हिमालयाच्या कुशीत शेरपा संस्कृतीचा सोहळा 'ड्युमजी'
निसर्गाच्या लहरीपणामुळे लुकला विमानतळावर विमानांची उड्डाणे थबकली आणि आम्ही सक्तीच्या मुक्कामात अडकलो, हे खरं असलं तरी या 'वरुण कोंडी'ने आमच्यासाठी शेरपा संस्कृतीचे एक अद्भुत, आनोखे दालन खुले करुन दिले. निसर्गाची कवाडे बंद झाली तरी माणसांच्या आणि संस्कृतीच्या उत्साहाची कवाडे कशी खुली असतात, याचा प्रत्यय आम्हाला लुकलात आला. निमित्त होतं शेरपा समुदायाचा अत्यंत पवित्र आणि पारंपरिक 'ड्युमजी' उत्सव!
ज्या हाॕटेलमध्ये राहिलो होतो, त्याचे मालक अंग तेंग शेर्पा यांनी आम्हाला ड्युमजी उत्सव पहायला माॕनेस्ट्रीत घेवून गेले. तेथे आमचे स्वागत 'सूचिया' अर्थात चहा देवून केले. हा मीठ घालून केलेला चहा होता. बटर टी, शेर्पा टी, साॕल्टी असे चहाचे प्रकार असल्याचे समजले.
समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचावर, उणे तापमानात राहणाऱ्या शेरपा लोकांचे जीवन जितके खडतर, तितकेच त्यांचे सण रंगीबेरंगी आणि ऊर्जेने भरलेले असतात. ड्युमजी हा केवळ एक सण नाही, तर तो या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा आणि एकत्र येण्याचा महासोहळा आहे.
सुमारे ३५० वर्षांपूर्वी, महान लामा 'गुरु रिम्पोचे' आणि शेरपा संस्कृतीचे संस्थापक लामा संगा दोर्जे यांनी या उत्सवाची सुरुवात केली, असे मानले जाते. दरवर्षी मे किंवा जून महिन्यामध्ये (शेरपा कॅलेंडरनुसार पाचव्या महिन्यामध्ये) हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामागे अत्यंत उदात्त भावना असते.
एव्हरेस्टच्या पर्वतशिखरांचे आणि स्थानिक निसर्गाचे आभार मानणे. गावातील दुष्ट शक्ती, रोगराई आणि संकटं दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करणे. आगामी काळातील पीकपाणी, ट्रेकिंगचा हंगाम सुखाचा जावा आणि प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे, यासाठी लामांद्वारे विशेष पूजा केली जाते. उत्सवाच्या काळात स्थानिक 'मॉनेस्ट्री' म्हणजेच गुंफा रंगीबेरंगी ध्वजांनी सजवल्या जातात. गुंफामध्ये मुख्य लामांच्या मार्गदर्शनाखाली अखंड मंत्रोच्चार आणि पूजाविधी सुरू असतो.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'छाम' नृत्य ! लामा आणि बौद्ध भिक्खू अंगावर अत्यंत जड, रंगीबेरंगी रेशमी पोशाख परिधान करतात आणि चेहऱ्यावर वेगवेगळ्या देवता, प्राणी आणि काल्पनिक पात्रांचे लाकडी मुखवटे घालतात. पारंपरिक वाद्ये जसे की लांब नळ्यांसारखे दिसणारे 'राडोंग', झांज आणि ढोल यांच्या तालावर हे मुखवटा नृत्य सादर केले जाते. हे नृत्य म्हणजे देव आणि दानवांमधील युद्धाचे आणि शेवटी सत्याच्या विजयाचे प्रतीक असते. हिमालयाच्या त्या धुक्यात हे नृत्य पाहताना एक गूढ आणि अलौकिक अनुभव येतो.
ड्युमजी उत्सवाचे वैशिष्ट्यं म्हणजे याचे नियोजन गावातील काही कुटुंबे मिळून करतात, ज्यांना 'लोप्सन' किंवा यजमान म्हटले जाते. दरवर्षी ही जबाबदारी चक्राकार पद्धतीने बदलत जाते. हे यजमान कुटुंब संपूर्ण गावासाठी, येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि लामांसाठी जेवण, चहा आणि पारंपरिक पेय 'छ्यांग' म्हणजे तांदळापासून बनवलेली स्थानिक बिअर यांची व्यवस्था करतात. यामुळे कोणावरही आर्थिक भार पडत नाही आणि संपूर्ण समाजात एकतेची भावना टिकून राहते.
काठमांडूला जाण्याची विमाने रद्द झाल्याची निराशा विसरून आम्ही या उत्सवात पूर्णपणे रंगून गेलो होतो. स्थानिक शेरपा लोकांनी आमचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. त्यांच्या संगीताच्या तालावर डोलताना आम्हाला जाणीव झाली, भौतिक सुखांपासून मैलोन्मैल दूर असलेल्या या हिमालयाच्या कुशीत खरी श्रीमंती ही लोकांच्या मनाच्या समाधानात आणि त्यांच्या समृद्ध संस्कृतीत दडलेली आहे !
छ्याम नृत्यानंतर गावाच्या बाहेर एके ठिकाणी सर्वजण आलो. तेथे पुठ्ठ्यांपासून, लाकडांपासून आणि पिठाच्या साहाय्याने एक विशिष्ट धार्मिक प्रतिकृती तयार केली होती, ज्याला 'तोर्मा', 'ल्यु', 'झोर' असे म्हटले जाते. या विधीला आणि त्याविषयीच्या परंपरेला 'झोर बाकचाम' म्हणजेच वाईट शक्तींचे दहन करण्याचा विधी म्हणतात.
पुठ्ठ्यांचे बॉक्स, लाकूड आणि रंगांच्या साहाय्याने मनोऱ्यासारख्या बनवलेल्या 'झोर' वर रंगीबेरंगी लोणी आणि सातूच्या पिठापासून बनवलेली लहान लहान 'तोर्मा' (धार्मिक अन्न-प्रतीके) ठेवली जात होती. मंत्रोच्चार आणि पूजेद्वारे गावातील सर्व रोगराई, संकटं, भूतबाधा आणि नकारात्मक ऊर्जा या प्रतिकृतीमध्ये (झोर) आकर्षित करण्याचे आवाहन केले जात होते. मंत्रोच्चाराच्या जयघोषात या 'झोर'ला मोठ्या अग्निमध्ये अर्पण केले गेले. असे मानले जाते की, या दहनामुळे गावातील सर्व वाईट शक्ती, आजारपण आणि नैसर्गिक आपत्ती जळून खाक होतात. हे दहन झाल्यावर गावात सुख, समृद्धी, चांगले आरोग्य आणि शांतता नांदते अशी शेर्पा बांधवांची गाढ श्रद्धा आहे.
थोडक्यात, आपल्याकडे होळीमध्ये जशी वाईट प्रवृत्ती जाळून टाकण्याची प्रथा आहे अगदी त्याप्रमाणेच.! हे दहन म्हणजे गावाच्या संरक्षणासाठी आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी केला जाणारा एक सर्वोच्च तांत्रिक धार्मिक विधी आहे.
निसर्गाने आमच्या विमानाचे उड्डाण रोखले नसते, तर शेरपा संस्कृतीचा हा अनमोल हिरा आमच्या नजरेतून सुटला असता. म्हणूनच म्हणतात, "प्रवासात जे ठरवलेलं असतं ते निसर्ग देतोच ! पण, जे ठरवलेलं नसतं, ते अधिक सुंदरतेने बहाल करतो!"
- कुसुमानंद
9403464101
Comments
Post a Comment