गंमत वाटायची.
एके दिवशी म्हातारा नसल्याचे पाहून, आम्ही सगळे विहिरीत उतरलो. तसा अचानक म्हातारा कुठून तरी कडमडला. त्याने सगळ्यांचे वर ठेवलेले कपडे उचलले आणि मळ्याकडे धाव घेतली. विहिरीतून बाहेर येत आम्ही सगळे त्याच्या मागून धावू लागलो. कपडे काढून घेण्याच्या नादात नकट्या सुन्यानं मुद्दामच त्याला धक्का दिला. तसा म्हातारा कोलमडला. आपापले कपडे उचलून त्याला चिडवत आम्ही सगळे पळू लागलो. तसा त्याला अधिकच चेव आला.
मातीची ढेकळं, धोंडे हाताला सापडेल ते उचलत, आमच्यावर भिरकावत त्यांने शिव्यांचा भडीमार सुरू केला.
'सुक्काळीच्यांनो.., पुन्हा मळ्यात पाय तर ठेवून बगा.. एकेकाचं पायच मोडतो परत आला तर'
त्याची आणखी टिंगल करीत आम्ही पुढे आलो. आमचा चाललेला गोंधळ ऐकून काकड्या तोडणारी लक्ष्मीमावशी मध्येच उभी राहात, 'हुबलाकांनो... कशाला म्हाता-याच्या पाठी लागलाय? आरं त्यो तुमच्या आज्यासारखा..' असा तिने आम्हाला दम भरला.
दररोज त्याच्या मळ्यात पोहायला गेल्यावर होणारा प्रकार आम्ही तिच्या कानावर घातला. तशी ती म्हणाली, 'असतयं एखांदं जुन्या विचाराचं माणूस.. भाड्यांनो.., त्याला सरळ सांगायचं आम्ही खामकरांच्या मळ्यातली हाय म्हणून.' तिच्या या उत्तराने दरवर्षीचा आमचा पोहायचा प्रश्न चुटकीसरशी निकालात निघाला होता.
आठरापगड जातीच्या आमच्या माळवाडीत गणेशोत्सव, दिवाळी-दसरा, रंगपंचमीबरोबर मोहरम मोठ्या प्रमाणावर व्हायचा. नालसाब पीर पंजाची स्थापना मोठ्या दिमाखात होत असे. सबंध गल्लीला सजावट व्हायची. या सजावटीसाठी लागणा-या नारळांच्या झावळ्या, फुले, फळे थेट मळ्यातून येई. नारळाचं तोरण प्रसादाचा मलिदा, चोंगे आणि रोट स्वत: बनवून लक्ष्मीमावशी सुना-नातवंडांसह गल्लीत यायची.
'पाऊस-पाणी चांगलं होऊ दे..,पीक-पाणी मुबलक होऊ दे.. बाबा नालसाबा सर्वांच्या मुखात चारा पडू दे रे बाबा.. ' अशी ती नालसाबाकडे मन्नत मागायची.
दसरा, दिवाळी आणि तुळशीच्या लग्नासह घरा-घरातील धर्मिक कार्यात लागणारा ऊस, आंब्याची डहाळी, झेंडूची फुले, धाटं, एकादशी सोडायला लागणारं वाघाट्याचं फळ यासाठी सगळी माळवाडी हक्कानं धाव घ्यायची ती लक्ष्मीमावशीकडेच ! माळवाडीतल्या प्रत्येक दुख:ल्या-खुपल्या लोकांसाठी ती सदैव हजर राहायची. माळवाडीतल्या अनेक कुटुंबांशी तिने हृदयाचे नाते जोडले होते. आडाणी असूनही तिच्यातील सेवाभावाची उर्मी कोठून यायची हा प्रश्न मला आजही पडतो.
माझ्या लग्नानंतर पत्नीने सुरूवातीला घरीच दवाखाना सुरू केला होता. त्याच्या उद्घाटनाचे खास निमंत्रण देण्याच्या निमित्तानं खूप वर्षांनी मळ्यात जाण्याचा मला योग आला होता. कमरेत वाकलेली, गोऱ्या चेहऱ्यावर रेषांचे जाळे घेऊन लक्ष्मीमावशी घराच्या जोत्यावर बसून होती. किलकिल्या डोळ्यांनी माझा अंदाज घेत ती हसली. हसताना तिच्या तोंडातील सीताफळीच्या बियांचे आपसूक दर्शन घडले.
''कधी न्हानगा असताना सारखा यायचास..'' असे म्हणत तिने थरथरत्या हाताने माझ्या तोंडावरून हात फिरविला. मला जवळ बसवून घेत, नातवाला पाणी आणायला सांगून म्हणाली,
कसा हाईस बाबा...? काय काम काडलसं...? बायकू डाक्टर हाय म्हणं तुझी..
तिच्या तब्बेतीची चौकशी करून, तिच्या प्रश्नांची उत्तरे देत, तिला मी आग्रहाचे निमंत्रण दिले.
थकलेल्या लक्ष्मीमावशीचे अधून-मधून माझ्या घरी येणं-जाणं सुरू होतं, आता मात्र ते उपचारासाठी ! त्यानंतर वर्षभरातच मी नोकरीच्या निमित्ताने कुटुंबासह गाव सोडलं होतं. कारणाशिवाय गावाकडे माझे जाणे त्यानंतर होत नव्हते. बऱ्याच वर्षानंतर यंदा दिवाळीसाठी मी गावाकडे आलो होतो.
पूजेचं सर्व साहित्यं घेऊन मी घरात आलो. आई आणि पत्नीने पूजेची सर्व जय्यत तयारी केली. फटाक्यांसाठी अडून बसणाऱ्या माझ्या मुलाला, सोनूला पिशवीतून फटाक्यांचा बॉक्स काढून देताच तो हरकून गेला.
पूजा झाल्याशिवाय फटाकड्या उडवायच्या नाहीत हं सोनू.. आईने त्याला अशी सूचना केली. त्यानंतरच्या त्याच्या बालप्रश्नांना ती उत्तरे देत होती.
अरे...पूजा केली म्हणजे लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरात सुख-समृद्धी येती...घरात भरभराटी येती रं बाळा..माज्या
लक्ष्मीच्या फोटोसमोर रांगोळी रेखाटली होती. सुंदर आरास केलेल्या फोटोसमोर पूजा मांडली होती. तांब्याचा कलश त्यावर नारळ, त्यावर सोन्याची बोरमाळ घातली होती. फोटोच्या दोन्ही बाजूला निरांजन तेवत होत्या. एका ताटात फुलांचा हार तर दुसऱ्यात फुले ठेवली होती. पत्नीने प्रसादाचे फराळाचे ताट माझ्या हाती दिले आणि सगळे पूजेसाठी जमले.
हाती आलेले प्रसादाचे ताट आणि हातात मावतील तितकी फुले घेऊन मी तडक घराबाहेर पडलो.
आरं.. आता आनी कुठं चाल्लास?..पूजा कर की गपगुमान..
आई आणखीही काही म्हणाली, ते ऐकायला मी तेथे नव्हतो. माझी पावले एकाएकी मळ्याकडे झपाझप पडत होती. दाटून आलेल्या ढगांचे मनात मळभ साठले होते. घासातला घास देवून 'तिने' माझ्या हातातली 'पाटी' बळकट केली होती. 'तिच्या' पावलाने माझ्यासह अनेकांच्या कुटुंबात सुख-समृद्धी आणि भरभराटी आणलेली होती.
मी थेट लक्ष्मीमावशीच्या घरात शिरलो. बाहेर तिची नातवंडे फटाके उडवित होते. तिच्या घरी नुकतेच लक्ष्मीपूजन झाले होते. समोरच्या भिंतीवर 'तिचा' फोटो टांगलेला होता. माझ्या हातातली सगळी फुले 'तिच्या' फोटोवर वाहिली. प्रसादाचे फराळाचे ताट समोर ठेवले, आणि मी माझे मस्तक जमिनीवर टेकविले. दाटून आलेल्या मनातल्या ढगांनी आता आपसूक बरसायला सुरूवात केली होती. कोण काय म्हणत आहे हे ऐकायला मी अजिबात थांबलो नव्हतो.
दाटलेले मळभ कोसळून दमलेले ढग निघून जावेत आणि निरभ्र आकाश चमकावे, तसे मनाला आता हलके वाटत होते.
दारात हातात फटाके घेऊन निराशेने सोनू थांबला होता. बाजूला तुळशीला लागून आई आणि पत्नी स्थिरावली होती. दोघींच्याही चेहऱ्यावर रागाची छटा दिसत होती. माझ्याकडे पाहून थेट काही विचारणार तोवरच ओसरलेल्या पावसाच्या मागे राहिलेल्या खुणा पाहात आई आनंदाने म्हणाली, ''उडीव रं सोनू फटाकड्या...पूजा झाली...तुझ्या बा नं आज ख-या लक्ष्मीचे पूजन केले.

                                                                                    ---प्रशांत सातपुते
                                                                             p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
                                                               9403464101

               
         



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..