शिकारा पर्यटन

काश्मिर सफर भाग-७
       
      भारताचे सौंदर्य काश्मिर..काश्मिरचे सौंदर्य दल सरोवर..अन् त्याचे सौंदर्य शिकाऱ्यातील मारलेला फेरफटका आणि हाऊसबोटमधील राहणं होय. अशा शिकारामधून विस्तीर्ण, शांत पसरलेल्या दल सरोवरातून फेर-फटका मारणे ही वेगळीच अनुभूती आहे.
       दल सरोवर हा श्रीनगरचा दागिना समजला जातो. बऱ्याच ठिकाणच्या पर्यटनात आजवर विविध जलाशयात बोटींगचा अनुभव घेतला आहे. पण दल सरोवरातील शिकारामधून  फेर-फटक्याची अजिबात सर त्याला नाही. जुन्या चित्रपटात विशेषतः शम्मी कपूरच्या 'कश्मिर की कली' मधून या शिकाऱ्याचे चित्रिकरण पाहताना, कधीतरी याचा आनंद आपणही घेवू, असे त्यावेळी तरी कधी वाटले नव्हते.
          पाईन-देवदार या वृक्षांचा वापर कशासाठी केला जातो, याबाबत शालेय भूगोलाच्या पुस्तकात आजवर केवळ वाचून होतो. इथे साक्षात त्याचा वापर पाहून त्याचाही वापर करत होतो. दल सरोवरामध्ये फिरण्यासाठी शिकाऱ्याची खास सोय आहे.  सुंदर आकर्षक रंगातील आणि सजवलेले शिकारा घेवून सरोवराच्या काठावर शेकडो शिकारे पर्यटकांची वाट पहात असतात. एका शिकाऱ्यात चौघेजण बसवून शिकारा वल्हवत या फेरीला सुरुवात 
       शिकारा वल्हवणारा सरोवराची माहिती देत असतो. जानेवारीमध्ये सरोवर बऱ्याचवेळा संपूर्णपणे गोठलेले असते. पाण्यातून जाताना मध्यावर काहीवेळ थांबलो, तसे दूरवरील पर्वतांचे प्रतिबिंब पाण्यात हलताना दिसत होते. त्यावरील पांढुरक्या ढगांचे पुंजकेही पाण्यात मिसळत होते.
       सरोवरात तेही बोटीत कधी खरेदी केली आहे का..? नाही ना..? ती संधी इथे उपलब्ध आहे. शिकाऱ्यातून निघालात की, विक्रेते विविध वस्तू घेवून ते त्यांच्या छोट्या होडीतून तुमच्यापर्यंत पोहचतात. यात अगदी केशर, छोट्या किचेनपासून विविध बार्बेक्यूचे खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू यांचा मोठा समावेश असतो. शिवाय सरोवराच्या एका बाजूला स्वतंत्रपणे 'मीना" बाजार आहे. येथे किंमती शाली, पोशाख, लाकडी वस्तू गरम कपडे, दाग-दागिने याची दुकाने आहेत. ग्राहकांना मोहीत करुन या बाजारकडे जो-तो दुकानदाराचा प्रतिनिधी आग्रह करत असतो.
      या भूल-भुलैयातून सुटका करुन तुम्ही ऊर्वरित फेर-फटक्याचा आनंद घेवू शकता. याच ठिकाणी विविध पक्षी त्यांची वसाहत देखील पहायला मिळाली. त्यावर स्वतंत्रपणे लिहिणारच आहे.
      एव्हाना सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत होता. हवेतील वाढता गारवा मधूनच शहारे आणत होता. आकाशातील संधीप्रकाश पाण्यावरुन हेलकावे खात होता. सोनेरी किरणांची जणू पाण्यावर शाल पांघरल्यासारखी आता भासत होता.
      शिकारा आणि निसार्गसौंदर्याच्या साक्षीने विविध छबी उतरवत आम्ही किनाऱ्यावर आलो. उद्याची अख्खी रात्र दल सरोवराच्या साक्षीने हाऊसबोटवर घालवण्याचा हेतू मनी ठेवूनच सर्वजण हाॕटेलकडे निघालो..
      -प्रशांत सातपुते
9403464101 
 p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..