हिजडा...एक मर्द !






प्रत्येक व्यक्तीच्या पाठिमागे तसेच प्रत्येक शब्दामागे त्याची एक वेगळी स्वतंत्र कथा आणि पार्श्वभूमी असते. हिजडा, छक्का असे शब्द समाजामध्ये हिणवण्यासाठी अथवा शिवी म्हणून वापरली जाते. याची पार्श्वभूमी आपल्या पौराणिक कथांमध्ये पहायला मिळते. देवांचे देव महादेव यांचे अर्धनारी नटेश्वराचे रूप, देवाने वेश बदलून घेतलेले मोहिनीचे रूप, वीर योद्यांने घेतलेले बृहन्नडेचे रूप या प्रत्येक भूमिकेमागे वेगवेगळ्या कथा वाचायला आणि ऐकायला मिळतात. 
साक्षात देवानांही जिथे स्त्रीची भूमिका घ्यावी लागली तिथे सामान्य मनुष्य प्राण्याचे काय? यक्ष, गंधर्व आणि किन्नर ही परंपराच देवाधिकांपासून चालत आलेली आहे. रामायण असो वा महाभारतातील शिखंडी असो तृतीयपंथी हे सर्वसामान्य मानवाच्या पोटीच जन्माला आले आहेत. पुरूषप्रधान, पुरूषसत्ताक समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये केवळ प्रजोत्पादन करणे हा पुरूषार्थ समजला जातो. परंतु, लहान मुले, अबला महिला आणि समाजातील, वातावरणातील सर्वच दुर्बल घटकांचे संरक्षण करणे त्याची जबाबदारी स्वीकारणे मला वाटते हा खरा पुरूषार्थ ठरेल. त्या अर्थानेच शीर्षकाचा वापर केला आहे.
पौराणिक कथेतील दाखला देताना अस सांगितलं जातं, प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना अयोध्यावासिय प्रभूंना सोडण्यासाठी गावाबाहेर शरयू नदीच्या तीरावर आले होते. प्रभूंनी या ठिकाणी, सभ्य स्त्री पुरूष हो आता आपण अयोध्या नगरीत परतावे असे सांगितले होते. 14 वर्षाचा वनवास भोगून प्रभू परत येत असताना, शरयू नदीच्या तीरावर काही लोकांची वस्ती आढळून आली. चौकशी केल्यानंतर  आपण केवळ स्त्री आणि पुरूष दोघांनाच परतण्यासाठी सांगितले होते. आम्ही या दोघांमध्येही येत नाही असे या लोकांनी प्रभूंना सांगितले होते. हेच तृतीयपंथीय होत. या पुढे जाऊनही प्रभू रामचंद्रांच्या जन्माची बधाई तृतीयपंथीयांनी घेतल्याचेही सांगितले जाते.
मुघलकालीन राजवटीत बादशहाच्या जनानखान्यावर विश्वासातला सेवक म्हणून ‘खोजाची’ नेमणूक केली जायची. हा किन्नरांचाच प्रकार आहे. ना.स. इनामदार यांच्या ‘शहेनशहा’ या ऐतिहासिक कादंबरीत अरेबियन नस्लच्या घोड्याच्या पैदासीसाठी खोजा घोड्याचा वापर करत असल्याचा उल्लेख आढळतो. 
दिवंगत ज्येष्ठ स्तंभलेखक प्रमोद नवलकर यांच्या लेखनामध्ये ‘हिजडा’ या शब्दाचा अर्थ वाचण्यात आला. मुंबईमध्ये ब्रिटीश काळात समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांकडे तृतीयपंथी पैसे मागत. याचा त्रास झालेल्या पर्यटकांनी त्यावेळच्या गर्व्हनरकडे त्यांची तक्रार केली. तत्कालीन परिस्थितीत गर्व्हनरने तृतीयपंथीयांसाठी आठवड्यातील हक्काचे काही दिवस राखून ठेवले होते. या दिवसांना HIS DAY (त्यांचे दिवस) म्हटले जाई. हिज डे.. हिज-डे..हिज..डा..हिजडा असा त्याचा अपभ्रंश झालेला असावा.
लग्नं तसेच मुलांच्या जन्मावेळी तृतीयपंथीयांना विशेष बोलावून त्यांची ‘दुवा, बधाई’ आजही घेतली जाते. कुटुंबाने खोट्या प्रतिष्ठेपायी घरातून हाकलून काढलेल्या, समाजाने हेटाळणी केलेला हा तृतीयपंथी मग खऱ्या अर्थाने शोषित होवून समाजाला अपेक्षित असलेला छक्का, हिजडा बनतो. परंतु, त्या पाठिमागील त्याची कहानी ही जाणून घेण्याचा प्रयत्न होत नाही. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य तृतीय पंथ हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावर कोल्हापुरातील मयुरी आळवेकर यांची नुकतीच सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत करण्याचा योग आला आणि बऱ्याच गोष्टी समोर आल्या. 
‘मेहंदी, नाचगाणं, सजावट अशा कला-गुणांच्या नवरंगाने आमचं आयुष्य सजलय. अंगावरील साडीचा एक-एक धागा दु:खाने विणलाय..पण पदर सुखाचा आहे. आम्हीही सर्वसामान्य पुरूष आणि स्त्री असणाऱ्या आई-वडीलांच्या पोटीच जन्म घेतलाय. आम्हालाही प्रेम हवय, सन्मान हवाय, आधाराची गरज आहे,’अशी माफक अपेक्षा समाजाकडून करतानाच महाराष्ट्र राज्य तृतीयपंथ हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर यांनी करतानाच आई-वडील, वृध्द झालेला तृतीयपंथीयांचा गुरू वृध्दाश्रमात पाहिलाय का? हा पांढरपेशा समाजाला विचार करायला लावणारा सवाल विचारला आहे.
मयुरी या कोल्हापुरातीलच ! सहावीनंतर त्यांची शाळा सुटली आणि खऱ्या अर्थाने समाजातील शिक्षणाला सुरूवात झाली. लहानपणी वडील वारले आणि घरात सर्वात मोठ्या असणाऱ्या मयुरीवर घरची जबाबदारी आली. गवंड्याच्या हाताखाली तसेच हॉटेलमध्ये अशा विविध ठिकाणी काम करत त्यांनी घराची जबाबदारी पेलली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी घर सोडले. 
‘तृतीयपंथी ही एक छत्री आहे,’ असं सांगून त्या म्हणतात, या छत्रीखाली हिजडा, जोगते, एलजीबीटी असे सर्वच प्रकार येतात. एल (लेस्बीयन) म्हणजे समलैंगिक स्त्री, जी (गे) म्हणजे समलैंगिक पुरूष, बी (बायोसेक्सुएल) म्हणजे स्त्री आणि पुरूष दोघांकडेही आकर्षित होणारे, टी (ट्रान्सजेंडर) म्हणजे लिंग परिवर्तन. आई-वडीलांनी ज्यावेळी आपलं अपत्य तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर खरेतर त्याला त्यांनी आधार द्यायला हवा. परंतु, दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. इतर भावा-बहिणींची लग्नं होणार नाहीत या आणि घराच्या प्रतिष्ठेसाठी अशा अपत्यांना घरातून हाकलून दिले जाते. प्रसंगी त्यांचा छळवाद मांडला जातो. त्यातून ते घर सोडतात. 
पडेल ते काम करण्याची ईच्छा असतानाही समाज अशा तृतीयपंथीय मुलांना हिणवले जाते, अपमानीत केले जाते. प्रसंगी शोषणही केले जाते.यात बळी पडलेली मुले आत्महत्येचा विचार करतात. प्रयत्नही करतात. यानंतर मात्र, जीवनाच्या पटलावर जगण्यासाठी, पोटासाठी संघर्ष करत शरीरविक्रय करणे आणि भीक मागणे हे आयुष्यभर सुरू राहते. ‘‘जितनी बार दया माँगू उतनी जादा घृणा मिलती है.’’ या प्रमाणे हा संघर्ष पुढे चालू राहतो. ‘‘यहाँ जिस्म नहीं जरूरत बिकती है.’’ हे मात्र, गरज संपल्यानंतर पांढरपेशा समाज सोईस्करपणे विसरतो. हिच खरी तृतीयपंथीयांची शोकांतिका आहे.  




मयुरी आळवेकर म्हणाल्या, घरातून बाहेर काढलेल्या, घर सोडलेल्या अशा मुलांना आम्ही आधार देतो. ज्यांची शिकण्याची इच्छा आहे अशांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो. 37 जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी 14 जण परीक्षा पास झाले आहेत. दुर्गा पिसाळ हिने बीएची पदवी प्राप्त केली आहे. बऱ्याच जणांनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. खासगी रूग्णालयामध्ये नोकरीही करत होते. परंतु, तिथेही समाजाच्या मानहानीकारक वागणुकीमुळे अपमानीत होवून नोकरी सोडावी लागली आहे. काहीजण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरीही करीत आहेत.  
शहरामध्ये 120 तर जिल्ह्यामध्ये सुमारे 500 तृतीयपंथी असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान शिवशंकराला आम्ही मानतो. त्याचबरोबर जोगते रेणुका आणि यल्लमा देवीला मानतात, असे त्या म्हणाल्या. माझ्या मैत्री संघटनेच्या माध्यमातून विशेषत: समाजातील सर्वच क्षेत्रातील 1500 समलैंगिक जोडले आहेत. तृतीयपंथीयांमध्ये समाजातील सर्व धर्म, जातींचा समावेश आहे. 2016 मध्ये लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी उज्जैनमध्ये किन्नर आखाड्याची स्थापना केली. मुंबई, कोल्हापूर, नाशिक, धुळे अशा चार महामंडलेश्वराची स्थापनाही झाली आहे. या आखाड्यामार्फत धर्माचा प्रसार, प्रचार तसेच तृतीयपंथीयांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाते. त्याचबरोबर शासकीय दरबारी मागणीही केली जाते. दक्षिण महाराष्ट्राच्या महामंडलेश्वराच्या पदाची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे सांगून मयुरी म्हणाल्या, उज्जैन, प्रयाग या ठिकाणी आखाड्याचे कुंभ झाले आहेत. 2021 ला हरिव्दारला होणाऱ्या कुंभाची सद्या तयारी सुरू आहे.


तृतीयपंथीयांमध्ये गुरू-चेला परंपरा असल्याचे सांगून त्या म्हणाल्या,  चेल्याने गुरूच्या मृत्यूपर्यंत त्याला सांभाळायचे असते. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो वृध्दाश्रमात आमचा एकही गुरू नाही आणि नसतो. गुरूच्या जबाबदारी बरोबरच अनेकजण सोडलेल्या घराची विशेषत: आई-वडीलांना तसेच घरच्या जबाबदारीला मदतही करत असतात. त्यांचे वृध्द आई-वडीलही वृध्दाश्रमात नसतात. सद्या माझे 25 चेले असून 5 चेल्यांचे चेले आहेत. बऱ्याच वेळा सर्वसामान्य असणाऱ्या निराधार मुलांना  दत्तक घेतो. सद्या बेंगलोर येथील हेल्पिंग हार्ट संस्थेत दत्तक घेतलेली 5 मुलं शिकत आहेत. 
एखादा तृतीयपंथी मरण पावल्यानंतर, पुन्हा पुढच्या जन्मी तृतीयपंथीयाच्या जन्माला येऊ नकोस म्हणून त्याच्या मृतदेहावर इतर किन्नर चपलेने मारहाण करतात. वाजतगाजत त्याचा अंत्यसंस्कार केला जातो.परंतु, हे पूर्वी चालायचे आता असे होत नाही, असे सांगून मयुरी म्हणाल्या, सद्या मृत झालेल्या तृतीयपंथीयावर मरणाऱ्याच्या धर्माप्रमाणे गावातीलच स्मशानभूमीत अथवा दफनभूमीत अंत्यसंस्कार केले जातात.
रामायण, महाभारतमध्येही किन्नर संस्कृतीचा उल्लेख आहे. याबाबत शालेय शिक्षणात याचा सविस्तर समावेश झाल्यास निश्चितच समाजामध्ये तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक मिळण्यास मदत होईल. शासकीय योजनांचे प्रशिक्षण तसेच शासकीय नोकऱ्या मिळण्यासाठी माझा या समितीच्या माध्यमातून सदस्य म्हणून प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.   
स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी  हे लिंगवचन केवळ मराठीतील व्याकरणातच शिकविले जाते. मयुरी म्हणतात त्याप्रमाणे शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमात तृतीयपंथीयांचा समावेश झाल्यास खऱ्या अर्थाने बंदिस्त असणारे पैलू पुढे येतील आणि तिरस्काराची जागा प्रेमाने व्यापेल. समाजाला, घरच्या लोकांना ‘शरम’ नाही तर ‘शान’ वाटेल असे काम करण्यासाठी तृतीयपंथीयांना हवी आहे, आपल्या सर्वांची अर्थात समाजाच्या आधाराची गरज ! लक्ष्मीनारायण त्रिपाठी, मयुरी आळवेकर किंवा त्यांच्यासारखे व्यक्तीमत्व करत असणारे सामाजिक काम पाहून ‘हिजडा...एक मर्द !’असेच म्हणावे लागेल.
(लेखात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. त्याबद्दल क्षमस्व! जी माहिती मिळाली त्यावर आधारित लिहिला आहे.)

                         -- प्रशांत सातपुते
*p7sons@gmail.com*
*9403464101*
*https://www.facebook.com/prashant.satpute.988*
 


Comments

  1. किन्नर हा वर्ग जवळून पाहण्याचा योग जयसिंगपूर येथे नोकरीच्या निमित्ताने रोज रेल्वेतून प्रवास करताना आला आणि त्यांच्याबद्दल मनात प्रचंड तिरस्कार पण निर्माण झाला. कारण त्यांच वागण अत्यंत कीळसवाण आणि क्लेशदायक असायच... पगार झाल्यावर एकदा पैसे देत होतो पण रोज वेग्वेगल्याना पैसे देने परवडत नव्हते.. त्यावेळी ते त्रास देत.
    पण असो,
    लेख खुप आवडला.. इतिहासातील संदर्भ व वास्तव यावरील माहिती वाचुन मनातील त्यांच्याविषयी असणारी घृणा कमी झाली. खरचं.. समाजाने जवळ केल तर तेही सामान्य जीवन निश्चितच जगू शकतील आणि समाजाच्या उपयोगीही पडू शकतील.. शुभेच्छा...🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. तृतीयपंथीयांमध्ये एवढा मोठा विस्तार आहे, त्यांचे जीवन इतके हलाखीचे असते याची जाणीव या लेखा मधून झाली. त्यांचा इतिहास समजला. खरंच आपण या लेखामधून समाजमनाचे , तृतीय पंथीयां बाबतचे नकारार्थी मत सकारात्मक विचारांमध्ये परिवर्तित केले आहे. तृतीयपंथीयांना सुख, समाधान, आनंद व समृद्धी साठी ईश्वरचरणी प्रार्थना!!
    डोळ्यात अंजन घालणारा उत्तम लेख!!👍👍👍
    धन्यवाद !!
    आपल्याला मनस्वी शुभेच्छा !!!
    🙏🙏🙏

    सरला अविनाश पाटील
    जिल्हा समुपदेशक,
    DIET, कोल्हापूर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..