स्वप्नापलीकडची एव्हरेस्ट वारी भाग - १२ क्षितिजापलीकडच्या संघर्षाची स्मारकं

    ​जसजसे आम्ही उंची गाठत होतो, तसतसा या हिमालयाचा राकट आणि खडतर चेहरा अधिकच तीव्रतेने समोर येत होता. हवेतील प्राणवायू  हळूहळू कमी होत होता आणि प्रत्येक श्वासासाठी फुफ्फुसांना करावी लागणारी धडपड आता उघडपणे जाणवू लागली होती. शरीरातील या बदलांचा थेट परिणाम भूक आणि झोपेवर झाला होता.
     ​येथील 'टी-हाउस' संस्कृती मात्र, कमालीची आदरातिथ्य करणारी होती. रात्री जेवणापूर्वी हातावर मिळणारे वाफवलेले गरम रुमाल गोठवणाऱ्या थंडीत शरीराला सुखावणारी ऊब देऊन जायचे. जेवण जात नव्हते, त्यामुळे पोट भरण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी आम्ही मुख्यत्वे 'सूप' पिण्यावरच भर दिला होता.
      रात्री 'करा ओके'च्या माध्यमातून गाण्याची मैफील रंगली. बाहेर जसजसा थंडीचा पारा घसरत होता, तसतसा आतमध्ये अनेकांचा गळा गाण्यांच्या सुरांनी ऊबदार होत होता. थंडीला विसरण्यासाठी सुरांची ही ऊब मोठी सोबती ठरली.
      ​त्या रात्री डोळ्याला डोळा लागलाच नाही. पहाटेच्या सुमारास कुठेतरी 'निशा'राणीने कवेत घेतले खरे ! पण, काही वेळातच दमगिरल्यासारखे झाले, पुन्हा दचकून जाग आली. सकाळ उजाडली ती शरीराच्या मंदावलेल्या गतीनेच. बाहेर विस्तीर्ण निसर्ग आपले सौंदर्य उधळत स्वागताला उभा होता. अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर आणि मनावर एक अनामिक जडत्व रेंगाळत होते.
      ​जमेल तेवढा नाश्ता करून बाहेर पडलो. जसजसे कोवळे ऊन अंगावर पडू लागले, तशी शरीरात एक नवी ऊर्जा संचारली. त्या प्रसन्न वातावरणात जडावलेले अंग मोकळे झाले. पावलांची गती आपोआप वाढू लागली. समोर खडे ठाकलेली पर्वत शिखरे साद घालत होती, तर दुसरीकडे धैर्याची परीक्षा पाहणारे दगड-धोंड्यांचे रस्ते आमची जिरवायला टपलेले होते. वास्तविक हा 'अॕक्लिमेटायझेशन ट्रेक' वातावरणाशी अनुकूल होण्याचा सराव होता.
   आम्हाला 4766 मीटर उंचीवर जावून पुन्हा दिंगबोचेत टी हाऊसवर परतायचे होते. चढण एकदम खडे होते. दम लागत होता. रिल्स बनवणे, निसर्गाची अप्रतिम रूपे कॅमेऱ्यात टिपणे आणि हिमालयाच्या अथांग सौंदर्याचा आस्वाद घेणे, यात आम्ही थकवा मुद्दामून विसरून जात होतो.
    रात्रीचे तापमान उणे सहा अंश सेल्सिअस होते आणि इथून पुढे ते अजूनच खालावत जाणार होते. या गोठवणाऱ्या हवेत शरीराला टिकवून ठेवण्यासाठी आजचा दिंगबोचेचा मुक्काम अत्यंत महत्त्वाचा होता.
     *अवघे सव्वा दोन किलोमीटरचे अंतर कापायला आम्हाला तब्बल सव्वा दोन तास लागले! अखेर आम्ही 4600 उंचीवर पोहोचलो. आजच्या या ट्रेकने आमचा कस तर लावलाच, पण उद्या येणाऱ्या महाकठीण प्रवासाची पूर्व कल्पनाही दिली. आकाशात एक 'हिमालयीन गिधाड' स्वच्छंदपणे विहार करताना दिसले, त्याचे ते उड्डाण मनाला उभारी देणारे होते.       
       वाढत्या उन्हामुळे शिखरमाथ्यावरील बर्फाचे वाफेत आणि पर्यायाने ढगात रूपांतर होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होती. शिवाय वितळलेले पांढरेशुभ्र पाणी दगडातून खळाळत खाली प्रवाहीत झालेले. हा एक स्वर्गीय आनंद होता. तो अद्भुत नजारा मोबाईलच्या कॅमेऱ्यात कायमचा बंदिस्त करून आम्ही पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली आणि दुपारी टी-हाउसवर पोहोचून विश्रांती घेतली.
       *दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आमची पावले 'लोबूचे'च्या दिशेने पडू लागली. दिंगबोचे ते लोबूचे हा प्रवास म्हणजे केवळ आणि केवळ दगड-गोट्यांचे साम्राज्य! समतल आणि सपाट रस्ता अगदी नावापुरताच होता. पण, मनात एक वेगळाच थरार होता. कारण, उद्या आम्ही आमच्या स्वप्नभूमीत अर्थात 'एव्हरेस्ट बेस कॅम्प' (EBC) वर पोहोचणार होतो. याच उत्साहाने सर्वांच्या पावलांना एक सुप्त गती दिली होती.
     वाटेत निसर्गाचे जे सौंदर्य दिसत होते, ते आम्ही डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात साठवून घेत होतो. केवळ दगडांची एकमेकांवर सुबक रचना करून बनवलेले एक पारंपरिक घर वाटेत लागले. मग काय..ते सर्व ट्रेकर्सचे 'सेल्फी आणि रिल्स पॉईंट' बनले. काही परदेशी पर्यटकही त्या घराच्या रचनेच्या प्रेमात पडले होते आणि थांबून फोटो काढत होते. सिमेंटचा कुठेही वापर न करता, केवळ कौशल्याने रचलेले दगड आणि छतासाठी वापरलेले सपाट पाषाण ! हिमालयीन वस्तीतील लोकांची साधी पण कणखर जीवनशैली या घरातून प्रतिबिंबित होत होती.
     थंडीची तीव्रता वाढल्याने आता सर्वांनीच 'डाऊन जॅकेट' चढवले होते. 'डॉटर ऑफ एव्हरेस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'पुमोरी' या विलोभनीय बर्फाच्छादित शिखराचे आम्हाला दर्शन झाले. वाटेत अनेक ठिकाणी पायवाटा खचलेल्या होत्या. खालच्या दरीतून दूधकोसी नदी दगडांवर आपटत, मोठा आवाज करत फेसाळत वाहत होती. जसजशी उंची वाढली, तसा श्वासोच्छवास तीव्र झाला आणि पावले पुन्हा मंदावली.
      *चालता चालता अचानक एका जागी मन हेलावून गेले. हे 'थुकला पास' जवळील स्मारकांचे ठिकाण होते. एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्यासापायी ज्या गिर्यारोहकांनी आपले प्राण गमावले, त्यांची स्मारके येथे उभारण्यात आली होती. त्यांच्या प्रियजनांनी त्यांच्या आठवणीत दगडांवर नावाच्या पाट्या लावल्या होत्या.
   तिथेच नजर फिरवत असताना एका पाटीवर डोळे रेंगाळले. महाराष्ट्रातील गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांची ती पाटी होती, ज्यांनी २२ मे २०१९ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करुन आपले प्राण गमावले होते. त्या पाषाणासमोर नतमस्तक होताना ऊर अभिमानाने आणि तितकाच दुःखाने भरून आला. हिमालयाचे रौद्र आणि जीवघेणे रूप डोळ्यांसमोर उभे राहिले.
       ​दुपारी अडीचच्या  सुमारास आम्ही तब्बल 5050 मीटर उंचीवर असलेल्या लोबूचे येथील '८००० इन' (8000 Inn) या टी-हाउसवर पोहोचलो. सभोवती फक्त आणि फक्त अजस्र खडे डोंगर आकाशाला गवसणी घालत उभे होते. त्या  डोंगरांच्या खोबणीत, जणू आक्राळ विक्राळ पर्वतांच्या जबड्यात हे एकमेव टी-हाऊस असल्यासारखे भासले. आजूबाजूला दूरदूरपर्यंत कोणतेही दुसरे टी-हाऊस किंवा मानवी वस्तीचा लवलेशही नव्हता. जबड्यातील हे पिरॕमिड आकाराचे टी हाऊस निसर्गाच्या त्या अथांग शांततेत अतिशय रहस्यमय, गूढ आणि अनाकलनीय वाटत होते. आपण जगाच्या एका वेगळ्याच टोकावर आलो आहोत, याची जाणीव करून देणारी ती संध्याकाळ मनावर काहीसे भीतीदायक दडपण घालून गेली.
              ©️®️ *​- कुसुमानंद*
                *9403464101*

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..