स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग- १४ (शेवट) हिमशिखरांच्या सावलीतून मायभूमीच्या कुशीत
लुकला! एव्हरेस्टच्या कुशीत वसलेलं एक असं ठिकाण, जिथे निसर्ग प्रत्येक क्षणाला आपलं रूप बदलत असतो. बेस कॅम्पची यशस्वी मोहीम फत्ते करून जेव्हा आम्ही अत्यंत प्रसन्न मनाने लुकलात पाऊल ठेवलं, तेव्हा निसर्गानेही आपलं रंगरूप बदलायला सुरुवात केली होती. डोळ्यांदेखत आभाळ ढगाळून आलं, क्षणात धुक्याची पांढरी चादर सर्वत्र पसरली आणि बघता बघता पावसाच्या सरी कोसळू लागल्या.
बाहेर निसर्गाचं हे तांडव सुरू असतानाच, मुक्कामाच्या ठिकाणी आमच्यासाठी एक सुखद धक्का वाट पाहत होता. रात्रीच्या जेवणानंतर कस्तुरीने अचानक एक सुंदर केक आणून सर्वांना चकित केलं. शेखर, प्रशांत आणि योगेंद्र यांच्या साथीने तिने 'एव्हरेस्ट बेस कॅम्प'च्या यशस्वी पूर्ततेचा एक छोटेखानी पण, उबदार आनंदोत्सव आयोजित केला होता.
आपल्याकडे पाहुण्यांचे स्वागत शाल देऊन करण्याची संस्कृती आहे, तर या दुर्गम हिमालयाच्या कुशीत 'खाता' देऊन सन्मान केला जातो. 'खाता' म्हणजे केवळ एक मुलायम वस्त्र नव्हे, तर तो जिव्हाळ्याचा, आदराचा एक रेशमी बंध असतो! येथील संस्कृतीत रंगांनाही निसर्गाचे अधिष्ठान आहे. पांढरा रंग हवेचा, लाल सूर्याचा, पिवळा मृदेचा, हिरवा पाण्याचा आणि निळा रंग अथांग आकाशाचे प्रतीक मानला जातो. आम्हाला हवेचे प्रतीक असलेला तो पांढराशुभ्र 'खाता' गळ्यात घालताना यशाचा अभिमान छातीत दाटून आला. केक कापून, एकमेकांना भरवून, हास्याच्या सुरावलीत आम्ही तो आनंदाचा क्षण मनाच्या गाभाऱ्यात साठवून घेतला.
हिमालयाचा रस्ता सहजासहजी सोडत नाही. खराब हवामानामुळे सलग दोन दिवस लुकलावरून काठमांडूसाठी एकाही विमानाने उड्डाण केले नाही. एकदा तर विमानतळावर जाऊन, सुरक्षा तपासणी करूनही पुन्हा सामान घेऊन माघारी फिरावे लागले.
अर्थात, या सक्तीच्या विश्रांतीने आम्हाला लुकलाची स्थानिक बाजारपेठ आणि तिथला पारंपरिक 'ड्युमजी' हा वार्षिक उत्सव अतिशय जवळून अनुभवण्याची संधी दिली. (या उत्सवाविषयी मी स्वतंत्रपणे लिहिणारच आहे.)
तिसऱ्या दिवशी सकाळी अखेर नशिबाने कूस बदलली. लुकलाच्या धावपट्टीवर एका विमानाचे चाक टेकले आणि काठमांडूला जाण्याची आमची आशा पल्लवित झाली. हवामान लख्ख झाले होते आणि आमचे विमानही वेळेत दाखल झाले. आवश्यक त्या सर्व सोपस्कारांनंतर विमानाने आकाशात झेप घेतली आणि आम्ही काठमांडूत पोहोचलो.
हॉटेलवर आल्या आल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे मनसोक्त अंघोळ! गेल्या दहा दिवसांतील प्रवासात, हाडे गोठवणाऱ्या थंडीत अंघोळीची ना सोय होती ना इच्छा. स्वच्छ होऊन, पोटभर जेवून आम्ही सुखाची पाठ टेकली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही श्री पशुपतीनाथ मंदिरला भेट देवून प्रचंड गर्दीत दर्शन घेतले. मी आणि सौ २०१९ लाही आलो होतो. त्याची आठवण प्रकर्षाने झाली.
या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, भारतातून, विशेषतः महाराष्ट्रातून येणारे बहुतांश पर्यटक, तीर्थयात्री हे पशुपतीनाथांच्या दर्शनासाठी येतात, तर हिमालयातील कठीण वाटा तुडवणारे ट्रेकर्स मात्र बहुतांशी परदेशी असतात.
यानंतर भल्या मोठ्या प्रसिद्ध बौद्धनाथ स्तूपाला भेट दिली. याला स्थानिक पातळीवर 'खास्ती चैत्य' असेही म्हणतात. हा जगातील सर्वात मोठ्या गोलाकार स्तूपांपैकी एक असून, तो बौद्ध धर्मीयांचे, विशेषतः तिबेटी बौद्ध संस्कृतीचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र केंद्र आहे. स्तूपाच्या मुख्य शिखरावर असलेल्या 'बुद्धांचे डोळे' आणि त्यावरून चारी बाजूंना पसरलेल्या रंगीबेरंगी प्रार्थना पताका हे या वास्तूचे प्रमुख वैशिष्ट्यं आहे.
संध्याकाळ झाली आणि कस्तुरीने आयोजित केलेल्या विशेष 'गाला डिनर'साठी आम्ही नटून-थटून तयार झालो. एका जुन्या, देखण्या 'अँटीक लुक' असलेल्या लाकडी हॉटेलमध्ये आमची सोय करण्यात आली होती. तिथली ती नक्षीदार काष्ठशिल्पे आणि जुन्या वळणाचे सुशोभीकरण मनाला भुरळ पाडत होते. अत्यंत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर, योगेंद्रने आपल्या हातातील लिफाफे उघडले. ते नेपाळ सरकारच्यावतीने देण्यात आलेले 'एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वी पूर्ततेचे' अधिकृत प्रमाणपत्र होते!
*पुन्हा एकदा आमच्या गळ्यात 'खाता' परिधान करून, त्या छोटेखानी सोहळ्यात आम्हाला ती प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली. या यशाच्या आनंदावर जणू जलाभिषेक करण्यासाठीच की काय, वरुणराजाने बाहेर दमदार हजेरी लावली. पाऊस इतका कोसळत होता की रात्री साडेदहा वाजेपर्यंत आम्ही एका अर्थाने त्या लाकडी महालात 'वरुण कैदेत'च होतो.*
पुढचा दिवस खरेदी आणि सामानाची बांधाबांध करण्यात गेला. दुपारचे जेवण आटोपून आम्ही सामानासह तयार झालो. सायंकाळी मुंबईची फ्लाईट होती. योगेंद्रने आणलेल्या वाहनातून आम्ही काठमांडू विमानतळावर पोहोचलो. मनामध्ये हिमालयाचे ते बर्फाच्छादित सुळके, विस्तीर्ण दऱ्या आणि या ट्रेकच्या शेकडो गोड आठवणी साठवून आमचा काठमांडू ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास सुरू झाला. अखेर, पहाटे दीड वाजता आमचे विमान मुंबईच्या धावपट्टीवर उतरले.
*पहाटे अडीचच्या सुमारास आम्ही जड सामानासह विमानतळाबाहेर आलो आणि समोरचे दृश्य पाहून आमच्या डोळ्यांवरची झोप क्षणार्धात उडाली! चक्क रत्नागिरीहून आमचे खास अधिकारी मित्र कस्टम अधिकारी रत्नसार ढगारे, आय बी अधिकारी सम्राट भोपळे, राजकुमार येवलेकर आणि निरज ही सगळी मित्रमंडळी गायकवाड साहेब आणि माझ्या स्वागतासाठी पहाटेच्या त्या प्रहरात तिथे हजर होती!
शाल, श्रीफळ आणि फुलांचे गुच्छ देऊन त्यांनी आमचे जे स्वागत केले, तो आमच्यासाठी सर्वात मोठा आणि भावुक करणारा 'सुखद धक्का' होता. घरापासून दूर, हजारो मैलांचा खडतर प्रवास करून आल्यानंतर, आपल्या माणसांच्या डोळ्यांत दिसणारा तो कौतुकाचा अभिमान आणि मित्रप्रेमाचा ओलावा..याने आमचे मन गहीवरून गेले. हिमालयाची मोहीम जितकी उत्तुंग होती, तितकीच ही मित्रत्त्वाची साथही अथांग होती !
(समाप्त)
- कुसुमानंद
*9403464101*
Comments
Post a Comment