निर्भय नंदनवनाकडे..
काश्मिर सफर भाग-१
काश्मिरला भारताचे नंदनवन, स्वर्ग, स्वित्झर्लँड आणखी बरीच विशेषणे वापरली जातात. ही विशेषणे ज्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक, प्राकृतिक वा प्रादेशिक सौंदर्यावर अवलंबून आहेता, ती आणि तेथील निसर्ग संपन्नता ही प्रत्येक महिन्यात वेग-वेगळी असते. ही नजाकत अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूत किमान ४ वेळा तरी पर्यटनाला काश्मिरला जायलाच हवं.
आॕक्टोबर २०१७ नंतर पुन्हा नवा निसर्ग अन् त्याचे सौंदर्य अनुभवायला मी आणि सौ. इंदोरमधून निघालो. तब्बल पाच-साडेपाच वर्षानंतर या सफरीत निसर्ग आणि त्याचे रुप कसे पहायला मिळतेय..खरंतर ही एक उत्सुकताच होती.
मालवा एक्सप्रेसने इंदोर स्टेशन सोडलं तशी छोट्या-मोठ्या गावांची स्टेशन मागे पळू लागलीत. सकाळी सव्वा सातला पानिपत आलं. करनाल, कुरुक्षेत्र, अंबाला, लुधियाना अशी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि प्रसिद्ध गावं देखील सौ बरोबरील चर्चेच्या ओघात मागं पळाली. नियोजित सफरीत आम्ही एक दिवस आधीच जम्मूत पोहचलो होतो. आमच्या भैरवी ग्रुपच्या प्रमुख वैशाली परदेशी आणि इतर पर्यटक पुण्याहून दुसऱ्या दिवशी पोहचणार होते. 'भैरवी' चे हे यशस्वी ३१ वे वर्ष असल्याने या सफरीतील सर्व पर्यटकांना खास सफर बॕग भेट मिळाली होती. अजवर इतक्या सफरी केल्या पण, अशी अनोखी भेट प्रथमच मिळाली होती.
एक दिवस आधी आल्याने स्थानिक पर्यटनासाठी तो दिवस सत्कारणी लावला. जम्मू आणि काश्मिरमध्ये इतर राज्यातील पोस्टपेड मोबाईल सेवा वगळता, प्रि-पेड चालत नाही. ही बाब माहीत असल्याने प्रथम स्थानिक विक्रेत्याकडून सफर काळासाठी मोबाईलचे प्रि-पेड कार्ड विकत घेतले. खास पर्यटकांसाठी अशी कार्ड विक्री केंद्रे जागोजागी पहायला मिळतात. ४०० ते ४५० रुपयांत ही मोबाईल कार्डे मिळतात.
जवळच असणाऱ्या बाजारपेठेत फेरफटका मारला. विशेषतः फौजी जवानांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत. त्यांचा पोशाख, बूट, जॕकेट वगैरे विक्रीस होती. शिवाय एअरगन, एअर पिस्तूल ची दुकानेही होती. त्याचबरोबर काश्मिरी शाली, इतर कपड्यांची दुकाने आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुक्या मेव्यांची त्यातही आक्रोड विक्रीच्या दुकानांची संख्या मोठी होती.
गंमत म्हणजे बरोबर पर्यटकांना हेरुन प्रत्येकजण दुकानातील प्रवेशासाठी साद घालत होता. अगदी आर्जवीपणाने आणि आपुलकीने.
याच गर्दीत एका बोळातील अस्सल डोसा सेंटरने सौ. चे ठळकपणे लक्ष वेधून घेतले. तसे अम्ही त्या सेंटरमध्ये स्थिरावलो. मसाला तंदूर आणि पालक तंदूर असे काहिसे दोन वेगळ्या प्रकारचा स्वाद चटणी सांबारबरोबर घेतला. त्यावर 'अदरकवाली चाय' ची लज्जत घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. समोरील गल्लीत गेल्यावर तर आश्चर्यचकितच झालो. तेथे जवळपास सर्व हाॕटेल्स ही 'महाराष्ट्रीयन भोजनालय' होती. तसा स्पष्ट उल्लेख त्यांच्या फलकांवर होता.
बाजारपेठेतील रस्त्यांवर भारतीय फौजी जवान, सी आर पी एफ जवान, स्थानिक आणि पर्यटक यांची गर्दी वाढत होती. हे समोरासमोर असणाऱ्या दोन मंदिरावरुन दिसत होते. आम्हीही शिव मंदिरात आणि त्यानंतर प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जावून दर्शन घेतले.
त्यानंतर जम्मू-तावी रेल्वे स्टेशनवर फेरफटका मारला. या ठिकाणी सी आर पी एफ आणि स्थानिक पोलीसांचा कडेकोट पहारा दिसत होता. मात्र, गेल्यावेळच्या भेटीत रस्त्यांवर जागोजागी दिसणारी जवानांची मोठी संख्या, आर्मी आणि सी आर पी एफ च्या वाहनांची संख्या कमी होवून, नागरिकांची विशेषतः पर्टकांची संख्या वाढल्याचे यंदाच्या भेटीत प्रकर्षाने जाणवले. ही सुरक्षिततेची आणि निर्भयतेची विशेष बाब अधोरेखित होत होती. काश्मिर मध्येही सर्वत्र असेच चित्र असेल का? हा प्रश्न मागील दडपणाच्या अनुभवाने उगीचच मनात डोकावून गेला. यानंतर आम्ही दोघेही पुण्याहून उद्या येणाऱ्या इतर पर्यटकांच्या समवेत होणाऱ्या काश्मिर कडील प्रवासाची चर्चा करीत हाॕटेलमध्ये पोहचलो.
-प्रशांत सातपुते
9403464101
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
Comments
Post a Comment