श्रीनगरचे शंकराचार्य मंदिर
काश्मिर सफर भाग-४
दिवसभर प्रवास करुन श्रीनगरला रात्री उशिरा पोहचलो. प्रत्येकजण प्रवासाने दमला होता. अशाही स्थितीत भारतीय तिरंग्यातील रस्त्यांवरील सार्वजनिक लाईटस्ने लक्ष वेधून घेतले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने देशभर विविध सोहळे साजरे झालेले. काहिसा त्याचाच भाग म्हणून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सार्वजनिक लावलेले दिवे विशेषतः ट्युब्ज या तिरंग्या मध्ये झगमगत होत्या.
काचेच्या तावदानातून अन् पडद्याच्या सांद्रीतून पहाटेची किरणावली बेडरुममध्ये शिरलीत तशी जाग आली. पडदे बाजूला सारुन गॕलरीतून सूर्यदर्शन घेतले. पाईन-देवदारच्या सोबतीने निळ्या आकाशाच्या गर्भातून तेजोमय गोळा डोंगराच्या आडून समोर येत होता. बालपणी रेखाटलेल्या सूर्योदयाची वास्तवता अनुभवत होतो. या प्रभात दर्शनाची छबी टिपली. समोरील लाॕनमध्ये लाल भडक टपोरे गुलाब भरगच्च उमललेले पहायला मिळाले. आपल्याकडे ज्याप्रमाणे गेटवर बोगनवेल चढवलेली, फुललेली असते, तसे येथे लाल गुलाबांची फुले सर्वत्र गुच्छ स्वरुपात गेटच्या कमानीवर पहायला मिळालीत.
नाश्त्यानंतर आम्ही सर्वजण या लाॕनमध्ये सूर्याच्या आणि गुलाबासोबतच्या फोटोसेशननंतर श्री शंकराचार्य मंदिराकडे निघालो. वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला टरारुन तण-घाणेरी वाढावी, फुलावी तसे पांढरे, किंचित गुलाबी रंगांचे गुलाब भरगच्चपणे फुललेले होते. हा काश्मिरी गुलाब होता. डल सरोवराच्या काठाने जाताना, सरोवरातील मनोहारी कारंजे पहात मंदिराच्या पायथ्याकडे जाणाऱ्या मार्गावर पोहचलो. या ठिकाणी सी आर पी एफ चे दोन बंदूकधारी जवान तैनात होते.
बाजूच्या थोराड, घनदाट वृक्षराईतून काही अंतर चालत गेल्यानंतर सी आर पी एफ च्या ६१ बटालीयन जवळ पोहचलो. तेथील तपासणी आवरुन मंदिराच्या पायऱ्या चढताना हवेतील गारवा गायब होवू लागला. वळणाच्या पायऱ्या चढताना, बसत, फोटो घेत अखेर मंदिराच्या पायथ्याजवळ पोहचलो. येथील कमानीला पितळी घंटा अडकवलेली आहे. ती वाजवून कमानीतून पुढे मंदिर परिसरात सरकलो. मुख्य मंदिराच्या पायऱ्या चढताना कमानीत आणखी एक पितळी घंटा वाजवायला मिळाली. सरळ उभ्या पायऱ्या चढून गाभाऱ्यात प्रवेश केला. या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. या शिवलिंगावर पितळी नागराज विराजमान आहे.
६ व्या- ७ व्या शतकात कंजूर दगडी रचनेत गोपाद्री टेकडीवर बांधलेले हे अप्रतिम मंदिर श्रीनगरमधील उंच ठिकाणी आहे. मंदिराच्या पाठीमागे १०६९ हिजरी (इ स वी १६५९) मधील एक आणि १०५४ हिजरी (इ स वी १६४४) मधील एक असे फारशी भाषेतील दोन शिलालेख आहेत. अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने लावली आहे. याच मंदिराच्या बाजूला शंकराचार्यांच्या तपस्येचे ठिकाण आहे.
मंदिर ज्या अष्टकोनी पीठावर उभारले आहे, तेथून श्रीनगर शहराचे विहंगम दृश्य दिसते. विशेषतः डल सरोवर, वळणे घेत जाणारी नदी, नागरी वस्ती, पर्वत राई, हिम शिखरांचे पर्वत, त्यावरुन पळत जरे पांढरे ढग सगळंच कसं चित्ताकर्षक, मनाला मोहनी घालणारा नजारा.
या ठिकाणी तसेच खाली मंदिर परिसरातील चिनार वृक्षाच्या छायेत विविध समुहाने आलेले पर्यटक फोटोसेशन करत होते. गार वाऱ्याच्या झुळुकांनी तजेला मिळत होता. इतक्या पायऱ्या चढून वर आलेली दमणूक कुठल्या कुठे गायब झालेली.
आलो तसा पुन्हा पायऱ्या उतरत तळाशी आलो. या ठिकाणी सी आर पी एफ च्या गौरवाची माहिती देणारा, शूरविरांना सलाम देणारा फलक लावला होता. त्याशिवाय वृक्षराईत २०२१ साली २ हजार ९५० तर २०२२ साली २ हजार ६३० वृक्षारोपण केल्याचा फलकही होता. सी आर पी एफ च्या या गौरवशाली कार्याला मनापासून सलाम करत परतीचे मार्गक्रमण सुरु केले.
-प्रशांत सातपुते
9403464101
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
Comments
Post a Comment