स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग-13 श्वासांचा संघर्ष ते विजयाचा जल्लोष ; एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा
लोबुचेत पोहोचलो तेच मुळी डोकेदुखी घेवून ! दिवसभराची पायपीट, उन्हाचा तडाखा यामुळे डोकेदुखी असेल असे वाटत होते. परंतु, 'हाय अल्टीट्यूड'चे ते लक्षण होते. रात्रीदेखील ते जाम दुखत होते. मळमळ वाढली. उलटी होते की काय, असे वाटू लागले. ॲसिडीटी झाली असावी, असे वाटत राहिले. जेवणावरील वासना पूर्णपणे उडालेली होती. ही सर्व लक्षणे पाहून शेखरने लसूण सूप घेण्यास सांगितले. हाय अल्टीट्यूडची लक्षणं कमी करण्यासाठी गिर्यारोहक लसूणचा प्रभावी वापर करतात. याचा उल्लेख मागच्या भागात मी केलेला आहे. समोर लसूण सूप आलेले. ते बळे-बळेच पोटात गेले.
आधीच हे पिरॅमिड टी हाऊस म्हणजे एखाद्या 'भयपटा' तील वास्तूपेक्षा कमी नव्हते. त्यात, त्यामधील आजची रात्र ही सदैव लक्षात राहणारी, खडतर आणि भीतीदायक रात्रींपैकी एक ठरलेली. पाठीवर आडवे होत झोपण्याचा प्रयत्न करताच उर प्रचंड धडधडत होते. श्वासांची कोंडी व्हायची. मध्येच श्वासोच्छवास कमालीचा वाढायचा. Spo2 तपासले असता ते 70 पर्यंत दाखवत होते. सौ चे तर 40 दाखवू लागलेले. आडवे होवून झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न सोडून दिला. भिंतीला पाठ टेकून, पाय पसरुन झोप जाणीवपूर्वक आणू लागलो. मात्र, ती आज रुसलेली. अजिबातच जवळ येत नव्हती. परंतु, भिंतीला पाठ टेकून बसल्याने जरा बरे वाटत होते.
कधी एकदा रात्र सरुन सकाळ उजाडते, असे वाटू लागलेले. कमालीची अस्वस्थता वाटू लागलेली. बाहेर घसरलेला पारा खिडकीच्या तावदानावर स्पष्ट जाणवत होता. रात्र सरता सरत नव्हती. भयपटातील दृश्याप्रमाणे विजेचा बल्ब 'चरकत' मध्येच गायब व्हायचा आणि पुन्हा अस्वस्थतेत अधिक भर घालायचा. अशी ती न संपणारी रात्र जमेल तशी एकदाची संपवून टाकली.*
उजाडले एकदाचे..! भल्या पहाटे तावदानावर जमलेले हिमकण ओघळत राहिलेले. रात्री बलदंड, राकट आणि राक्षसाप्रमाणे वाटणारे समोरचे पर्वत शिखर बर्फाचा फेटा बांधून आता तपस्वीप्रमाणे लोभस वाटत होते. पांढरी शुभ्र बर्फाची लपेटलेली शाल घेवून, बाजूचे शिखर जणू आळस देत उभे होते. तर काही डोक्यावर पांढुरक्या, निळ्या, काळसर ढगांच्या पुंजक्यांचे ओझे घेवून उभे होते.
काळरात्र संपून उजाडल्याच्या आनंदातच खाली रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो गरम पाणी आणि शक्य तेवढी न्याहरी उरकून उत्साहाने आज लवकर बाहेर पडलो. कारण, नियोजनानुसार आजच गोरक्षेप गाठून तेथून पुढे इबीसीला पोहोचायचे होते.
भयपटातील घाबरवणारी टी हाऊसच्या ‘प्रॉपर्टी’ ला मागे टाकून एकदाचे आम्ही सर्वजण गोरक्षेपकडे मार्गक्रमण करु लागलो. अगदी सुरुवातीलाच लागलेले चढण आमचे सत्व पाहणारे ठरले. प्राणवायूच्या कमतरतेमुळे सकाळी सकाळीच पावलांनी साथ सोडलेली होती. ती चंद्रावर पडल्याप्रमाणे एकेक सावकाश पडू लागलीत. तोंडातून श्वास-उच्छवास बाहेर पडू लागला. एक डोंगर संपला की थोडे विसावत होतो. तोवर पुढचा दत्त म्हणून समोर येत होता. हवेत गारठा होता. तो झोंबत होता. त्यात ढगाळ वातावरण ! सकाळीच दमायला होत होते.
यावर मात करण्यासाठी भिमसेनी कापरासोबत ओवा बांधून आणलेली पुरचुंडी आप्पाकाकांनी सर्वांना दिलेली. ती खिशातून काढून हुंगत प्रत्येकाची पाऊले पुढे पडू लागली.
ढगाळलेली चादर बाजूला सारुन एकदाचा आमचा सूर्याबा आकाशात तळपला. तशी मरगळ गळून पडली आणि वीज संचारावी तशी उन्हं खावून ऊर्जा अंगात संचारली. पाणी, चिक्की खावून ताजेतवाने झालो. दमलेली पावले आता 'दमदार' पडू लागलीत. व्हंडा माळ लागावा, तशी काळी, पिवळी, पांढरी जमीन लागत राहिली.
अमादाबलम, लोत्से, नुप्से, लोबूचे या बर्फाच्छादित शिखरांनी आपल्या सौंदर्याने मनातील अस्वस्थता क्षणात काढून टाकली. ‘ॲक्सेंटर’ पक्षी अवती-भोवती बागडू लागले. या निर्जन प्रवासात त्यांची तेवढीच सोबत.
*चंद्रभूमीप्रमाणे आता जमीन लागलेली. वितळलेला बर्फ खाली सरकत साचलेला. दूरवर शिखरांची नजाकत वाढवत 'ब्ल्यू आईस' वर्षानुवर्षे त्यांच्या कडेवर बसून होता. 5 हजार 165 मीटरवरील गोरक्षेपचा चढ लागला. ते झपाट्याने पूर्ण केले. इथून अवघ्या तीन किलोमीटरवर आता इबीसी होते. हे जीवघेणे अंतर कापण्यासाठी आजूनही जवळपास तीन तासांची खडतर परीक्षा बाकी होती.*
*आता पावले झपाझप पडू लागलेली. उखडून पडलेल्या, पर्वत माथ्यावरुन घरंगळत खाली आलेल्या, ढासळलेल्या दगड-धोंड्यातून पायवाट शोधावी लागत होती. ही चढ-उताराची वाट छातीची धडधड वाढवित राहिली. ही वाट संपता संपत नव्हती. समोर दूरवर एव्हरेस्ट बेस कॅम्पवरील गिर्यारोहकांचे पिवळे तंबू दिसू लागले, साहसी वीरांची, पर्यटकांची रेलचेल दिसू लागली. तशी पावले ओढीने पुढे पडू लागली. हवेतील प्राणवायूचे भान आता हरपले होते. समोर दिसणारे ते अवघे 10 मिनीटांचे वाटणारे अंतर तासा-दीड तासात पूर्ण झाले.
गार वारा झोंबू लागला. तो कापरं भरवू लागला. जराशी देखील होणारी हालचाल दमणूक वाढवू लागलेली. जसजसे जवळ जावू, तसा वाढलेला उत्साह, संचारलेली ऊर्जा या सर्व अडथळ्यांवर मात करु लागली. 5 हजार 364 मीटर लिहिलेला तो 'इबीसी' चा दगड दुरुन दिसत होता. धावतच त्याच्या जवळ गेलो.
गेल्या काही दिवसांचा झालेला त्रास, अस्वस्थता, दमणूक कुठल्या-कुठे एका क्षणात वाऱ्यावर विरुन गेली. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषात' इबीसीची निशाणी ठरलेल्या दगडावर चढलो आणि भारताचा तिरंगा एका पाठोपाठ एक असा सर्वांनी दिमाखात फडकविला. या खडतर प्रवासाने आमची खूप परीक्षा पाहिली होती. आमची जिरवण्यासाठी जागोजागी टपलेला होता. या ‘खडतर प्रवासाची' जिरवण्यासाठी मुद्दामच ठरवून मी त्या दगडावर चढून ‘50 पुशअप्स’ मारलो. विशालने देखील 'त्या' खडकावर चढून पुश अप्स मारल्या. गायकवाड साहेबांच्या संकल्पनेतून त्यांनी आणलेली ‘संविधान’ उद्देशिका प्रदर्शित केली. विजयी मुद्रेने मी चक्क सौ ला उचलून घेतले. कितीतरी छबी आम्ही सर्वजण टिपत होतो. आमच्या एकत्रित चमूची छायाचित्रं टिपली. कमालीचा आनंदोत्सव साजरा केला. या उत्सवाच्या उबीत झोंबणारा बहुतेक चिडीचूप झालेला होता.
‘सागरमाथा’ अर्थात एव्हरेस्टचे सौंदर्य उघड्या डोळ्यात साठवत होतो. मनाच्या कोंदणात किती तरी वेळ भरुन घेत होतो. कॕमेऱ्यात बंदिस्त करत होतो. मोठ्या दिमाखात गोरक्षेपकडे समाधानाने, यशस्वी मनाने माघारी परतलो. श्वासांच्या संघर्षात आज विजयाचा जल्लोष झालेला.
हिमालयाच्या कुशीत, स्वप्नातील शिखराच्या पायथ्याला आज आम्ही सर्वांनी गवसणी घातलेली. त्याचा आनंद आजवर ओसंडत राहिलेला.
- कुसुमानंद
*9403464101*
Comments
Post a Comment