खतरनाक मार्गाचा सुखद शेवट गुलमर्ग

                     काश्मिर सफर भाग-१२
         
        प्रसन्न वातावरणात पुन्हा एकदा टपोऱ्या लालभडक गुलाबांच्या ताटव्यासोबत श्रीनगरच्या आठवणी सोबत घेवून गुलमर्गकडे जाण्यासाठी निघालो. आज वाहनांची वर्दळ जास्त दिसत होती. विशेषतः पर्यटकांची वाहने! कदाचित त्यामुळे प्रत्येक चौकात सीआरपीएफ जवानांसोबत वाहतूक पोलीसदेखील दिसत होते. स्थानिक पोलीस वाहनांची तपासणी करत होते. बऱ्याच  ठिकाणी सीआरपीएफ आणि पोलीसांची वाहनेही लावलेली होती. बहुतेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु होती. 
         एके ठिकाणी मुख्य महामार्गावरुन गुलमर्गकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनाने धाव घेतली. हा चढणाचा आणि वळणा-वळणाचा रस्ता होता. हवेतील गारवा, दोन्ही बाजूला असणारी उंचच उंच देवदारची राई, त्यामधून दिसणारे पांढरे निळे आकाश, सोबत पर्वत राजीमध्येच खोल गडप होणाऱ्या दऱ्या हे सगळं आल्हाददायक आणि भारुन टाकणारं असं होतं.
         बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग ही एक गिरीस्थान नगर परिषद आहे. शहरात प्रवेश करताना नाका लागला. या ठिकाणी बर्फात जाताना गरम कपडे, शाल, बूट आदी साहित्य भाड्याने देण्याची दुकाने होती. पुन्हा वळणे घेत, आमचे वाहन प्रमुख वाहनतळावर थांबले आणि घोडेवाले व इतर गाईड-एजंटांचा गराडाच पडला.
         याठिकाणी बर्फात जाण्यासाठी 'गंडोला' म्हणजे रोप वे आणि घोडा अशी दोन साधने आहेत. गंडोल्याचे तिकिट आॕनलाईन काढावे लागते. शिवाय ते फूल्ल झाले होते. त्यामुळे आमच्यासमोर सध्या घोडेसवारीचा एकमेव पर्याय होता. आॕक्टोबर २०१७ मध्ये मी आणि सौ. ने या गंडोला मार्गाचा वापर अगदी दुसऱ्या टप्प्यापर्यंत केलेला होता.
        घोडेसवारीबाबत अंतिम दर ठरवून अखेर बर्फात जाण्यासाठी आम्ही तयार झालो. यात प्रामुख्याने आमचे गोपाळदादा ढापरे त्यांच्या सौ. सुजाता ढापरे, वृषाली वाळिंबे, संजय हेंद्रे त्यांच्या सौ. मेघा हेंद्रे, श्रीकांत भांबुरे त्यांच्या सौ. ज्योती भांबुरे व आम्हा दोघांचा समावेश होता.
          करण-अर्जुन या घोड्यांवरुन जाताना सुरुवातीला डांबरी रस्त्यांवर जाम मजा येत होती. खऱ्या अर्थाने 'ए हँसी वादीयाँ ए खुला आसमाँ..' असे चित्र होते. विविध चित्रपटांच्या झालेल्या शुटींगची माहिती सोबतचा मुलगा आम्हाला देत होता. वातावरण स्वच्छ, निरभ्र होते. गोल्फ मैदान, स्कीईंग प्रशिक्षण केंद्र, मत्स्यपालन केंद्र आणि सीमा सुरक्षा बलाचे १०४ बटालियन हे घोड्यावरुन पहातच खऱ्या चढणीपर्यंत आलो. इथून अक्षरशः दगड-धोंड्यांचा मार्ग होता. खरंतर ती पायवाट होती. मध्येच ती जंगलात लुप्त झालेली. हे पाहून 'आता कसं' असा प्रश्न मनात डोकावला. परंतु, घोडेवाला मुलगा, 'घोडा आपको सही लेके जाएगा..' असे आश्वासन देत होता. 'मेरे करण-अर्जुन आएँगे..हमें सही सलामत लेके जाएँगे..' असंच काहीसं फिल्मी होतं. ते खरेही होते. अगदी सवयीप्रमाणे ओळखीच्या वाटेप्रमाणे घोडा नेत होता.
         काही ठिकाणी थांबत जपून पावले टाकत होता. एके ठिकाणी मधूनच वहात येणारा खळाळता पाण्याचा प्रवाह पाहून थोडी जास्तच भीती वाटली. कारण, पाण्याला वेग होता. एका कडेला खाली खोल पात्र होते. त्या बाजूला सुरक्षिततेसाठी देवदारचा सरळ लाकडी ओंडका या कडेहून त्या कडेपर्यंत टकलेला. हे सर्व पाहून खाली उतरावे आणि चालत निघावे, असा प्रश्न मनात आला. तो ही काही क्षणच! समोरून आणि आमच्या सोबत अन्य पर्यटक घोड्यावरुन जात होते. ही संख्या मोठी होती. त्यातील बालकांपासून 'वजनदार' पर्यटकांचा समावेश पाहून थोडे हायसे वाटले. दररोजच्या सवयीने पायाखाली तुडवलेली वाट आम्हाला नवी असली तरी, ती घोड्यांना परिचयाची होती. थोड्या अंतरावर विसाव्यासाठी सर्वजण थांबलो. मोठ्या संख्येने घोडे आणि पर्यटक दिसले. या ठिकाणी चहा, काॕफी, मॕगीचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा ओळखीच्या 'करण-अर्जुन' ने आम्हाला पाठीवर घेतले. घोड्यांवरुन पुढे निघालो. जसजसे जवळ जावू तसा, हा मार्ग आणखी कठीण आणि चढणीचा होत गेला. विसावा खावून ताजेतवाने झालेली घोडी पर्यटकांना जपत नव्या दमाने पाठीवरुन वहात होती.
         अखेर दोन-अडीच तासांच्या घोडसवारीनंतर बर्फाची जमीन दिसू लागली. तशी भीतीची जागा आनंदाने घेतली. अगदी थोडे अंतर समोर दिसत असले तरी, मोठाले दगड-गोटे आणि सरळ खडा चढ होता तो. घोड्याने कसरत करत, जवळचा मार्ग शोधत, तोही चढ पूर्ण केला आणि या जीवघेण्या खडतर, खतरनाक वाटचालीतून एकदाची सुटका झाली.
         बर्फ वितळून वरुन येणाऱ्या पाण्याचा खाली मोठा ओहोळ बनला होता. तो पार करण्यासाठी या ठिकाणीही लाकडी ओंडके टाकलेले. त्याचा वापर साकवप्रमाणे करुन पर्यटकांना प्रवाह पार करायला गाईड, घोडेवाले मदत करत होते.
       बालपणी वाचलेल्या साहित्यातील सात डोंगराच्या, सात दऱ्यांच्या, सात नद्यांच्या पार असणाऱ्या जादुई नगरीप्रमाणे बघेल तिकडे सारा बर्फच बर्फ असणारा गुलमर्गचा नजारा आता खुणावत होता..साद घालत होता..!
        -प्रशांत सातपुते
           9403464101 
          p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000
#काश्मीर #गुलमर्ग #gulmargkashmir #kasmirtourism

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..