स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग -11 तेंगबोचे ते दिंगबोचे.. रोमहर्षक प्रवास!

     ​तेंगबोचेमध्ये पाऊल ठेवताच, सर्वप्रथम टी-हाऊस गाठून सामान ठेवले, फ्रेश झालो आणि लगेचच तेंगबोचे मॉनेस्ट्रीकडे निघालो.​समुद्रसपाटीपासून तब्बल 3,867 मी उंचीवर, सोलुखुंबू जिल्ह्यातील खुम्बू प्रदेशात ही मॉनेस्ट्री दिमाखात उभी आहे. दूधकोसी आणि इमजा खोला नद्यांच्या संगमावरील एका टेकडीवर वसलेल्या या मॉनेस्ट्रीला ‘गेटवे टू एव्हरेस्ट’ असेही म्हटले जाते.
​      मुख्य प्रवेशद्वार अत्यंत रंगीबेरंगी आणि तिबेटी कलाकुसरीने नटलेले आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी वर, मध्यभागी असलेले 'धर्मचक्र' आणि त्याच्या दोन्ही बाजूंना बसलेली दोन हरणे भगवान बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या उपदेशाची-धम्मचक्र प्रवर्तन आठवण करून देतात.
​     मॉनेस्ट्रीच्या गर्भगृहात अतिशय सुंदर, देखणी आणि भारदस्त अशी बुद्धांची सोनेरी मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडते. आतील भिंतींवर कोरलेली अप्रतिम चित्रे पाहत आम्ही तिथे काही वेळ ध्यानस्थ बसलो. शांतता आणि ऊर्जेचा तो अनुभव शब्दातीत होता.
      ​आम्ही ज्या टी-हाऊसमध्ये मुक्कामाला होतो, त्याचे मालक होते अंग रिता शेर्पा! विना प्राणवायू (Without Oxygen) 10 वेळा एव्हरेस्ट सर करून त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. त्यांच्या या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र तिथे भिंतीवर अभिमानाने टांगलेले दिसले. रात्रीच्या जेवणानंतर 'कराओके'वर मनसोक्त गाणी गात आम्ही त्या थंडीतही एक ऊबदार संध्याकाळ साजरी केली.
     सकाळी ५ वाजता उठून समोर पसरलेली नयनरम्य पर्वतराजी न्याहाळत बसलो. अशा प्रफुल्लित वातावरणात धावण्याचा मोह आवरला नाही, म्हणून एक छोटी 'रन' घेतली. हवेतील ऑक्सिजनची कमतरता आणि हातमोजे काढू न देणारा कमालीचा गारठा जाणवत होता. ​मनसोक्त फोटो आणि रील्स बनवल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी आलो. ओट्स, सफरचंदाचे तुकडे आणि मध घालून केलेला गरमागरम, रुचकर 'ॲपल पोरिज' (दलिया) खाऊन आम्ही दिंगबोचेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.
​      मोकळ्या समतल जमिनीनंतर चढण सुरू झाली. वाटेत पांढऱ्या आणि गुलाबी 'ऱ्होडोडेंड्रॉन' फुलांची दाट वनराई लागली. फुलांमधून मध गोळा करणाऱ्या मधमाश्या आणि उंच झाडाच्या शेंड्यावर बसलेला 'ग्रोसबिक' पक्षी निसर्गाचे जिवंत सौंदर्य दाखवत होते.
​      जसजसे आम्ही वर जात होतो, तसतशी झाडांची उंची कमी होऊन ती झुडपांमध्ये बदलली. काही ठिकाणी जमीन एवढी कोरडी आणि ढासळलेली होती की जणू चंद्रावरील जमिनीवरून चालत असल्याचा भास होत होता. खाली दरीतून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट 'उथळ पाण्याला खळखळाट फार' या म्हणीची प्रकर्षाने आठवण करून देत होता.
          मणी स्टोन केर्न वाटेत जागोजागी दगडांची रचना असलेले स्तंभ दिसले, ज्यांना स्थानिक भाषेत 'केर्न' (Cairn) किंवा 'मणी स्टोन केर्न' म्हणतात. या स्तंभांवर तिबेटी लिपीतील शिलालेख आणि रंगीबेरंगी बौद्ध प्रार्थना पताका-'लुंग ता' बांधलेल्या होत्या. हिमालयात प्राण गमावलेल्या गिर्यारोहकांच्या आठवणीत 'स्मृती स्मारक' म्हणूनही ही रचना केली जाते.
हळूहळू वनस्पती पूर्णपणे मागे पडल्या आणि निग्रो लोकांच्या डोक्यावरील केसांसारखे मातीमिश्रित चिकटलेले गवत दिसू लागले. आता दमछाक होत होती. वाटेत दगडांची रचना असलेली घरे, पांढराशुभ्र स्तूप ('चोर्तेन') आणि आकाशात विहरणारी गिधाडे दिसू लागली, जी गाव जवळ आल्याची नांदी होती. वाटेत तांबूस छातीचा डोंगर चिमणा म्हणजेच 'रुफस-ब्रेस्टेड एक्सेंटर' पक्षीही दर्शन देऊन गेला.
​      आज अथकपणे 12 किमीचालणे झाले होते. त्यासाठी जवळपास सव्वा सहा तासात 1745 ऊर्जा खर्ची पडलेली. अखेर दुपारी दीड वाजता, 4330 मी उंचीवरील 'दिंगबोचे' या सुंदर गावात आम्ही सुखरूप पोहोचलो होतो.
​©️®️ - कुसुमानंद
               9403464101

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..