ए देख के दिल झुमा..
काश्मिर सफर भाग -५
'ए तो कश्मिर है..इसकी फिजा का क्या कहना..'याचा प्रत्यय खरंतर श्रीनगरकडे येतानाच जागोजागी प्रवासात येत होता. आज सकाळपासून तर त्यात आणखीनच भर पडत होती. निसर्गसंपन्नता त्याची नजाकत हे अनुभवत होतो.
जम्मू आणि काश्मिर शासनाच्या फुलशेती विभागाच्या नेहरु स्मारक वनस्पती उद्यानात पोहचलो. या बगिचाला चष्माशाही असं आता म्हणतात. 'चश्मा ए शाही याचा तो अपभ्रंश आहे. ही छोटीशी बाग नेहरु मेमोरियल च्या वरच्या भागात आहे. आजू-बाजूच्या पहाडातून येणाऱ्या नितळ, मिनरल पाण्याच्या झऱ्यासाठी ही बाग प्रसिद्ध आहे.
दल सरोवराच्या समोरच असणाऱ्या या बागेत एक छोटा तलाव आहे. त्यामध्ये उडणारे कारंजे पर्यटकांना आकर्षित करत होते. बागेतील विविध रंगी-बेरंगी फुले मधमाशांसह पर्यटकांना मोहीत करत होती. कुठे आणि किती फोटू घेवू..असं साऱ्यांना होत होतं, हपापल्यासारखे छान-छान छबी टिपण्यात सर्वजण व्यस्त होते.
टुलीपच्या फुलांचा विभाग सध्या बंद होता. परंतु, त्या वर्गातील पिवळ्या रंगाची फुले बागेतील लाॕनवर एका रांगेत आमची वाट पहात हवेवर डोलत होती. याठिकाणी सौ. बरोबर मी ही हावरटासारख्या अनेक छबी आणि सेल्फी घेवून पुढे सरकलो. चिनार, सुरु सारख्या झाडांसोबतही कलात्मकता साधण्यात इथले कर्मचारी यशस्वी ठरलेत. या ठिकाणी उत्तम दर्जाची, माॕडेलसारखे फोटोसेशन होत होते. मुघल गार्डन निशातकडे जायचे असल्याने, इथला निर्धारित केलेला वेळ संपवून आम्ही सगळे पुढे निघालो.
मुघल गार्डन निशात
सम्राट शहानहानचा सासरा आणि सम्राज्ञी नूरजहाँचा धाकटा भाऊ मुघल दरबारातील सर्वात ज्येष्ठ थोर मिर्झा अबुल हसन किंवा असफ जाह याने १७ व्या शतकात या बागेची निर्मिती केली. भारताचा सम्राट म्हणून शाहजहानच्या राज्यारोहणानंतर १६३४ मध्ये या उद्यानाचे बांधकाम करण्यात आले.
या बागेच्या बांधकामाची तारीख पर्शियन क्वाट्रेनमध्ये दिली आहे,-
_dar goosh naseem guft salish gul zar nishat wa eesh-i-dil hah 1634 A.D._
अंदाजे ३५० मी x ५५६.५ मी क्षेत्रफळावर पसरलेली ही बाग १२ भव्य तबकात (टेरेस) मध्ये तयार केली गेली होती. ज्यामध्ये पाणी आणि आवाज यांच्या नादमय प्रवाहातून १२ राशींचे प्रतिक समजले जाई. डेरेदार चिनारचे रेषेदार प्रतिमा उमटत असत. यातून पृथ्वीवर फिरदौस म्हणजेच स्वर्गाची छाप वाटे. दल सरोवर आणि पर्वत यांच्यातील नातेसंबंधातील सुसंवाद म्हणजेच ही बाग आहे.
अफगाण सुभेदार अमीर खान जवान शेर (१७७०-१७७६) च्या काळात बागेची तोडफोड झाली. १८३० मध्ये सुभेदार अझीम खान यांनी या बागेची दुरुस्ती केली.
हिमालय पर्वतरांगेतील जबरवन पर्वत एका बाजूला तर बागेच्या समोर विस्तीर्ण दल सरोवर पसरलेले आहे.
या बागेत दुर्मिळ फुलांसोबतच चिनार, सुरु यांचे वृक्ष आहेत. काश्मिरी पोशाखाचा आनंद येथे पर्यटकांना मिळतो. जबरवन पर्वतातून उगम पावलेला गोपी तीर्थ झरा हा या टेरेस खालून खाली वाहात येतो. या झऱ्यावरच ठिक-ठिकाणी कारंजे बसवण्यात आले आहेत. हे पाणी पुढे सरोवराला जाते. या बागेतून सरोवरावरील अस्ताला जाणारा भास्कराला पाहणे हे नयनरम्य दृश्य असते.
विविध प्रकारचे आणि रंगाचे गुलाब येथे पहायला मिळतात. झुडुपवर्गीय झाडांना अनोखा आकार देवून बागेचे सौंदर्य खुलवले आहे. फूलपाखरांसह अन्य पक्षी या बागेत मनमुरादपणे हिंडताना दिसतात.
या बागेला गार्डन आॕफ ब्लीस, गार्डन आॕफ जाॕय आणि गार्डन आॕफ प्लेझर ही म्हणतात. या ठिकाणी फुले आणि त्यांच्या बिया खरेदी करु शकता. अनेक जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांचे चित्रिकरण या बागेत केले गेले आहे.
'ए देख के दिल झुमा..'याचा साक्षात प्रत्यय इथे आल्याशिवाय राहत नाही..
-प्रशांत सातपुते
9403464101
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
Comments
Post a Comment