काली माता मंदिर

काश्मिर सफर भाग-२
     
     पुण्याहून आमच्या सफरीतील सहपर्यटकांसह अन्य प्रवास्यांना पोटात सामावून घेवून झेलम एक्सप्रेस जम्मू-तावी रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. तत्पूर्वी आम्हा पर्यटकांना पुढील मार्गक्रमणासाठी सरस्वती धामजवळ उभ्या ठाकलेल्या मेटॕडोरमध्ये मी आणि सौ. स्थानापन्न झालो होतो. काही वेळातच सारथी अंकीत आणि त्याचा सहकारी मुकेश यांनी सर्वांचे साहित्य टपावर ठेवले. पावसापासून सुरक्षित करण्यासाठी त्यावर प्लास्टिक कागद बांधला आणि पहिल्या पर्यटन स्थळाकडे आम्ही सार्वजण निघालो.
       पर्यटकांमध्ये बहुतांशी ज्येष्ठ नागरिक होते. काहीजण सेवानिवृत्त तर काही निवृत्तीकडे आलेले. त्यातही महिलांची संख्या आघाडीवर, पुरुष केवळ चौघेजणच. अवघ्या साडेपाच किलोमीटरच्या प्रवासात सर्वांची आता ओळख झालेली. ज्येष्ठ सहपर्यटक आम्हा दोघांनाही प्रेरणादायी होते, हे ओघाने पुढे येईलच.
         जम्मू-तावी रेल्वे स्टेशनपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर काली माता मंदिर होते. खरंतर तो एक बहू नावाचा प्राचिन किल्ला होता. राजा बहू लोचन यांने तावी नदी किनारी जवळपास ३ हजार वर्षापूर्वी बांधलेला.१९ व्या शतकात डोगरी शासकांनी त्याचे नुतनीकरण केलेले होते. असं मानलं जातं की, ३०० वर्षापूर्वी माँ काली एका पंडिताच्या स्वप्नात आली आणि एका टेकडीवरील पिंडीच्या स्वरुपातील आपल्या अस्तित्वाची तिने पंडिताला कल्पना दिली.
       पंडिताने त्याचा शोध घेतल्यावर किल्ल्यावरील टेकडीवर एक काळा दगड आढळून आला. ज्याला देवीचे प्रतीक मानले जाते. त्याच ठिकाणी देवीचे मंदिर बांधण्यात आले. दुसऱ्या अख्यायिकेत हे मंदिर ८ व्या शतकात बांधण्यात आल्याचे आणि खास कोलकत्त्याहून माँ कालीची मूर्ती आणल्याचेही सांगण्यात येते. संगमरवरी दगडात देवीची प्रतिमा बनवण्यात आली. या मंदिरात देवीसाठी पूर्वी प्राण्यांचा बळी दिला जात असे, सध्या ती प्रथा बंद करण्यात आली आहे.
      वर्षातील मार्च-एप्रिल आणि सप्टेंबर-आॕक्टोबर मध्ये 'बहू जत्रे' चे आयोजन केले जाते. त्याशिवाय मंगळवारी आणि रविवारी देवीची विशेष पूजा असते.
          सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ऐतिहासिक मंदिराच्या सुरक्षेसाठी येथे पोलीस ठाणे असून, मंदिरात दर्शनाला जाताना मोबाईल घेवून जाण्यास परवानगी नाही. मोबाईल ठेवण्याची तेथे सोयही करण्यात आलेली आहे. पोलीस त्याची काटेकोरपणे तपासणी करतात. 
         किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच सभामंडपातून चालत पुढे गेल्यावर थोड्या अंतरावर डाव्या बाजूला इतर देवतांच्या मूर्तीचे दर्शन होते. देवीच्या दर्शनापूर्वी मोठाल्या शिवाच्या पिंडीचेही दर्शन झाले. एका भाविकाने तेथे शिरा, छोले आणि पुरीचा महाप्रसाद केलेला होता. स्थानिकांसाह इतर राज्यातून आलेले भाविक मनोभावे दर्शनानंतर याचा लाभ घेत होते.
          दर्शनानंतर किल्ल्याच्या प्रांगणात कारंजे, छोटेखानी बगिचा, पुरातन वृक्षांभोवतीचे पार, हिरवेगार लाॕन असे परिसराचे सुशोभिकरण करुन तो रमणीय केला आहे. याठिकाणी आलेले भाविक,पर्यटक आवर्जून आपा-पल्या छबी टिपतात. आम्हीही काही आठवणी बंदिस्त करुन वाहनाजवळ परततो तर काय, या परिसरातील वानरसेनेने टपावर हल्ला चढवला होता. पावसापासून सुरक्षिततेसाठी मघा बांधलेला प्लास्टिक कागद फाडून टाकलेला. सामानाची नासधूस करण्यापूर्वीच चालकाने नव्या कागदासाठी वाहन पुढे हाकले होते.
        अधिक माहिती घेतल्यावर समजले की, मंदिर परिसरात राहणारा हा वानरांचा समूह जम्मू शहरातील सर्वात मोठा असावा. जो येथे येणाऱ्या पर्यटक-भाविकांना आपल्या विविध चाळ्यांनी 'अनुभुती' देत असतो.
        गरमा-गरम पोह्यांचा आणि चहाचा आस्वाद घेईपर्यंत नवा कागद घालून वाहन आले आणि आम्ही बर्फाच्या शोधात श्रीनगरकडे निघालो. कारण जम्मूमधील उष्मा आपली जाणीव करुन देत होता.
          -प्रशांत सातपुते
9403464101 
 p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..