मुँह ए मुक्कदस..हजरत बल दर्गा

काश्मिर सफर भाग-६
         झेलम नदीच्या काठावर वसलेल्या श्रीनगरचे सौंदर्य म्हणजे विस्तीर्ण, शांत, निर्मळ पसरलेले दल सरोवर..! या दल सरोवराच्या काठावरच विविध बगिचे फुलले आहेत. एका बाजूला हिमालयीन पर्वत रांगा एका ओळीने उभ्या ठाकल्या आहेत, अगदी निश्चलपणे.  जणू शहराचा राखणदार असल्यासारख्या, अगदी पहारेकरीच म्हणाणा हवे तर.
        मुघल गार्डनच्या समोर दल सरोवर आणि त्याच्या सरळ पुढे आकाशाला स्पर्श करणारे संगमरवरी मिनार आणि बाजूलाच पांढरा शुभ्र गोलाकार घुमट. पृथ्वीवर एखादा मोती ठेवल्यासारखे हे दृश्य दूरवरुन पाहणाऱ्याला वाटते. हाच तो हजरत बल दर्गा होय. बल म्हणजे जागा.
        फारशी भाषेत केसाला मुँह ए मुक्कदस म्हटले जाते. हजरतांच्या दाढीचे केस अर्थात मुँह ए मुक्कदस या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी पवित्र कुराणाची प्रत देखील पहायला मिळते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने प्रार्थना अर्थात नमाज अदा केली जाते.
        याचा थोडासा इतिहास पाहिल्यास सर्वप्रथम भारतात मुँह ए मुक्कदस विजापुरात आणले गेले. त्यानंतर ते अजमेरला ठेवण्यात आले. नंतर तेथूनही काश्मिर ला पाठवण्यात आले. सुरुवातीला ते एका दुसऱ्या दर्ग्यात ठेवण्यात आले होते. परंतु, दिवसेंदिवस तेथे येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढल्याने जागा अपुरी पडू लागली.
         १९६८ मध्ये दर्ग्याच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. ११ वर्षानंतर ते पूर्ण झाले. संगमरवरी घुमटावर अरबीमध्ये आयते लिहिली आहेत. दूरवरुन ते वेल-बुट्टीची आकर्षक नक्षी असल्यासारखे वाटते. वायू आणि प्रकाश विजनासाठी संगमरवरी फरशीमध्ये जाळ्या बनवून कलाकारांनी आपल्या कलेचे लाजवाब प्रदर्शन केले आहे. या ठिकाणी सध्या पर्यटक आणि भाविक मुँह ए मुक्कदस च्या दर्शनासाठी येतात. आतमध्ये प्रशस्त मोठी जागा असल्याने या ठिकाणी शुक्रवारी प्रार्थनेसाठी मोठी गर्दी असते. 
         विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्यं आहे. हीच एकता आणि संतांच्या-प्रेषितांच्या पवित्र शिकवणीवर चालणारे धर्म, पंथ देशाची शक्ती देखील आहे. त्या साठीच काश्मिरला येवून हजरत बल दर्ग्याला आवर्जून भेट दिलीच पाहिजे. त्याशिवाय ही सफर अपूर्ण ठरेल. कारण निसार्ग सौंदर्याबरोबरच मानव निर्मित कलात्मकतेचा उत्तम नमुनाही या दर्ग्याच्या बांधकामात पहायला मिळतो.
             -प्रशांत सातपुते
9403464101 
 p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..