तोंग्बा: हिमालयाच्या कुशीतील उबदार आदरातिथ्य
'जे होतं ते चांगल्यासाठीच!' या उक्तीचा प्रत्यय कधी, कुठे आणि कसा येईल, याचा नेम नसतो. एव्हरेस्ट ट्रेकचे प्रवेशद्वार असलेल्या 'लुकला'च्या भूमीवर आमच्या बाबतीत नेमके हेच घडले. खराब हवामानामुळे आम्ही लुकलामध्ये अडकून पडलो होतो. काठमांडूला जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधत असताना, मनातील अस्वस्थता घालवण्यासाठी आम्ही स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारू लागलो. तिथेच आम्हाला तिथली लोकसंस्कृती आणि 'ड्युमजी' लोकोत्सव जवळून जाणून घेण्याची एक सुवर्णसंधी मिळाली.
त्या रात्री हॉटेलच्या बाहेर दोन स्थानिक तरुण शेर्पा आम्हाला पुढच्या प्रवासाचे मार्गदर्शन करत होते. बोलता बोलता माझे लक्ष त्यांच्या हातातील एका वैशिष्ट्यपूर्ण पात्राकडे गेले. लाकडाच्या एका देखण्या पात्रातून ते दोघे अतिशय तृप्ततेने काहीतरी पीत होते.
*कुतूहलाने मी विचारले, "हे काय आहे?" त्यांनी हसून उत्तर दिले, "ही आमची बिअर आहे. याला आम्ही 'तोंग्बा' म्हणतो!"
*पूर्व नेपाळ, सिक्कीम, दार्जीलिंग आणि भूतानमधील 'लिंबू' समुदायाचे 'तोंग्बा' हे अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक मद्य आहे. ज्या पात्रातून हे पेय पितात, ते लाकडाचे बनवलेले असते आणि त्याला स्थानिक भाषेत 'धुंग्रो' म्हणतात. या पात्रावर तांबे किंवा पितळी पट्ट्यांनी केलेले नक्षीकाम त्याची मजबुती आणि सौंदर्य अधिकच वाढवत होते. या पात्रात ठेवलेली नळी ही बांबूची होती, ज्याला 'पिप्सिंग' म्हटले जाते. या बांबूच्या नळीच्या खालच्या टोकाला बारीक छिद्रे असतात. ही छिद्रे एका गाळणीसारखे काम करतात, जेणेकरून पेयाचा आस्वाद घेताना धान्याचे दाणे तोंडात येत नाहीत. निसर्गाच्या साधनांचा मानवाने केलेला हा किती सुंदर वापर!
तोंग्बाची निर्मिती प्रामुख्याने नाचणी किंवा कोदो या तृणधान्यापासून होते. हे धान्य शिजवून, त्यात यीस्ट मिसळून ते आंबवले जाते. धुंग्रो या पात्रात ही आंबवलेली नाचणी भरली जाते आणि त्यावर उकळते गरम पाणी ओतले जाते. काही मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवले जाते, जेणेकरून पाण्याचा आणि आंबवलेल्या नाचणीचा अर्क एकजीव होईल.
त्यानंतर बांबूच्या नळीने हे पेय गरम गरमच पितात. पात्रातील पाणी संपले की त्यात पुन्हा गरम पाणी ओतले जाते. जोपर्यंत नाचणीचा अर्क पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत पाणी ओतण्याचा आणि पिण्याचा हा सिलसिला सुरूच राहतो.
शेर्पा, लिंबू, राय आणि भूतिया संस्कृतीत तोंग्बा हे केवळ एक पेय नसून, ते 'आदराचे प्रतीक' आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी, सण-उत्सवांमध्ये आणि लग्नकार्यात हे पेय अत्यंत मानाने दिले जाते. पाहुण्याला तोंग्बा दिल्यानंतर, त्याचे पात्र रिकामे होऊ न देणे हे यजमानाचे आद्य कर्तव्य मानले जाते. तुम्ही दोन-चार घोट पिले की यजमान त्यात लगेच पुन्हा गरम पाणी ओततात. हा त्यांच्या आदरातिथ्याचा एक भाग आहे.
*या पेयपानाचे काही खास शिष्टाचारही आहेत. जेव्हा तुम्हाला तोंग्बा दिला जातो, तेव्हा ती बांबूची नळी (पिप्सिंग) पात्रात हलवायची किंवा ढवळायची नसते. नळी तशीच स्थिर ठेवून फक्त पेय ओढायचे असते. जर तुम्ही ती हलवली, तर तळाशी असलेले नाचणीचे दाणे नळीच्या छिद्रांमध्ये अडकून नळी बंद होऊ शकते.
*तोंग्बामध्ये अल्कोहोलचे प्रमाण अतिशय कमी (साधारण ५% ते ८%) असते. त्यामुळे हे पेय कडक नसून, सौम्य आणि सुखद असते. याची चव थोडी आंबट-गोड आणि धान्याचा अर्क उतरल्यामुळे अतिशय वेगळी, पण तृप्त करणारी लागते. हिमालयातील गोठवणाऱ्या थंडीत आणि दमवून टाकणाऱ्या ट्रेकनंतर शरीराला आतून ऊब देण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी तोंग्बा एक उत्तम पर्याय मानला जातो.
स्थानिक लोक याला एक उत्तम औषधी पेय मानतात. डोंगराळ भागात होणारा सर्दी-खोकला, शरीराचा थकवा आणि 'अल्टिट्युड सिकनेस' (उंचीवर गेल्यामुळे होणारा त्रास) यावर हे पेय अत्यंत गुणकारी मानले जाते. तसेच नाचणी गरम पाण्यात वाफवली जात असल्याने ते पचनासाठीही हलके असते.
लुकलाच्या त्या गोठवणाऱ्या हवामानात तोंग्बाच्या निमित्ताने निसर्गाचा आणि मानवी संस्कृतीचा एक अप्रतिम मिलाफ पाहायला मिळाला. खराब हवामानामुळे आमचा प्रवास थांबला असला, तरी त्याने आमच्यासाठी हिमालयीन लोकसंस्कृतिक वैभवाचे एक नवीन आणि उबदार दालन खुले केले होते. तोंग्बाविषयीची सविस्तर माहिती आणि तिथल्या लोकांचे प्रेमळ आदरातिथ्य आमच्या मनात कायमचे कोरले गेले.
-कुसुमानंद
9403464101
Comments
Post a Comment