चोरी
“जळ्ला मेला
त्यो संसार..कधी काय घ्यायचं
म्हटलं तर सारखं आपलं पैसा.. पैसा करायचं !” दादूची बायको सुशीलानं धापदिशी तव्यावर
भाकरी टाकली. तशी ती सगळीकडून
फाटली. तो पिठाचा गोळा
उचलत तिची भाकरी ती पुन्हा थापू लागली. आज तिचं डोकं तव्यापेक्षा जास्त गरम झालं होतं.
“आत्म्यापेक्षा
पैसा जास्त महत्त्वाचा आहे का ?”
सुशीलाच्या आवाजापेक्षा रेडिओचा आवाज वाढवत दादू घरातून उठला
आणि पायरीवर बसून राहिला. तशी ती आणखी भडकत उठली, दादूचा राग रेडिओवर काढत तिने त्याचा गळाच दाबून टाकला.
“वर जाताना
कवटाळून घेऊन जावा तुमचा त्यो पैसा” फणकारून ती आत गेली.
“व्हय वर
जाताना संगं पैसाच घेऊन जाणार हाय..काय म्हण्नं हाय तुझं..”दादूनं पुन्हा
रेडिओ सुरु केला. आता त्याचं टाळकं
भडकलं होतं.
“बसा कवटाळून
तुमचा पैसा मी आपली जाते माह्यारला..”परातीत पाणी
ओतत ती उठली.
“जा..जा..टळ एकदाची..रोजच्या तुझ्या
कटकटीतून सुटंन कायमचा मी..”
“जातेच मी
...”सुशीलानं कपडे पिशवीत भरायला सुरुवात केली.
“जा आता ऊगी
बोंबलू नको”
“मी कशाला
बोंबलू..?”
“मी वर गेल्यावर
तरी बोंबलशील..”
“असं जीव
देणारं लई बघितलं पण दिलाय का कधी ?”असं त्याला
हिणवत ती बाहेर पडली.
“पुन्ना फिरकायचं
न्हाई हिकडं..मी खपल्यावर सुदीक..
आपल्या माह्यारातच खपायचं..” असा इशारा
देत दादू आपला रेडिओ ऐकत बसून राहिला.
कपड्यानं भरलेली पिशवी घेऊन ती तरा तरा त्याच्या समोरून निघून
गेली.
दादूच्या घरचं रोजचं भांडण शेजाऱ्यांना नवं नव्हतं.
दादू चौगुले हा गावातील एकमेव फोटोग्राफर.
अर्धवट कॉलेज सोडून त्यानं कोल्हापुरात एका फोटो स्टुडिओत नोकरी
धरली होती. कोल्हापुरात असतानाच
त्याचं सुशीलाबरोबर लग्न झालं होतं. त्यानंतर त्यानं गावातच आपला छोटासा स्टुडिओ सुरु केला होता.
दादू चौगुले हा महाचेंगट माणूस. त्याच्या हातून कधीही पैसे सुटत नसत.
त्याच्या लग्नात सासरच्यांनी त्याला सफारी घेतली.
या पठ्ठ्याने शिलाई वाचविण्यासाठी सफारीचा शर्ट एका शिंप्याकडून
तर पॅंट दुसऱ्या शिंप्याकडून शिवून घेतली. वर सासऱ्याकडून सफारीची शिलाई घेतली ती वेगळीच.
घर खर्चाला मागितलेले पैसेही दादू पटकन कधी देत नसे.
त्यात हौसमोलाचं नाव काढायची सोय नव्हती.
याच कारणावरून त्यांच्यात रोज वाद रंगत असे.
शेजारी राहणारा सदातात्या त्यांचं रोजचं भांडण ऐकत होता.
मात्र, सुशीला आजवर कधीच घराबाहेर पडली नव्हती. ते पाहून तो तिला माघारी बोलवू लागला.
पण, ती दिसेनाशी झाली.
तसा तो दादूला म्हणाला, “जा मर्दा..बोलवून आण तिला. भांडांन कुणाच्या घरात न्हाई.”
पण दादू तसाच पडून राहिला. हे पाहून सदातात्या आपल्या घरी वळला.
रेडिओवरील गाणी संपल्यानंतर थोड्या वेळाने दादू उठला.
होतं ते पोटात ढकलून दुकानात जायला कपडे शोधू लागला.
खुंटीवर रात्री अडकवलेली त्याची कपडेच गायब झालेली होती.
सारं घर पालथं घातलं, तरी त्याची कपडे मिळाली नाहीत. पैशासाठी बायकोने मुद्दामच आपली कपडे पिशवीत भरून नेली असावीत,
या विचाराने त्याच्या तोंडून बायकोसाठी एक सणसणीत शिवी बाहेर
पडली. चरफडतच तो दुकानाकडे
जाण्यासाठी घरातून बाहेर पडला.
दुपारची जेवणं आवरून रंगानानाच्या शेतात बायकांची पुन्हा भांगलणीची
जुपी चालली होती. हातातली पात संपवून
बायजा पाणी प्यायला म्हणून बांधावरच्या आंब्याखाली गेली. कळशी वाकडी करून तिने तांब्या भरला आणि क्षणात तोंडाला लावला.
उतरत्या उन्हात डोळे किलकिले करून दूरवर असणाऱ्या विहिरीजवळ
ती वेध घेऊ लागली.
मळलेल्या तंबाखूची गोळी तोंडात ठेवत
“काय बायजा
कुणावर नदर लावून हैस ?”असा सवाल रंगानानानं केला.
“काही न्हाई
हिरीवर कुणीतरी दिसतयं गा..” असं म्हणत
खुरपं हातात घेत भांगलणीसाठी पुन्हा ती पातीवर बसली.
तंबाखूचा हात झाडत रंगानानानं एकदा विहिरीकडं पाहिलं.
कुणीतरी एकजण तिथे घुटमळताना दिसत होता.
रंगानानाच्या शेताला लागूनच ही पडकी विहीर होती.
विहीर तशी 30-40 फूट खोल होती. पाण्याचा उपसा नसल्यानं
मटणाच्या रश्शावर येणाऱ्या लाल भडक कटासारखा हिरवागार शेवाळाचा तवंग पाण्यावर तरंगत
होता. विहिरीच्या आतूनच
लिंबाची, बोराची काटेरी झुडपं
आणि वड-पिंपळाची झाडं डोकावत
होती. वर्षातून एकदा गणपती
विसर्जनासाठी आणि दोन-चार जणींच्या आत्महत्त्या
झाल्या त्यावेळी, त्याशिवाय या विहिरीकडं
फारसं कधी कुणी फिरकत नव्हतं.
रविवारी सुट्टीला कधीतरी जुगाराचं टोळकं बाजूच्या नारळाच्या
सावलीत आपला पत्त्यांचा डाव मांडत. नाही तर गांजाधारी चिलमीच्या सहाय्याने आपली समाधी लावत.
दिवस उतरणीला लागला होता. हातातली पात संपवून दोघी-तिघी उठल्या आणि आंब्याच्या सावलीत विसावा घेत पाणी पिऊ लागल्या.
तशी बायजाही पुन्हा उठत त्यांच्यात सामील झाली.
थोड्या वेळातच गप्पांचा फड रंगू लागला,
तशी रंगानानानं चंची सोडत अडकित्त्याने सुपारी कातरली.
कातरलेली सुपारी तोंडात टाकून पानाची देठं त्यानं खुडायला सुरूवात
केली. डाव्या हातानं विजारीला
पानं पुसली. उजव्या हाताच्या
अंगठ्याच्या नखानं डबीतला चुना खरवडत तो दुमडलेल्या पानाला लावला.
त्याला आणखी दुमडत तोंडात घालत, चंचीत हात घालून हरवलेला कात शोधला, त्यालाही तोंडात टाकून, वरून तंबाखूची चिमट सोडली. मिशांची टोकं वर करून दोन बोटांच्यामधून तोंडातील मिश्रणाची
पहिली पिंक टाकून तो म्हणाला,
“चला..
उठा आता.. आज भांगलन संपायलाच हवी..” तसा गप्पांचा
फड आपसूकच तुटला. सगळ्याजणी उठत आपा-पल्या पातीवर बसल्या. भराभर खुरपी चालू लागली. थोडावेळ कुणीच काही बोललं नाही. रंगानानाही वैरण काढण्यात गुंतला. केवळ खुरपण्याचाच आवाज येत राहिला. हात चालवता चालवता आठवल्यासारखं करून बायजानं बसल्या जागेवरूनच
मान वळवून विहिरीकडं नजर टाकली. थोड्यावेळा पूर्वी घुटमळणारी व्यक्ती आता तिथे दिसत नव्हती.
‘असंल एखादं असंच कुणीतरी..’असा विचार करीत हातातलं खुरपं ती भराभर चालवू लागली.
दोन-तीन तासात भांगलण संपली. तशा सगळ्याजणी उठून जागोजागी काढून ठेवलेले तणांचे ढिगारे उचलून बांधाकडे टाकू
लागल्या. थोड्यावेळात तेही
काम संपलं. पाण्याच्या चेंबरवरून
हात-पाय धुवून सगळ्याजणी आता माघारी परतू
लागल्या होत्या. रंगानानाही खूश
होत आंब्याला टेकवून ठेवलेली सायकल काढून तिच्यावर वैरणीचा भारा बांधत होता.
पडक्या विहिरीजवळून जाताना बायजाची सहजच नजर गेली,
तशी ती जागेवरच खिळली. विहिरीच्या काठावरच कपडे पडलेली होती.
तशी ती जवळ जात कपड्यांना न्याहाळू लागली.
बाकीच्या बायकाही जवळ जात, शंकेखोर चेहऱ्याने पहात राहिल्या.
“कुण्यातरी
बाप्याची कापडं हैत गं..” एकजण म्हणाली.
“शर्ट-पॅंट बाईमाणूस घालती का आपल्या गावात
?” दुसरी म्हणाली.
“दुपारी हिरीजवळ
रेंगाळणाऱ्या माणसाची तर नसतील कापडं..” बायजा म्हणाली.
अशी चर्चा चालू असतानाच “काय साप-बिप दिसला का काय ?” असं म्हणत
पाठीमागून सायकल घेऊन येणारा रंगानाना बायकांच्या घोळक्याजवळ आला.
“साप न्हाई
कापडं पडल्यात कुणाची तरी जणू..” तसा तोही
कडेलाच सायकल लावत कपड्यांजवळ आला. कपड्यांसोबत किल्ल्या, पेन, डायरी,
पैशाचं पाकीट अशा पडलेल्या वस्तू पहात तो म्हणाला,
“नुकतीच अंगातनं काढल्याली दिसत्यात. ” त्यानं एकदा
विहिरीत डोकावून पाहिलं. आतील पाणी शांत होतं.
“कुणीतरी
जीव दिला बाई..”
“कपडे काढून
कोण कशाला जीव दील ?”
“आता ते जीव
देणाऱ्यालाच माहीत”
“असंल कुणीतरी
गांजाधारी, न्हाहीत रदारूडा.
नसेत मारली असंल उडी”
“दुपारी घुटमळणाऱ्या
माणसानं तर उडी घेतली नसंल..? ”
“कुणाला दकल..?” अशी चर्चा
संपवून सगळ्याजणी घरी पोहचल्या, तशी ‘पडक्या विहिरीत
कुणीतरी जीव दिला’ ही बातमी गावभर
पोहचली. तसा जो-तो विहिरीकडे धावू लागला.
रंगानानानं सायकल आपल्या दारातच लावली,
तिच्यावरचा वैरणीचा भारा सोडला. तो गोठ्यात न्यायला बायकोला सांगून, सायकलीवर टांग टाकत बाहेरच्या बाहेर तो तडक पोलीस ठाण्यात गेला.
पाहिलेला सारा प्रकार त्याने सांगितला.
सगळं ऐकून घेत हवालदारांनं एकदा मिशावरून हात फिरवला,
आणि एकदा डोक्यावरून. आपल्या साथीदाराला निरोप देत, टोपी डोक्यावर चढवत तो जागेवरून उठला.
ते दोघेही आता विहिरीकडे निघाले. विहिरीभोवती निम्मा गाव जमा झाला होता.
त्यात सदातात्याही होता. सदातात्यानं दादू चौगुल्याची कपडे ओळखली तसा हळहळत तो म्हणाला,
“पोरानं खरंच
जीव दिला अखेर..”
रंगानानानं हवालदाराला कपडे दाखविली.
हवालदाराने एकदा कपडे पाहिले, नंतर विहिरीत वाकून पाहिले. विहिरीत अंधार पसरला होता.
“कोण कपड्यांना
ओळखतो का ?”हवालदाराने गर्दीला प्रश्न केला.
तसा गर्दीतून पुढं येत, “व्हय सायेब,
ही दादूचीच हैत. मी दादूच्या शेजारी राहतो.” सदातात्याने
सांगितले.
दादूचे त्याच्या बायकोशी दररोज पैशावरून होणाऱ्या भांडणाची तपशीलवार
माहिती सदातात्याने हवालदाराला दिली. हवालदाराने सदातात्याकडून दादूची माहिती घेतानाच, कपडे, डायरी चाचपली. डायरीतील नावावरून
ती दादूचीच असल्याची त्याची खात्री पटली, तसा तो म्हणाला,
“शेवटचा कधी
बघितला होता त्याला ?”
“सकाळी बायकूबरोबर
भांडला, तशी बायकू रागानं
माह्यारला निघून गेली. त्यानंतर थोड्यावेळाने
त्यो दुकानाकडे निघून गेला. दुपारी नेहमी जेवायला घरी येणारा गडी आज आलाच न्हाई.”
“दादूनं आज
दिवसभर दुकानच उघडलं न्हाई” गर्दीतील एक-दोघांनी आणखी माहिती दिली.
सगळी हकिकत ऐकून हवालदार म्हणाला,“हे बघा पब्लिक..कपड्यांची ओळख तर झाली आहे. आता चांगलीच रात्र झालीय. शिवाय विहिरीत पाणी खूप आहे. तिच्यातील दादूची ‘बॉडी’ आपण उद्या सकाळी
शोधू. आता सगळ्यांनी आपा-पल्या घरी जावा.”
तशी सारी जमलेली जत्रा पांगली. सारी चुकचुकत घरी गेली. दादूच्या घराजवळ गर्दी झाली होती. दादूच्या बंद दाराकडं बघत कोण हळहळत होतं,
तर काहीजण “पंचांग-बिंचांग तर लागलं न्हाई नव्हं..?
बगा न्हाईतर पाच घेतल्या बिगार थांबायचं न्हाई..” अशी चर्चा
करत होते.
‘कपडे काढून दादूने जीव का दिला असंल..’
यावर गर्दीत एकमत होत नव्हतं.
“उघड्यानं
जीव देवून, चेंगट दादूनं मरताना
सुदीक कापडं यवस्थित वाचविली.” कुणीतरी
बोललं त्यावर खळखळून हास्यं गर्दीत उमटलं.
इतक्यात सदातात्या म्हणाला, “कुणीतरी
कोल्हापूरला जावून दादूच्या बायकोला वर्दी द्या रं.”
तसे एक-दोघे तयार झाले. स्पेशल गाडी करून
ते पहाटेलाच कोल्हापूरला गेले.
गल्लीतील दोघाजणांना आपल्या घरी आगंतूक आलेलं पाहून,
ती म्हणाली,
“का
? एक दिवस कड निघाला न्हाई.
सक्काळी सक्काळी तुमास्नी धाडलंय त्यांनी
! ते कुठं हैत ?”
तिला काय आणि कसं सांगायचं असा प्रश्न त्या दोघांना पडला होता.
“मी येणार
न्हाई म्हणून साफ सांगून टाका. कळू दे जरा बायकू नसल्यावर काय होतय ते ! ”ती असं फणकाऱ्यानं
म्हणाली, तसे ते दोघे आणखी
पेचात पडले.अखेर धाडस करून
एकजण म्हणाला, “दादू आता परत कधीच येणार न्हाई.”
“अरे..
माझ्या देवा म्हणजे खराखुरा जीव दिला की काय..?
”तिनं जागेवरच गहिवर घातला.
“अरे माज्या
वाद्या..असा कसा जीव दिलास..माजच चुकलं मी घर सोडायला नको हुतं.. ”
ही रडा रड ऐकून दादूचा सासरा, मेव्हणा आतून बाहेर आणि दोन-चारजण बाहेरून आत आलीत. त्यानी सांगावा सविस्तर ऐकून घेतला. मग दादूची बायको, सासरा आणि मेव्हणा यांना घेऊन ती स्पेशल गाडी माघारी निघाली.
सकाळपासून विहिरीवर गर्दी झाली होती.
सकाळी ‘तांब्या’ घेऊन आलेली काही
मंडळी ‘कामकाज’
उरकून इथंच गप्पांचा फड रंगवत बसून होती.
तर काही जण तिथं ‘बसायचं’ ते इथं बसून होते.
हवालदाराचा मात्र अजून पत्ता नव्हता. बऱ्याच वेळाने तो
आला. त्याचे तांबरलेले डोळे आणि पडणारी
जड पावले पाहून, एक तर रात्री जास्त
झाली असावी, नाहीतर झोप झाली
नसावी. प्रथम त्याने डोक्यावरील
टोपी काढून खिश्यात घातली. एकाच्या कानावरील बिडी काढून घेत ती पेटवत, पाणी उपसण्याची ऑर्डर सोडली. आता पंपानं विहिरीतील पाणी उपसायचं आणि हवालदाराचं हवेत धुरावर
धूर सोडायचं काम जोरात सुरूहोतं. प्रत्येकजण थोड्या-थोड्या वेळाने विहिरीत वाकून दादूची ‘बॉडी’
दिसते का पहात होता. हवालदार बिडीवर बिडी ओढत धूर काढत होता.
तर कधी पानाचा तोबरा भरून पचापच थुंकत होता.
“दादू तसा
लई भारी फोटोग्राफर होता.” एकजण बोलला.
“हिकमती तर
एक नंबर !” आणखी एक बोलला.
आता दादूविषयी चर्चा रंगू लागली.
“एकदा त्याने
एकाचा फोटू काढला. त्याने आडव्हान्स
दिला न्हाई. दुसऱ्या दिवशी त्यो
फोटू न्यायला आला. तसा दादू त्याला
म्हनला फोटूत तुम्ही डोळं झाकल्यात दुसरा काडावा लागणार. त्याच्याकडून सगळं पैसं घेऊन मग चार दिवसानं त्याला फोटू दिले.
”
“आरं कधी-कधी
त्याच्या क्यामेऱ्यात रोलच नसायचा, उगं आपलं लाईट मारायचा अंगावर.”
“तसा हुश्शार
पण कधीही कुणाला वेळेत फोटू दिले न्हाईत. ’’
“माज्यातर..थोरल्याच्या
बारशाचं फोटू, धाकल्याच्या बारशात
दिलं”
“तूच पैसं
दिलं नसचील, सुक्काळीच्या..तू एक चेंगट तर त्यो दोन.. ”
“का मेलंल्या
माणसाची कुटाळकी करताय...” सदातात्यानं
त्यांच्या चर्चेत मोडता घातला.
एव्हाना हवालदाराने नारळाच्या सावलीत स्वत:ला ‘झोपून’ दिलं होतं.
तो डाराडूर घोरत होता. कुणी पेंगत होती, तर कुणी जरा कलंडली होती. तर जी इथं बसून होती, ती आता तिथं ‘बसायला’
गेलीत.
हंबरडा फोडतच दादूची बायको गाडीतून उतरली.
तशी सगळ्यांची झोप उडाली. हवालदारानं जागेवरूनच आपले डोळे किलकिले केले.
“अरे माज्या
वाद्या.. आता मी कुणाशी रं
भांडू..” ती धायमोकलून रडत होती.
हवालदाराने एक जोरदार जांभई दिली. तशी तिही क्षणभर दचकली. जवळ येत त्याने तिला कपडे दाखविले. आपल्या नवऱ्याची कपडे ओळखत ती आणखी जोरात रडू लागली.
हवालदार खिशातील प्रत्येक वस्तू तिला दाखवत होता.
ती प्रत्येक वस्तू आपल्या नवऱ्याचीच असल्याचे सांगत होती.
रडता रडता तिच्या लक्षात आले, पैशाचे पाकीट रिकामेच होते. चेंगट नवऱ्याने पैशासोबत उडी घेऊन आपले बोल खरे केले होते.
“बोल्लास
तेच खरं केलंस रे माज्या बाबा..संगं पैसं घेऊनच जीव दिलास..”असं म्हणत
परत तिनं सूर धरला. तशा दोघी-तिघी शेजारणी तिची समजूत घालू लागल्या.
विहिरीतील पाणी संपून गाळ दिसू लागला.
तसे दोघेजण विहिरीत उतरून गाळात ‘बॉडी’ शोधू लागले. परंतु,
गाळाशिवाय त्यांच्या हाताला काही लागले नाही.
‘बॉडी’ मिळाली नाही तसे सगळेच चिंताग्रस्त झाले.
दु:ख आणि रडणे जावून दादूच्या बायकोच्या चेहऱ्यावर आता विस्मय पसरले होते.
आता करायचे काय ?
“बॉडी कुटं
गेली.? गायब झाली की काय.?
”
“व्हईक म्हणायचं
की व्हन्यार..”
अशी रंगलेली चर्चा करतच अखेर सारी मंडळी गावात परतू लागली.
आता चांगली दुपार झाली होती. इतक्यात दादू परतल्याची बातमी गल्लीतल्या एकानं सायकलीवरून येऊन
सांगितली. तशी सारी मंडळी
दादूच्या घरी जमली. रेडिओ लावून दादू
पायावर पाय टाकून पलंगावर पडला होता. हवालदार, बायको आणि सोबतची
गर्दी पाहून तो हबकून गेला.
“म्हंजे तुम्ही
जीव दिला न्हाई व्हय ..” नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पहात ती म्हणाली.
तसा हवालदार चिडून बोलला, “आता आणि
जीव द्यायला पाहिजेल का बाई..”
दरडावण्याच्या आवाजात तो म्हणाला, “कालपासून
कोठे होतास रे तू ?”
“आरेवाडीच्या
जत्रेला गेल्तो.”
“एकटाच
?”
“न्हाई,
सिद्राम पुजारीबरोबर..”
“ही कपडे
कुणाची ?”
विहिरीजवळ सापडलेली कपडे त्याला दाखवत हवालदार विचारत होता.
“माझीच..”
“मग ती विहिरीजवळ
कशी पोहचली ? ”
“मला काय
माहीत ? परवा रात्री दुकान
बंद करून, मी घरी आलो,
कपडे काढून ती खुंटीवर अडकवली. जेवण करून झोपलो. सकाळी नेहमीप्रमानं आवरून दुकानात जायला निगालो, तर कपडे गायब झाली हुती. रागापोटी हिनंच न्हेली असतील असं मला वाटलं.”
“मी कशाला
न्हेऊ तुमची कापडं..ती काय मी घालणार
हुतो ? ”
“बाई तुम्ही
जरा गप्प बसा.बोल रे पुढं कायझालं.
”
“दुसरी कापडं
घालून, दुकानात जात असताना
सिद्राम भेटला. त्यो म्हणला चल
जत्रंला. गेलो त्याच्याबरोबर..”
“चला सगळी
पोलीस ठाण्यात, जबाब घ्यायचाय..”
तशी सारी मंडळी पोलीस ठाण्यात आली. इथे एका रंगेहात सापडलेल्या भुरट्या चोराला दोघे पोलीस चोप देत
होते. चोरी आणखी कुठे
कुठे केली ते त्याला चोपता-चोपता विचारत होते.
हवालदाराने सिद्राम पुजारीला बोलावून घेतलं.
त्याचा जबाब नोंदविला. दादूचा जबाबही नोंदवून, त्यावर पंचांच्या सह्या घेतल्या. इतक्यात मार खाणारा चोर दादूला आणि त्याच्या बायकोला पाहून म्हणाला,
“सायेब,
ह्यंच्याबी घरात मीच चोरी केली.”
तशी सगळेच त्याच्याकडे पाहू लागले.
तसा चोर म्हणाला, “दोघं जोर-जोरात भांडत हुते, सायेब. खिडकीत हात घालून,
खुंटीला अडकवल्याली कापडं मी पळवली. पाकीटातअसणारे दोनशे रूपये काढून घेतले,
आणि पडक्या हिरीजवळ कापडं टाकून पळालो.
”
झालेला उलगडा पाहून, सगळेच हसू लागले.
तसा दादू म्हणाला, “सायेब,
ह्यो खोटं बोलतोय. पाकीटात चांगले पाचशे रूपये हुते, सायेब.”
हवालदारानं रागानं एकदा त्याच्याकडं पाहिलं,
आणि तो काय बोलणार इतक्यात दादूची बायको म्हणाली,
“चोरावर मोर
हुताय... चला गप गुमान..
!म्हणं पाचशे हुते..” दादूच्या
चेंगटपणावर त्याच्या बायकोने केलेल्या कोटीवर हवालदारासह सारेच खिदळले.
दादूचा चेहरा मात्र यावेळी पाहण्यासारखा झाला होता.
प्रशांत सातपुते
9403464101
p7sons@gmail.com
000000
ग्रामीण चित्र...ग्रामीण भाषेत!
ReplyDeleteउत्कृष्ट लेखन
ReplyDelete