हाऊसबोटीवरील मुक्काम..

              काश्मिर सफर भाग -११
          
       कपडे भिजलेल्या अन् कुडकुडणाऱ्या अवस्थेत स्वतःला वाळवत सोनमर्ग ते श्रीनगर प्रवास उभा राहून केला. पण, झीपलाईन क्राॕसिंग आणि रिव्हर राफ्टींगच्या सुखावून देणाऱ्या आनंदात ते भिजणे अन् कुडकुडणे आता हरवत होते. अत्यंत वर्दळीच्या अणि वाहतूक कोंडीतून वाहन अक्षरशः दामटत श्रीनगरला हाॕटेलवर पोहचलो.
        आजच्या रात्रीचा पडाव हाऊसबोटीत असल्याने जेवणानंतर आवश्यक साहित्यासह दल लेकच्या काठी रात्री आलो. निरव शांतता पसरलेली. काळा कभिन्न अंधार. मधूनच आलेल्या वाहनांच्या दिव्यांचा झोत पडायचा. त्यात दल लेकचे झोपलेले पाणी कुस बदलताना दिसायचे. पाण कोंबड्यांची खुसपूस, कुठेतरी मास्यांच्या उसळीने झोपेतील दल लेकचे पाणी चुबुक आवाजाने घोरत होते. हाऊसबोटीमधील दिवे दूरवरुन चांदण्याप्रमाणे भासत होते.
         हा सर्व नजारा निरव शांततेत टिपत असतानाच, पाण्याला खच्चून जागे करत दोन शिकारे आम्हाला हाऊसबोटीवर घेवून जाण्यासाठी येत होते. या शिकाऱ्याच्या मार्गात दल लेकचे पाणी खडबडून जागे होत होते. शिकारे पुढे सरकले की पुन्हा जागेवरच झोपेच्या अधीन होत होते. दोन्ही शिकाऱ्यात बसून आम्ही सर्व पर्यटक हाऊसबोटीकडे निघालो. अगदी गच्च अंधारात! कालच याच शिकाऱ्यातून या सरोवराची सैर केलेली, ती दिवसा उजेडी!
      रांगेत उभ्या असणाऱ्या हाऊसबोटींजवळ जाताना मघाशी दिसणाऱ्या चांदण्या मोठ्या दिव्यात रुपांतरित होताना दिसल्या. अनेक पर्यटकांचा वावर यावर होता. काही तरुण मित्रांचे जथ्थे होते. तर, काही मधुचंद्रासाठी आलेली जोडपी! जोडीदाराच्या सहवासात शाल पांघरुन सरोवराची नजाकत  न्याहाळत होती.
      जवळ येणारी हाऊसबोट आपलीच असेल..असे वाटून आम्ही उतरण्यासाठी आतूर होत होतो. परंतु, शिकारा पुन्हा पाणी कापत पुढे सरकायचा. ही रात्रीची सैर देखील विलोभनीय होती. अखेर आमचा शिकारा लागून लागून असणाऱ्या दोन हाऊसबोटींजवळ थांबला. त्यातून आम्ही उतरलो. आमच्या सोबतचा दुसरा शिकारा आणखी पुढे गेला.
         एखाद्या तारांकीत हाॕटेलप्रमाणे हाऊसबोट होती. अत्यंत देखणी, नीटनेटकी, सजवलेली आणि आकर्षित! छोटेखाने अंगण, आत प्रवेश करताच दिवाणखाना, त्यामधील काचेच्या कपाटात चिनी मातीची भांडी ठेवलेली. एका बाजूला ओळीने शयन कक्षांची रचना केलेली. ती प्रथम ताब्यात घेत आतमध्ये शिरलो. बाजूलाच सरकत्या दरवाज्यापलिकडे टब बाथसह हमामखाना होता. अत्यंत कल्पकतेने सर्व रचना कमी जागेत योग्य पध्दतीने केलेली.
          सौ. बरोबर बाहेर अंगणात थोडावेळ आलो. नीरव शांतता पसरलेली. पाणी संथ होते. काही पर्यटकांचा आवाज सोडता बाकी सगळं पुन्हा शांत! रात्रीचे सरोवर न्याहाळताना, गुढ, रहस्यमय कादंबऱ्यांमधील काही प्रसंग सरकून गेले. तोंडात सिगार वा चिरुट ओढणाऱ्या नायकाची काळी आकृती मला दिसत होती आणि सोबत नायिका..
           पक्षांच्या विविध आवाजांनी सूर्योदयाची चाहूल लागली. बाहेर पाहतो तर, सरोवराच्या समोरील निळ्या-हिरव्या पर्वत राजीतून  तेजोमय भास्कराच्या आगमनाची वर्दी घेवून चमकणारी 'रश्मी' सर्वत्र अवतरलेली. त्यानंतर हळूच सृष्टी ला कवेत घेण्यासाठी आतुरलेला भास्कर कले-कलेने बाहेर पडत होता. सरोवरात पाणकोंबडी पिलांसह तर, पाकोळी उगीचच इकडून तिकडे भिरभिरत होत्या. स्वच्छ सुंदर प्रकाशात हाऊसबोटीचे सौंदर्य अधिकच उजळले होते. बोटीवरील लाकडी जाळीदार कलाकुसर स्पष्टपणे जाणवत होती. अंगणासभोवती असणाऱ्या छोटेखानी लोखंडी कंपाऊंडवर लता-वेलींची नक्षी बनवलेली.         सूर्यनारायणाच्या साक्षीने छबी टिपून आम्ही बोटीच्या लगतच मागील बाजूकडे जाणाऱ्या लाकडी पायवाटेवरुन अवघ्या पाच मिनिटात आम्ही सर्वजण रस्त्यावर पोहचलो. सरोवराच्या काठावर पुन्हा नव्याने फोटोसेशन करुन, गुलमर्गकडे रवाना होण्यासाठी प्रथम हाॕटेलवर पोहचलो. आपापले साहित्य सोबत घेवून पुढे बर्फात जाण्यासाठी..
      -प्रशांत सातपुते
9403464101 
          p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000
#काश्मीरपर्यटन #काश्मीर #शिकारा #houseboatstay

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..