साद घालती हिमशिखरे
काश्मिर सफर भाग-३
जम्मूमधील वाहनांची गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि उष्म्याने काहिसे हैराण झालेले बर्फाच्या शोधात श्रीनगरकडे निघालो. अचानक वातावरणात बदल होवून ते ढगाळ बनले. पाऊस पडेल असे वाटले परंतु, ती हुलकावणी ठरली.
मार्गात बऱ्याच ठिकाणी अजूनही रस्त्याची, पुलाची आणि भोगद्याची कामे सुरु होती. त्यामुळे दुहेरी, तिहेरी प्रशस्त मोठे रस्ते बनूनही त्यावर वाहतुकीची कोंडी जागोजागी होत होती. यात माल वाहतूक करणारे ट्रक्स, टँकर यांचा भरणा मोठा होता. तशातच पर्यटकांचे टेंपो, चार चाकी वाहने ही मधूनच घुसून आणखी कोंडी वाढवत होती.
तावी,चिनाब, सतलज, झेलम नदीच्या काठा-काठाने वाहन पळत होते. काही ठिकाणी पात्रे मोठी असूनही, पाण्याचा प्रवाह कमी होता. दगड-गोट्यांवरुन वळसे घेत दुधाळ पाणी खळखळाट करत धावत होते. पाईन, देवदार, फर, चिनार अशी उंचच उंच वाढलेल्या वनराईचे डोंगर तर, खोलवर गडप होत जाणाऱ्या दऱ्या, अशा घाटीतून सुरुवातीचा दाटी-वाटीचा असला तरी तो सुखद प्रवास होता. मधूनच दूरवर पांढुरक्या ढगांमध्ये हिमशिखरे शोधण्याचा त्यांना टिपण्याचा प्रत्येकाचा केविलवाणा प्रयत्न सुरु होता. आठवेल तसे चालकाला प्रश्न विचारत होते आणि जमेल तसा तोही उत्तरे देत होता.
मुख्य राष्ट्रीय महामार्गावर आल्यावर साडेपाच वर्षात काश्मिर घाटीत फार मोठा बदल झाल्याचे जाणवले. विशेषतः रस्त्यांची प्रचंड कामं सुरु होती. टोलवर युवक-युवती दिसत होत्या. एकूणच रोजगाराची संधी उपलब्ध झालेली दिसत होती. जम्मू ते रामबन आणि बनिहाल ते श्रीनगर मार्गावर जवळपास १६ भोगदे आणि ९ बायपास रोड निर्माण केले आहेत. चेनानी नासरी तथा श्यामाप्रसाद मुखर्जी हा देशातील सर्वात मोठा भोगदा ९ किमी लांबीचा दुहेरी मार्ग भोगदा आहे. काजीगुंड ते बनिहाल मार्गावर ८-५ किमी लांब भोगदा आहे. या भोगद्यांमध्ये आपत्कालीन टेलीफोन सेवा, ले बाय रोड, आधुनिक लायटींग, धूर बाहेर घालवण्यासाठी जेट फॕन, नियंत्रणासाठी सीसीटीव्ही, फायर फायटींग यंत्रणा बसविली आहे.
यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्यावेळी रस्त्यांवर ठिक-ठिकाणी दिसणारे बंदूकधारी जवान, आर्मीच्या वाहनांची लक्षणीय संख्या आता जाणवण्या इतपत कमी झालेली दिसली.
जम्मूपासून अंदाजे तीनशे किमीवर असणारे, झेलम नदीच्या काठावर वसलेले श्रीनगर ही जम्मू-काश्मिरची उन्हाळी राजधानी ! जस-जसे अंतर कापले जाई तस-तसे हवेत गारवा जाणवू लागला. पहाडी इलाख्यातून जाताना नद्यांचे प्रवाह अन् दूरवर डोकावणाऱ्या हिमशिखरांनी मन आनंदून गेले. लहानपणी बर्फाचा गोळा खाताना जसा आनंद वाटे अगदी तसे हिमशिखरांच्या दर्शनाने झाले होते. सुरुवातीला चांदीच्या डोंगराप्रमाणे भासणारी, चमचमणारी ती शिखरे परतीच्या सूर्यप्रकाशात किंचित सोनेरी छटा धारण केलेली दिसत होती.
हवेतील हवा-हवासा वाटणारा गारवा, पहाडी इलाख्यातील दूर-दूरवर पसरलेली हिरवाई, खळखळाट करत जाणारे प्रवाह अन् बर्फाची चादर लपेटलेले पर्वत..हे सगळे धरतीवरील स्वर्गाची साक्ष देत होते.
अशा या आनंदी, अल्हाददायक वातावरणात गरमागरम चहा च्या साक्षीने जो तो बालपणात शिरुन निसर्गसंपन्न सौंदर्य डोळ्यात साठवत होता. उरातल्या कोंदणात अन् हातातल्या मोबाईलमध्ये भरुन घेत होता. टिपत टिपत मावळत्या भास्कराला न्याहाळत गडद निशाच्या शालीत श्रीनगर कधी आले समजलेच नाही.
-प्रशांत सातपुते
9403464101
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
Comments
Post a Comment